'तेंडुलकर ओपस'सह मिळणार सचिनच्या रक्ताचा थेंब!
क्रिकेटविश्वात नवनवे विक्रम स्थापित करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणखी एक विक्रम केला आहे. 'तेंडुलकर ओपस' या आगामी पुस्तकासाठी सचिनने रक्त दिले आहे. अशाप्रकारे ग्राहकाला या पुस्तकात सचिनच्या हस्ताक्षरासोबत रक्ताचा थेंब चिकटलेला मिळणार आहे. लंडनची क्रेकन ओपस ही प्रकाशन संस्था सचिनवरचे हे ३० किलो वजनाचे, ८०० पानी पुस्तक प्रकाशित करणार आहे. या अवाढव्य पुस्तकासाठी ७५ लाख रुपये मोजावे लागणार असून हे आतापर्यंतचे सर्वात माहागडे पुस्तक असणार आहे. या पुस्तकाच्या पहिल्या १० प्रती घेणा-या ग्राहकांना सचिन तेंडुलकरच्या रक्ताचा थेंब चिकटलेला मिळणार आहे. सचिनचा आतापर्यंतचा क्रिकेटचा संपूर्ण प्रवास या पुस्तकात असेल. शिवाय सचिनचे कुटुंबिय, मित्र, सहकारी यांनी केलेले सचिनचे वर्णनही यात वाचायला मिळेल. सचिनचे आत्तापर्यंत कुठेही प्रकाशित न झालेली छायाचित्रांचा या पुस्तकात समावेश असेल. ट्वेटी२० वर्ल्ड कपच्या वेळी सचिनने लंडनमध्ये या प्रकाशकाची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रशिक्षित नर्सने सचिनच्या लाळेचा नमुना घेतला होता. या नमुन्याच्या आधारावर पुस्तकामध्ये सचिनच्या गुणसूत्रांची बहुरंगी रचना तयार करून छापली जाणार आहे. ओपस कलेक्शन ही प्रकाशन संस्था जगातल्या निवडक घटना, संस्था अथवा मोठ्या व्यक्तिंबद्दल पुस्तक प्रकाशित करते. यापूर्वी दिएगो मॅरोडोना या एकमेव क्रीडापटूवर या प्रकाशनसंस्थेने पुस्तक काढले आहे.
Post a Comment
0 comments:
Post a Comment