महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नुसतीच हवा आहे, त्यांच्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कोणताही धोका नाही, मनसे म्हणजे इधरसे उधरसे या आणि अन्य शेलक्या शब्दात मनसे व राज ठाकरे यांची खिल्ली उडवणाऱया उद्धव ठाकरे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुंबई, ठाणे व नाशिक येथील निकालांनी जमिनीवर आणले आहे. नुसते जमिनीवरच आणले नाही, तर पार नाक कापले गेले आहे. पक्षाचा वरिष्ठ नेता हा बदलत्या परिस्थितीचा सर्व बाजूनी विचार करून निर्णय़ घेणारा असावा लागतो. प्रसंगी एक पाऊल मागे जाऊन पडते घेण्याचीही तयारी असावी लागते. परंतु उद्धव यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्या ताकदीचा गंभीरपणे विचार केलाच नाही किंवा त्यांच्या समवेत असणाऱया सल्लागारांनी त्यांना चुकीचा सल्ला देऊन अंधारात ठेवले. पण केवळ सल्लागारांवर विसंबून न राहता नेत्यांने आपली स्वताची बुद्धी, कौशल्य वापरायचे असते, ते उद्धव यांनी केले नाही. मनसे आपले काहीच वाकडे करू शकणार नाही, या भ्रमात ते राहिले आणि काय झाले ते आता कळून आले आहे. नशीब समजा ४८ ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले नाही, असे राज ठाकरे निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते. खऱोखरच सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागांवर मनसेने उमेदवार उभे केले असते तर शिवसेनेचे आत्ता जेवढे खासदार निवडून आले, तेवढे तरी निवडून आले असते की नाही, याची शंका वाटते. वडिलांच्या पुण्याईवर उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद मिळाले. राज ठाकरे शिवसेनेत असतानाही त्यांना वेळोवेळी उद्धव आणि त्यांच्या समर्थकांकडून डावलले जात होतेच. उद्धव यांना सर्व सुत्रे स्वताच्या हातातच ठे्वायची होती. खऱे तर त्यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे, पुणे, नाशिक आदी भागाची जबाबदारी आपल्याकडे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी उद्धवकडे असा प्रस्ताव मांडला असल्याचे सांगितले होते, परंतु त्याला उद्धव यांनी नकार दिला असे म्हणतात. नारायण राणे यांच्या सारखा ताकदवान नेताही उद्धव यांच्यामुळे शिवसेना सोडून बाहेर पडला. बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेना गेली अनेक वर्षे सत्तेवर आहे. या काळात त्यांनी मुंबईसाठी काय केले, मोठे काही सोडाच परंतु मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीत करणेही त्यांना जमले नाही. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्दयावर महापालिका प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर शिवसेना जागी झाली. आणि मराठीचा मुद्दा आमचाच असून तो राज ठाकरे यांनी पळवला असल्याचे सांगितले जाऊ लागले. अरे मग तुम्ही इतकी वर्षे काय केले, साधी ही गोष्टही तुम्हाला करता आली नाही. निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी फेकलेल्या जाळ्यात उद्धव ठाकरे फसले. ज्या पक्षाशी आपले विचार आणि राजकीय भूमिकाही जुळत नाही, त्यांच्याबरोबर युती करायला हे महाराज निघाले होते. त्यासाठी इतकी वर्षे मित्र असलेल्या आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर एकत्र आलेल्या भाजपला सोडचिठ्ठी द्यायचीही त्यांनी तयारी केली होती. उद्धव यांच्यावर पवार यांनी काय भुरळ घातली होती, काय माहित, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेल्या आणि जणू काही आपणच पंतप्रधान होणार आहोत, असे ढोल वाजवणाऱया पवार यांना आणि त्यांच्या पक्षाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. त्यांच्या पक्षाला खासदारांची दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. म्हणजे शिवसेना पवारांबरोबर गेली असती तर काय झाले असते, कॉंग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार करू, भाजपला स्वताच्या ताकदीवर काही करता येणार नाही, राज्यात राष्ट्रवादीचेच खासदार अिधक संख्येने निवडून येतील, मग लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीलाही युती करून राज्यातील सत्ता हस्तगत करू. अजित पवार मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अशी ऑफर पवारांनी उद्धव यांना दिली होती का, पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पवार आणि त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने पार चौथ्या क्रमांकावर फेकून दिले आहे. यातून आता तरी उद्धव यांनी धडा घ्यावा. ज्या पवारांबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये कधीच विश्वास नव्हता, पवार म्हणजे विश्वासघात, बेईमानी, बोलतील एक आणि करतील दुसरेच असे ज्यांच्याबद्दल नेहमी बोलले जाते, त्यांच्याबरोबर युती केली असती,तर शिवसेनेची अवस्थाही आज पवार यांच्या पक्षासारखी झाली असती. काही ठिकाणी उमेदवार देण्यातही शिवसेनेची चूक झाली. त्याचे सगळ्यात मोठे उदाहऱण म्हणजे ठाण्यातून दिलेले विजय चौगुले हे उमेदवार, हे एकेकाळचे गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी. राष्ट्रवादी पक्षातील. ते तुमच्याकडे म्हणजे शिवसेनेत आले म्हणजे त्यांची सर्व पापे धुवून निघाली का, उलट मनसेने त्याठिकाणी राजन राजे यांच्यासारखा हुषार व सुशिक्षित उमेदवार दिला. खरे तर ठाण्यातून आनंद परांजपे यांनाच शिवसेनेने उमेदवारी द्यायला पाहिजे होती. कल्याणची जागा भाजपलाच देऊन भिवंडीची जागा त्यांनी स्वताकडे ठेवायला हवी होती. कारण भिवंडीत त्यांचे विद्यमान आमदार योगेश पाटील होते. बरे तेही लोकसभेसाठी इच्छुक होते. कदाचित तिथे योगेश पाटील निवडुन आले्ही असते. कल्याणची जागा भाजपला दिली असती आणि भाजपनेही तेथे ब्राह्मण व सुशिक्षित उमेदवार दिला असता तर तीही जागा कल्याण-डोंबिवलीच्या मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्याच पारड्यात टाकली असती. म्हणजे ठाणे व कल्याण हमखास आणि मिळाली असती तर भिवंडी अशा तीनही जागा युतीला मिळू शकल्या असत्या. पण तेथेही उद्धव यांचा निर्णय चुकला. ठाणे, मुंबई, कल्याण, नाशिक आदी सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी लाखाच्या वर मते घेतली आहेत. मनसेला गृहीत न धरणाऱया आणि बालेकिल्ल्याला मनसेमुळे काहीच धोका नाही, अशा भ्रमात राहिलेल्या उद्धव यांनी किमान आता तरी डोळे उघडून जमिनीवर यावे. भारतीय जनता पक्षाने याची गंभीरपणे दखल घेऊन दोन्ही भावांमध्ये पॅचअप करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. स्वताचा इगो सोडून उद्धव यांनी वास्तवाचे भान राखून योग्य तो निर्णय़ घ्यावा. कोणी काही म्हटले तरी राज ठाकरे यांनी स्वताच्या ताकदीवर आपला जोर दाखवून दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि इतके होऊनही उद्धव तसे करणार असतील तर तो स्वताच्या आणि शिवसेनेच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखेच ठरेल. तेव्हा अजून वेळ गेलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप चार ते पाच महिने बाकी आहेत. उद्धव यांनी राज ठाकरे यांच्याशी जमवून घ्यावे, लोकसभेच्या निकालांनी तेच दाखवून दिले आहे. तसे केले नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच होऊ शकेल आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जी लाखो मते मिळाली त्यावरून विधानसभा निवडणुकीत मनसेचे किमान २० ते २५ आमदार नक्कीच निवडून येतील, याची सर्वसामान्य मतदारांनाही आता खात्री झाली आहे. त्यावेळीही कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर राज ठाकरे यांच्या आमदारांचा पाठिंबा सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरू शकतो. तेव्हा कॉंग्रेसला राज्यातून पुन्हा एकदा हद्दपार करायचे असेल तर शिवसेना-भाजप आणि मनसे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसे झाले तरच मतविभागणी न होता कॉंग्रे-राष्ट्रवादीचा पाडाव करता येईल. तेव्हा या सगळ्याचा उद्धव यांनी विचार करावा आणि आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांनी मेहनत घेऊन सत्तेची फळे चाखण्यापर्यंत उभी केलेली शिवसेना पार भुईसपाट होईल आणि ती वेळ फार दूर नाही... |
0 comments:
Post a Comment