sponsers

Tuesday, May 19, 2009

$$ Marathi Masti $$ (unknown)



निवडणुकीचा निकाल काय लागतोय, याहीपेक्षा मुंबईकर मराठी माणसाला मनसेच्या भवितव्याविषयी कुतुहल आहे. राज ठाकरे यांचं राजकारण वाढतंय, यावर परवा झालेल्या मतदानानं शिक्कामोर्तब केलंय. हाच ट्रेंड राहिला, तर उद्धव आणि राज आज ना उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे आघाडी करून एकत्र येण्याची शक्यता आहे.
..............

'टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह' नावाचा एक सिनेमा आहे. नाना पाटेकर आणि जॉन अब्राहमचा. नियती दोघांचं नशीब सयामी जुळ्यांसारखं एकमेकांना चिकटवते. तरीही दोघे केवळ स्वत:चा 'इगो' सुखावण्यासाठी एकमेकांना संपवण्याचा आटापिटा करतात. शेवटी दोघांना आपली चूक उमगते. दोघेही एकमेकांना हवं ते मिळवून देतात.

हा सिनेमा आठवण्याचं कारण एकच. परवा झालेलं मतदान. मुंबई, ठाण्याच्या सगळ्या मतदारसंघांत एक सूत्र स्पष्ट दिसलं. ते म्हणजे मनसेला मराठी तरुणांचं झालेलं उत्स्फूर्त मतदान. त्यातून राज ठाकरेंची ताकद वाढल्याचं नक्की झालं. असंच होत राहिलं, तर वेगळं अस्तित्व कायम राखून राज आणि उद्धव या दोघांच्या सेना कधी ना कधी एकमेकांशी हातमिळवणी करू शकतील. कारण दोघांनाही एकमेकांच्या मदतीशिवाय फार मोठी उडी घेणं, निव्वळ अशक्य असल्याचं स्पष्ट दिसतंय.

हा काही अचानक आलेला निष्कर्ष नाही. राजनी मराठीचा मुद्दा जोशात घेतला तेव्हाच एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतल्यावर सेना-भाजप युतीची प्रक्रिया सुरू झाली होती, तसंच. त्यातून २३ नोव्हेंबरला राज मातोश्रीवर बाळासाहेब आणि उद्धवना भेटले होते. दोन ध्रुवांवर असलेले हे चुलतभाऊ कधी ना कधी एकमेकांच्या सोबत जाऊ शकतात, हे दाखवणारी ही नांदी होती. पण लगेचच झालेल्या अतिरेकी हल्ल्यानं सगळंच थांबलं. पण शिववड्याच्या मुद्द्यावर महापालिकेत दोघांचेही पक्ष एकत्र आले होते.

दादू आणि राजा. तसे ते फार पूवीर् एकत्रच होते. दोघेही हुशार, हजरजबाबी, सुसंस्कृत आणि कलाकार. एक सभा गाजवत होता. दुसरा 'सामना'च्या निमित्ताने पक्षाच्या अॅडमिनिस्ट्रेशनशी जुळत होता. दोघेही एकमेकांना पूरक वाटणारे. पण मीनाताईंच्या निधनाने ठाकरे कुटुंबाला बांधून ठेवणारा दुवाच निखळला. त्यात सत्तेमुळे रोज नवी नाट्यं घडत होती. एकता कपूरच्या सिरिअलना लाजवेल असा फॅमिली ड्रामा ठाकरे घराण्यात घडत होता. शह-काटशह सुरूच होते. उद्धव पक्षावर मांड ठोकत होते. राज प्रवाहापासून दूर जात होते. राजच्या वादग्रस्त अनुमोदनाने उद्धवची कार्याध्यक्ष म्हणून तख्तपोशी झाली. तेव्हापासून राज धुमसत होते. त्याचा भडका कल्याणला उडाला. रेल्वे परीक्षांना आलेल्या उत्तर भारतीयांना राजच्या कार्यर्कत्यांनी तडी दिली. त्यात उद्धवचं 'मी मुंबईकर' वगैरे राजकारण साफ संपलं. विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत सेनेचा सुपडा साफ झाला. त्याचं पर्यवसान राजच्या नवनिर्माणात झालं. तेव्हा भूमिका १८० अंशात बदललेली होती. कल्याणला राडा करणारे राज समन्वयाची भाषा करत होते. चौरंगी झेंडा, विकासाची ब्लू प्रिंट वगैरे. नेमकं तेव्हाच उद्धवच्या तांेडी मात्र आक्रमक हिंदुत्व होतं. ते शिवसेना गीत गात मराठी अस्मितेवर महापालिकेसाठी मतं मागत होते. दोघंही आपापल्या व्यक्तिमत्त्वाला सूट न होणाऱ्या गोष्टी करत होते.

महापालिकेची सत्ता आली. उद्धवनी आपला जुना समन्वयाचा कोट पुन्हा अलगद घातला. लोडशेडिंग, शेतकऱ्यांंच्या आत्महत्यांवर त्यांच्या लाखालाखांच्या सभा होऊ लागल्या. तेव्हाच राज यांनी आपला चौरंगी बुरखा भिरकावत मराठीचा नावाने अमिताभ बच्चनवर हल्लाबोल केला. दोघेही आपापल्या भूमिकेत परत आले होते.

उद्धव शेतकऱ्यांचे प्रश्न उचलत होते. त्यामागे शेतकऱ्यांंविषयीचा कळवळा नव्हता. तर सत्ता मिळवण्यासाठी पक्षाचा पाया वाढवण्याची सक्ती होती. तसंच राज यांचा राडा मराठी माणसाच्या प्रेमापोटी नव्हता. उद्धव यांचं यशस्वी होणारं राजकारण उधळून लावण्याचा उद्देश त्यामागे होता, हे स्पष्ट होतं. पण त्या राड्यांतून सर्वसामान्य मराठी घरांमधल्या नव्या पिढीचं करिअर बरबाद होऊ घातलंय. एसेमेस पाठवत आणि ऑॅफिसात मराठीच्या चर्चा करणाऱ्यांंचं यात काहीच बिघडत नाही. झालंच तर कॉपोर्रेटी घोळक्यांत मराठी वट मिरवता येते. या पांढरपेशांची मुलं रस्त्यावर उतरत नाहीत. केस अंगावर घेत नाहीत. साहेब, साहेब म्हणत जिंदगी वाया घालवणार नाहीत. बाळासाहेबांसाठी मुंबईतली चाळ, झोपडपट्ट्यांंमधली एक पिढी जशी संपली, तेच पुन्हा घडत होतं. राडा सुरूच राहिल्यास पुन्हा पुन्हा घडणार आहे.

तरीही सर्वसामान्य मराठी मन राजना आपला तारणहार मानून भजनी लागलं आहे. खरंच राजना मराठीसाठीच काही करायचं असतं, तर मनसेची स्थापना त्यासाठीच झाली असती. तेव्हा चौरंगी झंेडा कशाला आला असता? पुढे ज्या हिंदी चॅनलवर त्यांनी टीका केली, त्यांना हिंदीतून स्पेशल इंटरव्यू देत प्रसिद्धी लाटण्यात काहीच खटकत कसं नव्हतं? आणि त्याआधीच्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिदीर्त त्यांनी मराठीसाठी काय केलं? मायकेल जॅक्सनला नाचवून उभारलेल्या शिवउद्योग सेनेचं मातेरं झालं. गोखले रोडवरच्या पालिका शाळेत शिवउद्योग सेनेचं ऑॅफिस होतं. त्यात राजनी कधी पाऊलही टाकलं नव्हतं.

असं असूनही मराठी माणूस राजच्या मागे जात आहे, हे निवडणुकीत स्पष्ट होतंय. सगळं असूनही मराठी माणसात असुरक्षित अल्पसंख्यक मानसिकता बनवण्याचं शिवसेनेच्या मेहनतीचंच हे फळ होतं. तीच मेहनत मनसे सेनेच्या विरोधात वापरते आहे. राजना मिळालेल्या प्रतिसाद आणि प्रसिद्धीने शिवसेना नेत्यांना हादरवलंय. सेनेचा श्वास आणि प्राण असलेला मराठीचा मुद्दा अन्य कोणी घेऊन जाणं परवडणारं नाही. राजराड्यानंतरची ही पहिलीच निवडणूक. लोकसभेच्या मतदानात राजनी विधानसभेत सेनेला त्रास देण्याची क्षमता सिद्ध केलीय. मुंबई, ठाणे आणि नाशकात तरी. इथल्या विधानसभेच्या ६५ मतदारसंघांत सेनेला अडचण झालीय. इथे मात खाल्ली तर सत्ता दुरापास्त, हे सेना नेते जाणून आहेत आणि आपली उडी या महानगरांबाहेर नाही, हे मनसेलाही ठाऊक आहे. फक्त मराठीच्या नावाने ती उडी घेणं शक्यही नसल्याचं शिवसेनेचाच इतक्या वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे दोघांनी एकत्र येण्याशिवाय फार काही पर्याय उरलेले नाहीत. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसशीच आघाडी करून सत्ता आणण्याचा रस्ता आखून दिला आहेच. त्यामुळे हाच फॉर्म्युला उद्धव, राजच्या बाबतीतही घडू शकतो. दोघं एकमेकांना पूरक ठरून मोठी ताकद बनू शकतात. पण म्हणून हे दोघे एकत्र आल्याने मराठी माणसाचं भलंच करतील, अशी खात्री कुणीच देऊ शकत नाही.

हे व्हायला बरेच दिवस लागतील. पाच महिने किंवा पाच वर्षंदेखील. तोपर्यंत 'टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह' बघून घ्यायला हरकत नाही एकदा. टीव्हीवर लागतो तो अधून मधून


Explore and discover exciting holidays and getaways with Yahoo! India Travel Click here!

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Mail

Stay in Touch

Stay connected

and manage your life

Yahoo! Toolbar

Get it Free!

easy 1-click access

to your groups.

Yahoo! Groups

Start a group

in 3 easy steps.

Connect with others.

.

__,_._,___

0 comments:

sponsers