sponsers

Monday, August 16, 2010

[GarjaMaharashtraMaza] एका जिंदगानीची कविता

 

- प्रकाश अकोलकर



source:- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6317971.cms
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते
असे झाले नाही ; आम्ही शब्दांतच इतके नादावलो ; बहकलो
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते

गेली जवळपास पाच दशके शब्दांतच नादावलेल्या नारायण सुर्वे नावाच्या या सिंगल फसली फाटक्या इसमाविषयी लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण त्यामुळेच ते लिहिणे अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. कारण सुर्वे हे नाव आता मराठी माणसाला तर अनोळखी राहिलेलं नाहीच. शिवाय देश-परदेशातील अनेकांनाही या ' उठवळ ' आयुष्य जगलेल्या कवीविषयी नको तितकं माहीत होऊन गेलं आहे...

डोंगरी शेत माझं मी बेनू किती
आलं वरीस राबू मी मरावं किती

ही आपली पहिली कविता १९५६ मध्ये लिहिणा-या सुर्व्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिळत गेले. सोविएत रशियाच्या नेहरू पुरस्कारानं बहुधा त्याची सुरवात झाली. एक तपापूवीर् त्यांना पहिला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला.

' माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला ' अशी सुरुवात करून ' निवडणुकीच्या मध्यभागी / माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता ' अशा आठवणीत दंग होऊन गेलेला हा विदोही कवी पुढे यथावकाश मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन प्रस्थापितांच्या मांदियाळीत सामील होऊन गेला... आणि त्यानंतर कोकण मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारलं. तरीही पुरस्कारांनी त्यांची पाठ सोडली नाही. ' भाकरीचा चंद्र शोधण्यातच ' बरबाद झालेल्या सुर्व्यांच्या जिंदगानीची अचूक ओळख महाराष्ट्रा- बाहेरही पटली होती आणि मध्य प्रदेश सरकारनंही ' कबीर पुरस्कार ' देऊन त्यांचा सन्मान केला होता...

... आणि आता नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं दिलेल्या ' जनस्थान पुरस्कारा ' मुळे सुर्वे अधिकच सुखावून गेलेत. कुसुमाग्रजांशी त्यांचे संबंध अगदीच वेगळे आहेत. सुर्व्यांच्या कविता इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या. त्या संग्रहास कुसुमाग्रजांचीच प्रस्तावना होती आणि मुख्य म्हणजे सुर्व्यांच्या प्रतिभेचं सार्मथ्य ज्या अगदी मोजक्याच लोकांनी ही पुरस्कारांची अध्यक्षपदांची मालिका सुरू होण्यापूर्वीच ओळखलं , त्यात कुसुमाग्रज होतेच होते.

... आणि सुर्व्यांच्या प्रतिभेचं मोलही तेवढंच होतं. ही कविता अगदी ' अस्सल ' होती आणि हा अस्सलपणा कवीला ज्या प्रकारचं आयुष्य जगणं भाग पडलं , त्यातून आला होता. मुळात हे आयुष्य फारच खडतर होतं. इथं आता सुर्वे कवी म्हणून प्रस्थापितांच्या रांगेत जाऊन बसले असले , तरी ते जन्मजात विस्थापित होते. त्यांच्याच शब्दांचा आधार घेऊन सांगायचं झालं तर ' सुर्वे अनाथ मुलगा म्हणूनच जन्माला आले. अर्थात ही काही अभिमानानं सांगायची बाब नाही. ' पण ते पुढे म्हणतात : मी जन्मलो तो काही कोणतं नाम धारण करून जन्मलो नाही. पण मी नसेन तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन -ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे. हे नाव देणारे माझे ' मातापिता ' एका कामगार कुटुंबातील होते. ही मात्र मिरवण्यासारखी आणि अभिमानानं सांगण्याजोगी बाब आहे. '

- आणि हा अभिमान सुर्व्यांनी आयुष्यभर बाळगला. जन्मत: ' अनाथ ' झालेला हा मुलगा गंगाराम कुशाजी सुर्वे यांना सापडला. हे गंगाराम सुर्वे मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाले म्हणून काम करत आणि त्यांच्या पत्नी काशीबाई या कमला मिलमध्ये. या दांपत्यानं हे सापडलेलं लेकरू घरी आणलं आणि सुर्व्यांना नवा जन्म नारायण हे नाव दिलं. एवढंच नव्हे तर घरात अठरा विश्वं दारिद्र्य असतानाही त्यास माहीमच्या शाळेतही घातलं. १९३६ साली सुर्वे चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे निवृत्ती स्वीकारून गावी निघून गेले. सुर्वे पुन्हा एकदा अनाथ झाले...

' ना घर होते / ना गणगोत ' अशी त्यांची अवस्था होती. पण सुर्वे हडबडले नाहीत.

चालेल तेवढी
पायाखाली जमीन होती
दुकानांचे आडोसे होते
मोफत नगरपालिकेची फुटपाथ
खुलीच होती

हेच सुर्व्यांचं विद्यापीठ होतं... या विद्यापीठानं सुर्व्यांचं जीवन भलतंच समृद्ध करून सोडलं. तिथं त्यांना भलेभले लोक भेटले. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा देण्याआधीच शाहीर अमरशेख , अण्णाभाऊ साठे , शाहीर गंगाराम गव्हाणकर आदींच्या ताफ्यात सुर्वे सामील झाले होते... त्यातून झालेले विदोहाचे संस्कार सुर्वे आजही मनाशी बाळगून आहेत. तो काळच बंडखोरीचा होता. बाहेर गांधी-नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी रान उठवलं होतं आणि घराच्या परिसरात कॉम्रेड डांगे गिरणी मालकांच्या विरोधात लाल बावटा घेऊन उभे होते. सुर्वे सांगतात : सह्यादी घाट उतरून पोटासाठी कामगार झालेल्या , मानसिकदृष्ट्या अर्धा शेतकरी आणि अर्धा कामगार असलेल्या श्रमिकांच्या वस्त्या वाढत होत्या... शिवाय कोकणातील चाकरमान्यांचीही भली मोठी गर्दी मुंबईत होतीच. ही मुंबईच सुर्व्यांची मुंबई. म्हणूनच

पटकूर खांद्यावर टाकून , सह्यादी घाट उतरून
माझा बाप तुझ्या दारावर उभा राहिला श्रम घेऊन

असं ' मुंबई ' या कवितेत सुर्वे सहजपणे लिहून गेले... पण सुर्व्यांना परिस्थितीचं भानही होतं. त्यामुळेच दररोज स्वत:ला धीर देत जगणे ; कठीण होत आहे

किती आवरावे आपणच आपणाला ; कठीण होत आहे

अशी जाहीर कबुलीही सुर्वे देतात. पण शब्दांतच नादावलेले आणि बहकलेले असूनही सुर्व्यांचं वास्तवाचं भान काही अपवाद वगळता सुटलं नाही. म्हणूनच एकीकडे मढेर्करांना साद घालताना सुवेर् गिरणीची लावणीही लिहीत राहिले... आणि त्याच वेळी ' तुमचंच नाव लिवा... ' अशी मास्तरांची विदारक पण वास्तवाचं भेसूर चित्र उभं करणारी विनवणीही त्यांच्या कवितेतून उमटू शकली. पण आता हे सारं आपल्या हाताबाहेर जात चाललं आहे , याचा कबुलीजबाब देण्याइतपत धैर्यही त्यांच्याकडे काही दशकांपूर्वीच आलेलं होतं.

कबूल...
आजच्याइतके आयुष्य काल कठोर नव्हते
आजच्याइतके पालखीचे भोई काल थकलेले नव्हते

हा म्हणाल तर ' नॉस्टॅल्जिया ' होता. पण त्याने ' रोमँटिक ' कवींनी रूढ केलेला ' नोस्टॅल्जिया ' चा पारंपरिक अर्थ पुरता पालटून टाकला होता. त्यांच्या कवितेचं रसायन अनेकदा छान जमून जातं पण त्यामुळे तेही अनेकदा हादरून गेले आहेत. असे हादरे त्यांच्या मनाला अनेकदा बसत गेले आणि त्यातूनच त्यांची कविता अधिकाधिक तप्त आणि प्रस्थापित वास्तवाला कठोर हादरे आणि फटके देत गेली. ' उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही ' अशा प्रवृत्तीतून जन्मलेली ही कविता म्हणूनच आज पाच दशके सर्वांच्या मनात रुजत गेली...

वयाची ऐंशी पार केलेल्या सुर्व्यांना आपल्या कवितेचा रास्त अभिमान आहे. म्हणूनच ते म्हणू शकले :

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते
चला बरे झाले ; आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते.

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.

.

__,_._,___

0 comments:

sponsers