मुसळधार पावसामुळे कोकणामध्ये आलेले पूर ओसरल्यामुळे जरा हायसे वाटते न वाटते तोच मुंबईमध्ये पुरविले जाणारे पाणी दूषित असल्याच्या वार्तांनी सगळ्यां
चेच धाबे दणाणले आहे. 'नेमेचि येतो मग पावसाळा'च्या चालीवर नेमेचि येतो मग हिवतापा'ने मुंबईकरांना हैराण केलेच आहे. त्याच्या जोडीला स्वाइन फ्लूनेही दणके द्यायला सुरुवात केली आहे. सततच्या पावसाळी हवेमुळे दम्याचा विकार असणाऱ्यांची छाती धपापायला लागलीच आहे. या साऱ्याची कमी आहे म्हणून की काय, आता देशाच्या आथिर्क राजधानीमध्ये होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याचे उघड झाले आहे. मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये दोष नसून पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर ते जिथे साठविले जाते, तिथे ते दूषित होत असल्याचेही आता सांगितले जात आहे. या साऱ्याची जबाबदारी नेमकी कोणाची याच्या ऊहापोहामध्ये वेळेचा अपव्यय न करता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर पाण्यातील दूषित घटक कमी कसे करता येतील याबाबतची योजना तयार करणार आहेत, ही दिलासादायक बाब आहे. पाणी वाहून नेणारे पाईप १०० वर्षांचे जुने आहेत, पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठला आहे, पाण्याच्या पाइपांना अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांचा विळखाच पडला आहे, अशी अनेक कारणे पाणी दूषित होण्यासाठी पुढे केली जात आहेत. या कारणांव्यतिरिक्त आणखीही काही घटक पाणी दूषित होण्यास जबाबदार आहेत काय याचाही शोध घ्यायला हवा. परंतु त्यामुळे फारतर नागरिकांना शुद्ध पाणी का पुरवले जात नाही, याचा उलगडा होऊ शकेल; परंतु तो होऊन मूळ प्रश्न सोडविण्यासाठी काही उपाययोजना केली जाणार नसेल, तर हा साराच ऊहापोह व्यर्थ आहे. अगोदरच मुंबईची हवा ही काही आरोग्यदायी म्हणून प्रसिद्ध नाही. समुदाला खेटूनच उभ्या असलेल्या या नगरीमध्ये अनेक ठिकाणी पाण्यात भर घालून जमीन 'निर्माण' करूनच या नगरीचा विस्तार होत गेला आहे. तसा तो होत असताना पाण्याचा पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि समुदाला येणारी भरती-ओहोटी लक्षात घेऊन केली जाणारी गटारांची रचना याबाबत दक्ष राहणे आवश्यक होते. परंतु शहराचा सातत्याने विस्तार होत असतानही या बाबी दुर्लक्षित झाल्या किंवा त्या कमी महत्त्वाच्या मानल्या गेल्या. परिणामी, पाण्याचा पुरवठा आणि सांडपाण्याचा निचरा या गोष्टी मुंबईकरांसाठी जाचक ठरू लागल्या. विशेषत: पावसाळ्यामध्ये तर या दोनही गोष्टी त्रासदायक ठरू लागल्या आणि यंदा तर त्याने कहर केला. यंदा पाण्यात दूषित घटक असण्याचे प्रमाण २६ टक्क्यांवर गेले. शहराच्या एकंदर २४ वॉर्डांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचेही उघड झाले. त्यामध्ये जुहू, अंधेरी, विलेपालेर्, बोरीवली आणि दहीसर या भागातून दूषित पाण्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. त्यांचे निवारण व्हायला हवेच; परंतु पाण्याचे दूषितीकरण टाळण्यासाठी तात्काळ हालचाली करण्याची गरज आहे. अन्यथा या महानगरामध्ये अनेक रोगांच्या साथी पसरण्यास वेळ लागणार नाही. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, टायफॉईड आणि कावीळ यासारखे रोग होऊ शकतात. त्यांच्या साथी पसरल्या तर त्यामुळे या नगराच्या आरोग्यसेवेवर प्रचंड ताण येईल. सध्या हिवतापामुळेच महापालिकेच्या अनेक हॉस्पिटलांमध्ये प्रचंड गदीर् उसळलेली आहे. त्यामध्ये या इतर विकारग्रस्तांची भर पडली, तर आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजायला वेळ लागणार नाही. दुसरे असे की या आजारपणांमुळे वाया जाणारे मनुष्यतास आणि त्याचा व्यापार-उद्योग क्षेत्रावर होणारा दुष्परिणाम यांचाही विचार व्हायलाच हवा. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आजारपणामुळे फुकट जाणारे दिवसही विचारात घ्यायला हवेत. या साऱ्याचा हिशेब केला तर आता मुंबईमध्ये आणखी कोणत्याही रोगाच्या साथी पसरणे कोणत्याच अर्थांनी आपल्याला परवडणारे नाही. हे लक्षात घेऊन तरी महापालिकेने पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची साफसफाई आणि दुरुस्ती तात्काळ करायला हवी. गेल्या वषीर्पेक्षा यंदा पाणी अधिक प्रमाणात दूषित आहे, असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे यापुढे पाणी अधिकच दूषित होण्याची संभाव्यता मोठी आहे. अर्थात मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाइप चार हजार कि.मी. लांबीचे आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल करणे सोपे नाही, हे खरे आहे. परंतु हे काम कितीही अडचणीचे असले तरी करणे आवश्यक आहे. अन्यथा हे पाणी या महानगरातील जीवनाचा पोतच बिघडवून टाकेल. पाण्याला आपण जीवन म्हणतो. समर्थ रामदासांनी 'उदक तारक उदक मारक। उदक नाना सौख्यदायेक। पाहतां उदकाचा विवेक। अलोलीक आहे।।' असे म्हटले आहे. येथे मात्र सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनांनी आपला विवेक जागा ठेवून मुंबईतील पाणी सदैव तारकच ठेवावे अशीच साऱ्यांची इच्छा आहे.
Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.
Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.
Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.
Post a Comment
0 comments:
Post a Comment