Source: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6318444.cms कविवर्य नारायण सुर्वे यांची ' माझे विद्यापीठ ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्द ातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते. त्यांची ही आणि आणखी काही कविता.... माझे विद्यापीठ ना घर होते , ना गणगोत , चालेन तेवढी पायाखालची जमीन होती दुकानांचे आडोसे होते , मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता.... टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता. मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे , वाचली पाट्यांवरची बाराखडी व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत ; हातचे राखून कित्येक मारलेले गडी. हे जातीजातींत बाटलेले वाडे , वस्त्या , दारावरचे तांबडे नंबरी दिवे सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे. अशा तांबलेल्या , भाकरीसाठी करपलेल्या , उदास वांदेवाडीच्या वस्तीत टांगे येत होते , घोडे लोळण घेत होते , उभा होतो नालीचा खोका सांभाळीत. " ले , पकड रस्सी-हां-खेच , डरता है ? क्या बम्मनका बेटा है रे तू साले मजदूर है अपन ; पकड घोडे को ; हां ; यह , वाह रे मेरे छोटे नालवाले. " याकुब नालबंदवाला हसे , गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई " अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा. " म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई. याकुब मेला दंग्यात , नव्हते नाते ; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही उचलले नाही प्रेत तेव्हा ' मिलाद-कलमा '; च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही. त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले , " हे नारायणा " अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट ; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. " भेटला हरेक रंगात माणूस , पिता , मित्र , कधी नागवणारा होईन रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून. तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने ; वाटते , अजून काही पाहिलेच नाही , नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ? सदंतीस जिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ? आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस , गुटगुटीत , बाळसेदार. आतः खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे , असे ओळीवर टांगलेले उच्चार जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत हे सगळे पाहून आजही वाटते , " हे नारायणा , आपण कसे हेलकावतच राहिलो. ' चुकचुकतो कधी जीव ; वाटते , ह्या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो. थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता , का आवरला म्यानावरचा हात , का नाही घेतले झोकवून स्वतःला , जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात. विचार करतो गतगोष्टींचा , काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक. किती वाचलेत चेहरे , किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात इथे सत्य एक अनुभव , बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात. खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची ; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले हवे होते थोडे परिचारिकेसम , कामगारासम निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले. जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते ; भरताना तेही बापडे दडतील स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील. वाढले म्हणतात पृथ्वीचे वय , संस्कृतीचेही ; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची छान झाले ; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची. ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करुन सोडतात. कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला ? का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्या गिधाडाने अल्लद उचलला ? चंद्रा नायकीण ; शेजारीण , केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुन झुलणारी अनपड. रोजच विकत घेऊ पेपर , रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई " खडे आसा रे माझो झील ; ह्या मेरेर का त्या रे ," भक्तिभावाने विचारीत जाई. कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने , ; जगाचा भूगोल होता जवळ भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन , बराकीवरुन , मलाच कुशीत ओढी जवळ. मेली ती ; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन , जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून. निळ्या छताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरुन पाठी वरुन शिव्यांचा कचकोल उडे , " सिव्वर , इंडियन , काले कुत्ते. " हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते आफ्रिकी चाचा चिडे , थुंके , म्हणे ; " काम नही करेगा. " चिलमीवर काडी पटवीत मी विचारी , " चाचा , पेट कैसा भरेगा ?" धुसफुसे तो , पोट-या ताठ होत , भराभरा भरी रेलच्या वाघिणी एक दिवस काय झाले ; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी टरकावले घामेजले खमीस , त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्य बोलला , " हमारा खून झिंदाबाद ! " वाटले , चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट खळालल्या नसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला " बेटा! " गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला. कुठे असेल माझा गुरु , कोणत्या खंदकात , का ? बंडवाला बंदीशाळेत अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात आता आलोच आहे जगात , वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात जगायलाच हवे ; आपलेसे करायलाच हवे ; कधी दोन घेत ; कधी दोन देत ................................... विश्वास ठेव इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद. अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव. ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव. (सनद) .............................................................. तेव्हा एक कर ! जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निःशंकपणे डोळे पूस. ठीकच आहे चार दिवस- उर धपापेल , जीव गुदमरेल. उतू जणारे हुंदके आवर , कढ आवर. उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस खुशाल , खुशाल तुला आवदेल असे एक घर कर मला स्मरून कर , हवे अत्र मला विस्मरून कर. .............................................................. बेतून दिलेले आयुष्य बेतून दिलेले आयुष्य ; जन्मलो तेव्हा - प्रकाशही तसाच बेतलेला बेतलेलेच बोलणे बोललो . कुरकुरत बेतलेल्याच रस्त्याने चाललो ; परतलो बेतल्या खोलीत ; बेतलेलेच जगलो म्हणतात ! बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर स्वर्ग मिळेल . बेतलेल्याच चार खांबात थूः |
0 comments:
Post a Comment