राहुल गांधी हे एका फार फार मोठ्ठ्या घराण्याचे ( म्हणजे इतक्या मोठ्ठ्या की एका महान काँग्रेसी नेत्याने ह्या घराण्यातील एका महान पंतप्रधानांना "देशापेक्षा मोठ्ठे'" ठरवले होते। असो. ) वारस आहेत. मान्य !
सध्या ते काँग्रेस पक्षाचे युवराज असुन त्यांच्यापुढे आलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर नाकारुन ( ह्या बातमीची काही चरणभाटांमार्फत लै पब्लिशिटी करण्यात त्यांचा वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता हे उगाच जाताजाता नमुद करतो ) त्यांनी साधी "खासदारकी" स्विकारली. काँग्रेसी भाषेत ह्याला "अंतरात्म्याचा आवाज" की "आत्मसन्मानार्थ त्याग" असे काही तरी म्हणतात बॉ, आपल्याला त्यातले जास्त काही कळत नसल्याने तुर्तास मान्य एवढेच म्हणतो.
झालच तर लै शिकले वगैरे आहेत, शिक्षण फॉरीनात झाले ही हे आपल्यासारख्या अडाणी/अल्पशिक्षित मंत्री आणि खासदार निवडुन देणार्या देशात व्हॅल्यु अॅडिशन मानायला हरकत नसावी.
असो, आजकाल म्हणे ते ग्रामिण भारत पाहण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हालअपेष्टा पाहण्यासाठी ( त्या दुर करणे ही कुठल्याच राजकारण्याची जबाबदारी नाही ) दौर्यावर निघाले आहेत म्हणे. ठिकठिकाणची गरिब, बेरोजगारी, रोज जिवंत राहण्यासाठी रोज संघर्ष करायला लागणारी उघडी-नागडी जनता आपला "राजपुत्र" पहायला हातातली कामे बाजुला सारुन अगदी उत्साहात येत आहे, अर्थात ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण आपल्या जनतेला "नेता" हा जोवर आपला "मालक" वाटत राहणार तोवर हे असेच घडणार।
असो, इथे म्हणे युवराज राहुल मोठ्ठीमोठ्ठी भाषणे वगैरे देऊन काहीकाही वायदे वगैरे करत आहेत ( व त्यांचे चमचे त्यावर "लेका लेका पंतप्रधान का नाही झालास?" असा चेहरा करत टाळ्या वाजवत आहेत ). जोवर हे रुटिन ( म्हणजे ह्यांना दौरा केल्याचा आनंद व जनतेला राजपुत्र प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहिल्याचा आनंद ) चालु आहे तोवर आमची काही तक्रार असण्याचे कारण नाही।
मात्र परवा युवराजांनी एक गंमतच केली बघा। हो, गंमतच.
ते बिहारातल्या कुठलाश्या गावी गेले होते आपले टोळके घेऊन, मस्त गावगन्ना गर्दी अणि मिडियाचा फौजफाटा वगैरे जमला होती त्यांना बघायला. ह्यासर्व वातावरणामुळे उत्साहित झालेले युवराज उत्साहाच्या भारात जे बोलु नये ते बोलुन बसले. आता युवराजच ते, मनात आले बोलुन टाकले, मॅटर खतम, ते काय महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते किंवा मंत्री आहेत काय शब्दाशब्दाला हायकमांडची परवानगी मागायला ? सध्या ते काय करतात तर विवीध भागांचा दौरा करतात व तिथले प्रश्न असे चुटकीसरशी फटाफट सोडवुन टाकतात, नुकताच त्यांनी "मुंबई आणि युपी/बिहारी जनांच्या नविन लोढ्यांचा प्रश्न" असाच बसल्या बैठकीत सोडवला, ह्याला म्हणतात युवराज. आता ह्याच हिशोबाने नॉर्थ -ईस्टचे प्रश्न, कर्नाटक्-तामिळनाडु ह्यांच्यातला कावेरी वाद, आंध्रातला तेलंगाणाप्रश्न, कर्नाटक-महाराष्ट्रातला सिमाप्रश्न , गुजराथेतला सरदारसरोवर प्रकल्पाचा वाद, काश्मिर प्रश्न वगैरे दिर्घकाळ भिजत घोंगड्यासारखे पडुन असणारे प्रश्न आता युवराज एका बैठकीत सोडवणार ह्याबाबत आमच्या मनात अजिबात संदेह नाही, देरी आहे ती फक्त त्यांनी त्या त्या भागाचा दौरा करायची. दौर्यावर जायचे, गर्दी आणि मिडिया जमवायचा, बैठक घ्यायची की सोडवायचा प्रश्न अशी एकदम शिंपल प्रोसिजर आहे, तुम्ही पहात रहा आता अनेक प्रलंबित वाद आता कसे फटाफट सुटतात ते.
असो, फारच विषयांतर झाले.
बोलता बोलता युवराज राहुल म्हणाले की "२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे".
हम्म्, अशा बोलण्याला बालीश म्हणतात का हो ?
असो.
एनएसजीचे कमांडो हे राज्याच्या कोट्यानुसार निवडतात व त्यानुसारच त्यांच्या पलटणी तयार केल्या जातात ही नवी माहिती मिळाली.
तदनुसार मुंबई वाचवायला आलेल्या टीममध्ये युपी आणि बिहारी ह्या "कोट्यातल्याच तुकड्या" पाठवल्या गेल्याचेही नविनच समजले।
ह्याच युद्धात वीरमरण आलेला एनएसजीचा कमांडो शहिद संदीप उन्नीकृष्णन हा युपी/बिहारी होता ही बातमी कोणत्या उल्लुच्या पठ्याने युवराजांना सांगितली हो ?
तसेच ह्याच तुंबळ युद्धात ज्यांनी देश आणि मुंबई वाचवण्यासाठी आपल्या प्राण दिले ते हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे असे अधिकारी व इतर अनेक पोलीस तसेच कसाबच्या हातातली स्टेनगन आपल्या पोटावर धरुन त्याला जिवंत पकडवण्यात फार मोठ्ठी भुमिका बजावणारे तुकाराम ओंबाळे हे काय खास युपी/बिहारातुन मुंबई वाचवायला आले होते काय ?
शिवाय हे युद्ध लढत असताना देश आणि मुंबई वाचवायच्या प्रामाणिक भावनेतुन मैदानात उतरलेल्या "एनएसजी कमांडों"चा "युपी/बिहार" असा विशिष्ठ प्रदेश ठरवुन राहुलजींनी नक्की काय साधले ? म्हणजे ह्याच हिशोबाने देशाच्या सिमेवर लढणारा प्रत्येक जवान हा आपल्या देशाचे नसुन आपापल्या राज्याचे नेतॄत्व करतो की काय ?
रोज उठुन मनसे / शिवसेनेला झोडपण्याच्य निमित्ताने तमाम मराठी माणसाला "देश तोडणारे , विघटनवादी, प्रांतिक अस्मिता बाळगणारे" अशी शेलकी विशेषणे देणारे सो कॉल्ड देशप्रेमी मात्र राहुलजींच्या ह्या 'कमांडोंचा प्रदेश ठरवुन सैन्याचा अपमान करणार्या' विधानावर मात्र मुग गिळुन शांत आहेत.
असो, आता उगाच आपली राहुलजींना माहिती असावी म्हणुन देशासाठी लढलेल्या व योगदान दिलेल्या काही "मराठी" भाषिक जनांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देतो, यादी अगदी संपुर्ण नाही पण जशी आठवेल तशी आहे, बहुदा तेवढी पुरेशी असावी.
१. जनरल अरुणकुमार वैद्य :
जेव्हा खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये रस्त्यांवर नंग्या तलवारी नाचवत सरकारविरुद्ध मोर्चे काढलेले आणि रक्तपातानी आख्खा पंजाब वेढीला धरुन अमॄतसरमधल्या 'सुवर्णमंदिरा'ला आपला लढाऊ गड बनवुन ठेवले होते तेव्हा जनरल वैद्यांच्या नेतॄत्वाखाली 'भारतीय सैन्य' तिकडे घुसले होते व 'ऑपरेशन ब्ल्यु स्टार' करुन देशाची वेशीवर टांगलेली लाग वाचवली होती.
ह्यामागे वैद्यांचा हेतु पुढेमागे मराठी माणसाला पंजाबात आरामात राहता यावे असा मुळीच नव्हता.
नंतर त्यांना ह्या प्रकरणाची किंमत सेवानिवॄत्तीनंतर एका हल्ल्यात आपले प्राण गमावुन द्यावी लागली होती.
२. एअर चिफ मार्शल प्रदिप नाईक :
त्यांनी २००९ मध्ये हवाईदळाचे नेतृत्व स्विकारले व समस्त देशाच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.१९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, मराठी असल्या कारणाने आपले विमान घेऊन मुंबईवर घिरट्या घालत केवळ मुंबईचे संरक्षण करण्याच्या फंदात ते पडले नाहीत.
३. राम रघोबा राणे :
हे कोकण मराठा रेजिमेंटचे एक लेफ्टनंट ऑफिसर होते. १९४८ च्या पाकीस्तानी घुसखोरीला उत्तर देण्यासाठी जाणार्या सैन्यात ह्यांच्या तुकडीचे नेतृत्व राणे ह्यांनी केले. घुसखोरांनी ठिकठिकाणी सुरुंग पेरुन आणि अडथळे उभारुन भरतीय सैन्याच्या हालचालीवर बंधने आणली तेव्हा राणे ह्यांच्या तुकडीनी अनेक भु-सुरुंग निकामी करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. त्यामध्ये त्यांच्या सहकार्यांना प्राण गमवावे लागले तर ते स्वतः जबर जखमी झाले होते.त्यांच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना "परमवीर चक्र" देऊन सन्मानीत करण्यात आले होते.
४. अॅडमिरल विष्णु भागवत :ह्यांनी भारतीय नौसेनेचे नेतृत्व केले.
५. अनिल टिपणीस :भारतीय वायुसेनेचे माजी चीफ ऑफ एअर स्टाफ.
ह्याशिवाय इतर काही सामाजिक आणि राजकीय योगदाने,
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
ह्यांनी संपुर्ण स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे 'अध्यक्षपद' भुषवले. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांमध्ये पदासाठी आणि सन्मानाच्या खुर्च्यांसाठी चढाओढ चालु असताना मात्र ह्यांचे निस्वार्थी योगदान लक्षात घेण्यासारखे आहे.
२. स्वातंत्रपुर्व काळात इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाची मुहुर्तमेढ इथे महाराष्ट्रातच रोवली गेली. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणवले जाणार्या लोकमान्य टिळकांना आख्खा भारत हा "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणुन ओळखतो. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर, फडके बंधु, राजगुरु, आगरकर ह्यांच्यासारख्या अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान बजावले आहे.
३. स्वांतंत्र्यानंतर अधुनिक भारताच्या उभारणीत मोलाची भुमिका बजावल्याबद्दल "महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्कॄतपंडित काणे" ह्यांचा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन सन्मान करण्यात आला आहे.शिवाय ह्या यादीत आपल्या "लतादिदी आणि स्वरभास्कर भीमसेन जोशी" हे सुद्धा आहेत.
४. भारतात सिनेयुग आणि चलतचित्रपटाची सुरवात "दादासाहेब फाळक्यांनी" केली.
अशी उदाहरणे हजारो आहेत पण सगळीच यादी देण्यात मतलब काय ?
थोडक्यात सांगतो, ह्यातल्या एकानेही आपले कार्य पुढे न्हेताना ते फक्त महाराष्ट्र किंवा मराठी जनांपुरते मर्यादित ठेवण्याचा आपमतलबी करणे सोडा पण त्याचा कधी विचारही केला नाही, इतकेच काय पण नंतर कधी त्याचा साधा उल्लेखही केला नाही.
देशाच्या कल्याणासाठी आणि हिमायलाच्या संरक्षणासाठी नेहमीच धाऊन जाणार्या ह्या सह्याद्रीच्या मराठीच्या महाराष्ट्रादिकांना कुणी "देशप्रेम" शिकवायच्या आणि "राष्ट्रीय एकात्मतेचे धडे" शिकवायच्या भानगडीत पडु नये हेच खरे, ते आमच्या रक्तातच आहे....
अवांतर : युवराजांना कोणी महाभारतातल्या विराटपुत्र युवराज उत्तर ह्याची गोष्ट नाही का सांगितली ?
0 comments:
Post a Comment