महेश मांजरेकर यांनी आजवर गाठलेला पल्ला आपल्याला थक्क करून सोडतो. यशापयशाचे अनेक चढउतार अनुभवत, अभिनय-निर्मिती-दिग्दर्शनाचे विविध पैलू मालिका, नाटक व चित्रपट माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांपुढे उलगडून दाखविले आहेत. नुकतीच त्यांची प्रमुख भूमिका असलेला "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. त्याने तिकीट खिडकीवर आपली करामत तर दाखविलीच आहे; पण प्रामुख्यानं हरवत चाललेल्या मराठी माणसाच्या अस्मितेला साद घालण्याचं काम या चित्रपटानं केलं आहे.सामान्य मराठी माणूस भव्यदिव्य स्वप्न बघतो का? तो रुळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेवर प्रवास करतो का? ज्या क्षेत्रात त्याने प्रवेश केलाय, त्या क्षेत्रातील यशाचं शिखर तो गाठू शकतो का? या सर्व प्रश्नाचं उत्तर "होय' असं आपण देऊ शकतो. तो मराठी माणूस म्हणजे महेश मांजरेकर! महेश मांजरेकरांनी आजवर गाठलेला पल्ला आपल्याला थक्क करून सोडतो. यशापयशाचे अनेक चढउतार अनुभवत, अभिनय-निर्मिती दिग्दर्शनाचे विविध पैलू मालिका, नाटक व चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांपुढे सादर करून आता "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट घेऊन ते आपल्यासमोर आले आहेत. त्यांचा हा नवा चित्रपट नुकताच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. त्याने मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचं काम केलं असून त्याची बॉक्स ऑफिसवरही वेगाने घोडदौड सुरू आहे.
"डॉक्टर तुम्हीसुद्धा?' "ऑल दि बेस्ट'सारखी नाटकं. "एक शून्य शून्य' ही दूरदर्शन मालिका, "निदान', "अस्तित्व', "वास्तव'सारखे चित्रपट हे त्यांच्या कारकिर्दीत काही प्रमुख टप्पे. कलात्मक व व्यावसायिक निर्मिती यांचा अनोखा मेळ त्यांच्या कलाकृतींमधून आपल्याला दिसतो. स्त्री-वादाचा जबरदस्त पुरस्कार करणारा "अस्तित्व', एड्ससारख्या नव्यानेच चाहूल ठेवणाऱ्या आजारावर आधारित "निदान' हे चित्रपट दिग्दर्शित करणारे महेश मांजरेकर दुसरीकडे "आई', "जिस देश में गंगा रहता है'सारखे तद्दन व्यावसायिक चित्रपट देतात याचं कुतूहलमिश्रित आश्चर्य आपल्याला वाटतं. ते मात्र यावर अगदी अनपेक्षित प्रतिक्रिया देतात.
"मला या क्षेत्राचं ग्लॅमर नाही वाटत! मी कोणत्याही क्षेत्रात गेलो असतो, तरीही आज ज्या पद्धतीने काम करतोय त्याच पद्धतीने काम केलं असतं. मी "अस्तित्व'सारखा चित्रपट केला म्हणजे खूप काही वेगळं केलं, असा आव आणणार नाही. मला ज्या कथा भावतात, ज्या संकल्पनेवर मला नाटक वा चित्रपट करावासा वाटतो त्यावर मी तो करतो. "डॉक्टर तुम्हीसुद्धा' मला स्वतःला खूप भावलं होतं. त्यामुळे सुरुवातीस थोडा तोटा सहन करून ते चालवलं. "ऑल दि बेस्ट' चाललं नसतं तर मी या क्षेत्रात राहिलो असतो का, ते मलाच ठाऊक नाही. "आई'च्या यशाने मला आत्मविश्वास दिला. "अस्तित्व' व "निदान' या दोन काळाच्या खूप पुढे असलेल्या फिल्मस् मी केल्या. अर्थात, आपल्या इथे वेगळं करणाऱ्याला नेहमी चांगलं म्हटलं जातंच असं नाही. कधी कधी त्याला मूर्खात काढलं जातं. याला व्यवसाय समजत नाही असं म्हणून हिणवलं जातं. म्हणजे वेगळं केलं तरीही प्रॉब्लेम व केवळ व्यावसायिक निर्मिती केली, तर गल्लाभरू चित्रपट करतो म्हणून दुसरा एक वर्ग हिणवणार! म्हणूनच म्हटलं, मला जे करावंसं वाटतं ते मी करतो. "निदान' मात्र योग्य तऱ्हेने वितरित व्हायला हवा होता, असं मला आजही मनापासून वाटतं. "दे धक्का'सारखा चित्रपट मी मकरंदला घेऊन केला तेव्हासुद्धा मला लोकांनी वेड्यात काढलं. मकरंदचा रोल त्याच्या विनोदी इमेजमध्ये बसणारा नव्हता. पण मला मात्र पूर्ण खात्री होती. थॅंक्स टू झी टॉकीज! त्यांच्यामुळे "दे धक्का' सर्वत्र पोहोचला, लोकांना तो खूप आवडला. मात्र चित्रपटांना पारितोषिक जाहीर करणाऱ्या परीक्षकाचं मला आश्चर्य वाटतं."
मराठीतून काम करीत असतानाच तुम्ही हिंदी चित्रपटांचीसुद्धा निर्मिती करता. "कॉंटे', "मुसाफिर'सारख्या चित्रपटातून तुम्ही निर्माण केलेली इमेज जाणीवपूर्वक आहे का?
- नाही! संजय गुप्ताने मला "कॉंटे'तील भूमिकेची ऑफर दिली. मीही इथे काही वेगळं करता येईल म्हणून तो रोल केला. सोबत अमिताभ बच्चनसारखा अभिनेता होता. मात्र या दोन चित्रपटांतून वेगळी इमेज वगैरे मी काही निर्माण केलेली नाही. चंदूच्या "मीराबाई नॉट आऊट' मधली माझी भूमिका वेगळी होती. दुर्दैवाने तो चित्रपट न चालल्यामुळे तो रोल लोकांच्या समोर आला नाही. मी हिंदी किंवा मराठी असा भाषांचाही विचार करीत नाही. चित्रपटाला खरं तर भाषा नसावीच. ते दृश्यमाध्यम आहे. मी स्वतः हिंदी-मराठी असा भेदही करीत नाही. सर्व सेटवर मी सारखाच वागतो. माझं युनिट, माझे सहकारी मराठी आहेत. मात्र याचा मला "कॉम्प्लेक्स' नाही.
मराठी माणसातील या "कॉम्प्लेक्स'वर "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' ही तुमची प्रतिक्रिया आहे का?- मी काहीसा चिडून हा चित्रपट तयार केलाय. प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला तपासून पाहावं असं मला वाटतं. आपण आपल्याच प्रदेशात आपली काय प्रतिमा निर्माण तयार केलीय हे त्याने पाहायला हवं. केवळ भांडून, बोलून व घोषणा देऊन काहीही साध्य होणार नाही. आपण आपली पोझिशन स्ट्रॉंग करायला हवी. इतरांनी आपल्याला मानाने वागवायला हवं. सध्याच्या समाजव्यवस्थेबद्दल मराठी माणसाला चीड यावी व त्याने योग्य ती पावले उचलावीत यासाठी मराठी लोकांना आरसा दाखविण्याची गरज आहे. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यामधून हा आरसा दाखविण्याचा प्रयत्न केलाय.
'शिवाजी'ची कल्पना कोणाची?- ही कल्पना माझ्याच डोक्यात आली. मराठी माणूस "मोडेन पण वाकणार नाही' या बाण्याने वागतो. त्याला टिळक-आगरकरांबद्दल आदर आहे. मात्र सर्वाधिक आदर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाटतो. त्यामुळे मराठी माणसाला योग्य दिशा दाखविण्यासाठी या इतिहासपुरुषाची आम्ही निवड केली. यात संजय पवारचे टोकदार संवाद आहेत. माझा सर्वात जुना सहकारी संतोष मांजरेकरने हा चित्रपट दिग्दर्शित केलाय.
त्याशिवाय या चित्रपटाच्या बजेटबद्दलही बरंच काही छापून आलं होतं. याच्या बजेटचा मी उगीच बाऊ करणार नाही. कारण चित्रपटाच्या गरजेनुसार खर्च करावाच लागतो. आज प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट आपला म्हणून स्वीकारला आहे. केवळ मराठीच नाही, तर महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी प्रेक्षकांनीदेखील त्याला डोक्यावर घेतलं आहे. यातल्या दिनकर भोसलेची व्यथा नाही तर आजच्या विचित्र परिस्थितीत जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाची कथा आहे. काही जण मी "लगे रहो मुन्नाभाई'वरून ही कथा चोरली असा आरोपदेखील माझ्यावर करीत आहेत. पण मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतीक हे शिवाजी महाराजच आहेत. त्यांचं संपूर्ण जीवनच आपल्यासाठी प्रेरणा देणारं आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी सध्याच्या परिस्थतीवर प्रकाश टाकला तर त्यात काहीच चुकीचं नाही.
त्यात 'शिवाजी'ची भूमिका तुम्ही स्वतः साकारली आहे!- आमच्या चित्रपटातील नायक सचिन खेडेकर, त्याच्या व्यक्तिमत्त्वासमोर अधिक तगडे व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे शिवाजी महाराज असणं ही पटकथेची गरज होती. त्यामुळे सर्वांनी मलाच ही भूमिका करण्याची गळ घातली. माझ्यासाठीसुद्धा ते आजपर्यंतच सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि म्हणूनच मी ती भूमिका स्वीकारायचा निर्णय घेतला.
तुम्ही फार काही वेगळं केलं नाही असं म्हणत असलात तरीही तुमच्या चित्रपटातून एक सूत्र असतं, प्रबोधन असतं, तुमचा पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे?- मी हिंदी चित्रपट बहुधा मे मध्ये सुरू करीन. मराठीत मला भरत जाधवला घेऊन "सतरा साली' हा चित्रपट करायचा आहे. "सतरा साली'चं उत्तर चटकन तुम्हालाही देता येणार नाही. मात्र आपण आजच्या कॉम्प्युटर युगात लहान मुलांना मात्र एक ते तीसचे पाढे जबरदस्तीने पाठ करायला लावतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना आपण वह्या-पुस्तकांचं ओझं वाहणारे हमाल केलंय. यात मुख्य भूमिका असते पालकांची! या शिक्षणव्यवस्थेवर भेदकपणे मला हल्ला करायचा आहे. पालकांना समज येण्यासाठी मला "सतरा साली'ची निर्मिती करायचीय!
महेश मांजरेकर सामान्य मराठी कुटुंबात वाढले, त्यांनी आपली कारकीर्द नियोजनबद्ध केली. आज या मराठी माणसाला इराण्याकडे बसून शांतपणे चहा पिता येत नाही की गाडीवर वडा-पाव खाता येत नाही, ही त्यांची खंत आहे. मात्र प्रत्येक मराठी माणसाने महेश मांजरेकरांसारखी आयुष्याची आखणी केली तर आपल्याच मुलखात त्याला 'परकं' व्हावं लागणार नाही!
0 comments:
Post a Comment