sponsers

Tuesday, May 19, 2009

[GarjaMaharashtraMaza] मंत्रालयावर भगवा फडकणे कठीण?



 
येत्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवण्याचे शिवसेनेचे स्वप्न दूरावले आहे असा इशारा लोकसभा निवडणूक निकालाने दिला आहे. आणि याला कारणीभूत आहे अवघी दोन वर्षे वयाची मनसे.

लोकसभेच्या महाराष्ट्रातून फक्त बारा जागा मनसेने लढवल्या होत्या. आणि यापैकी बहुसंख्य ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी शिवसेना अथवा भाजपाचे उमेदवार पाडण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे हे स्पष्ट आहे. इशान्य मुंबईत तर शिशिर शिंदे यांनी जवळपास दोन लाख मते घेतली. इतरांनीही लक्षणीय मते पहिल्यांदाच निवडणूक लढवताना घेतली आहेत.

मनसे उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार नाहीत याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती, प्रश्न होता ते कोणाला पाडणार याचा. त्यांनी शिवसेनेला फटका दिला हे स्पष्ट झाले. मनसेचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नेमके हेच साधायचे होते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्यामुळे ते बाहेर पडले. पण दोघांचीही व्होट बँक एकच होती. दोघांनी या बँकेतून मतरूपी पैसे काढायचा प्रयत्न केला. त्यात या वेळी राज यशस्वी झाले, कारण शिवसेनेचे चेक यात वटणे कठीण झाले होते. त्यांनी हिंदुत्वाच्या बँकेतही खाते उघडले होते. त्यामुळे या बँकेतील खातेदार नाराज झाले. आपले हित हा बडा ठेवीदार जपत नाही असे त्यांना वाटत होते.

त्यांना पर्याय मिळाला मनसेचा. राज यांचा. मराठीची बाजू त्यांनी इतकी उचलून धरली की ते तुरुंगातही गेले. दणक्यात भाषणे करताना त्यांनी, त्यांच्या काकांचा वारसा चालवला. ४२ सालापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हेच केले होते. तेव्हा दक्षिणेकडून होणाऱ्या आक्रमणाबद्दल ते बोलत राहीले. यात मराठी बाणा, संस्कृती लोप पावत आहे असे ते सांगू लागले. मराठी तरुणांना पोट भरणेही मुंबई शहरात कठीण झाले आहे अशी भूमिका त्यांनी घेतली.

आज राज आगखाऊ भाषणे करत आहेत ती उत्तरी आक्रमणाबद्दल. हिंदी भाषा आणि हिंदी भाषिक यांच्यामुळे मराठी भाषा गुदमरते आहे, मराठी युवकांवर नोकरी मागत वणवण करायची वेळ आली आहे हे त्यांनी इतक्या आक्रमकपणाने मांडले की तरुण उद्धव यांच्याकडून राज यांच्याकडे वळले. त्यांच्या झुंडीच्या झुंडी मनसेत गेल्या. तरुणांना नेहमी आक्रमकपणाची भाषा आवडते. बाळासाहेब लोकप्रिय होण्याचे हे एक प्रमुख कारण होते. उद्धव हे मवाळ आहेत. अर्थात हा काही त्यांचा दोष नाही. त्यांची ती कार्यशैली आहे. पण त्यांनी मराठी बाणा सोडला असे चित्र निर्माण झाले.

किंबहुना या वेळी कार्याध्यक्षांनी गेली दोन वर्षे महाराष्ट्र पालथा घातला होता. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने अत्यंत गचाळ काम केले आहे. उद्धव यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्याला प्रतिसादही भरपूर मिळाला. पण आश्चर्य म्हणजे ऐन निवडणूक काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गुप्त समझोता झाल्याच्या बातम्या पसरल्या. त्यांचे वेळीच खंडन करण्याची चपळाई कार्याध्यक्षांनी दाखवली नाही.

आता राज ठाकरे यांची पुढची चाल असेल हा कुतुहलाचा विषय असेल. केवळ मराठीचा मुद्दा ते फार काळ चालवू शकणार नाहीत. लोकसभा निवडणुकीचा आधार घेतला तर ते किमान चाळीस विधानसभा मतदारसंघांत प्रभाव पाडू शकतील हे उघड आहे. विधानसभा निवडणूक ही वेगळया मुद्यांवर लढवली जाणार हेही नक्की. पण एक नक्की की ते सध्या महाराष्ट्रातील तरुणांचे एकमेवनेते आहेत. मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत हा एक भाग झाला, पण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार हा पट्टा मराठी माणसाच्या हातून जवळपास निसटला आहे.

खरे म्हणजे राज यांनी शिवसेना आणि भाजपला जसे अडचणीत आणले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही. किंबहुना शिवसेना आणि भाजपा युती आता राहील का? मुळात युतीत अविश्वासाचे वातावरण आहे. तडे आता दिसायला लागतील. भाजपा कदाचित आता मनसेशी जुळवून घेता येईल काय याची चाचपणी सुरू करेल. काँग्रेसला मनसेमुळे मिळालेल्या यशामुळे बळ येऊन त्यांनी राष्ट्रवादीचा हात सोडला तरी आश्चर्य वाटायला नको. थोडक्यात नवीन राजकीय समीकरणे घडवून आणण्याचे सार्मथ्य मनसेला एकही जागा न मिळता मिळणार अशी चिन्हे आहेत. एक मात्र खरे की राज यांच्या यशामुळे सर्वांत आनंद झाला असेल तो काँग्रेसला. कारण मुंबईत या पक्षाला मिळालेल्या यशाला मनसेच जबाबदार आहे. नाहीतर काँग्रेसला इतके यश मिळण कठीण झाले असते.

राज ठाकरे यांना यश मिळण्यात आणखी एक बाब म्हणजे शिवसेनेतील तरुण राजकडे आणि पालक शिवसेनेत. चाळीस वर्षांपूर्वी हेच घडले होते. तेव्हा तरुण बाळासाहेबांबरोबर आणि आईबाप समाजवादी अथवा काँग्रेसजन होते. आता शिवसेनेकडून मनसेकडे सैनिकांचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

यात दुर्दैवाची बाब अशी की, गेली चार दशकांहून मराठी माणसाला आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटते आहे. महाराष्ट्रावर शिवसेना आणि भाजपा युतीचे राज्य होते, गेली अनेक वर्षे मुंबई, ठाणे महानगरपालिकांवर शिवसेनेचे पकड आहे. तरीही मराठी माणूस येथून बाहेर फेकला जात आहे. फेरीवाले, रिक्षावाले हे उत्तर भारतीय आहेत. मराठी माणूस उद्योग करत नाही, त्याला सुखासीन नोकरी लागते अशी टीका होते, पण पोटाला चिमटे बसायला लागले की मराठी माणूसही पाट्या उचलायला लागतो हे आपण बघतो. त्यामुळे राज हे मराठी तरुणांमध्ये कोणती भावना पसरवतात हे बघायला हवे.

या निकालाच्या निमित्ताने अनेक बाबी स्पष्ट झाल्या. भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. राम नाईक यांच्या कामाबद्दल कोणाच्या मनात शंका नसते. पण गेली चार दशके तेच, नगरसेवक, आमदार आणि खासदार म्हणून या भागात दिसत आहेत. भाजपाला येथे दुसरा चेहरा नाही. किरीट सोमय्या यांचा पराभवही धक्कादायक आहे. ही जागा प्रमोद महाजन यांची कन्या पुनम महाजन यांना मिळावी यासाठी गोपिनाथ मुंडे यांनी कंबर कसली होती. ते न झाल्याने निराश झालेले मुंडे यांनी सोमय्या यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले का या प्रश्नाची चर्चा होत राहील.

पुण्यात काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांच्याविरुद्ध वातावरण असतानाही मुंडे आणि त्यांचे पुण्यातील यांनी पुरेसे आक्रमक धोरण स्वीकारले असते तर ही जागा भाजपाला मिळाली असती अशी कुजबुज आता होत आहे. तेथे किंवा इतरही मायावती यांचा हत्ती फार चालला नाही असे दिसते आहे. मायावती यांचा आक्रस्ताळेपणा महाराष्ट्रात खपत नसेल तर ती समाधानाची बाब आहे. सोशल इंजिनियरींग वगैरे संकल्पना ऐकायला चांगल्या आहेत, पण यावेळी खुद्द उत्तर प्रदेशात मायावतींचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते आहे तेथे महाराष्ट्राचे काय अशी स्थिती झाली आहे.


Explore and discover exciting holidays and getaways with Yahoo! India Travel Click here!

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

Yahoo! Groups

Dogs Owners Group

Join Do More For Dogs

pet community

Yahoo! Groups

Mom Power

Kids, family & home

Join the discussion

.

__,_._,___

0 comments:

sponsers