स्वातंत्र्यदिनाच्या तारखेचे गूढ उकलले
महेश शहा (mahesh.shah@esakal.com)
Sunday, August 15, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: snn, independence day, ahmedabad, national
अहमदाबाद - भारत यंदा 64 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, देशाला 15 ऑगस्ट याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला, याची माहिती इतिहासाच्या पोटात दडलेली आहे. प्रत्यक्षात, भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आग्रहामुळे देशाची या ऐतिहासिक दिवशी पारतंत्र्यातून सुटका झाली आहे.
गुजरातमधील दिवंगत व निवृत्त सनदी अधिकारी तसेच इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. के. सी. सगर यांनी केलेल्या नोंदीतून या बाबीवर प्रकाश पडला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वर्षी डॉ. सगर गुजरात प्रांताचे महसूल सचिव होते. सनदी कामकाज करताना इतिहासात रुची असल्याने ते रोज घडणाऱ्या परंतु, महत्त्वाच्या घटनांची नोंद करून ठेवत असत. त्यांच्या या अनोख्या सवयीमुळेच देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या तारखेमागील गूढ उकलले गेले आहे.
डॉ. सगर यांनी केलेल्या नोंदीनुसार, लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतात येण्यापूर्वी 1945 मध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रराष्ट्रांकडून जपानवर करण्यात आलेल्या लढाईचे नेतृत्व केले होते. चिवट जपानींना 15 ऑगस्ट याच दिवशी चारीमुंड्या चीत करण्यात त्यांना यश आले होते. या विजयानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन दिशाच मिळाली. त्यामुळे ते 15 ऑगस्ट या तारखेला "लकी' दिवस मानत. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील नेत्यांनी स्वातंत्र्यासाठीचा लढा अधिक तीव्र केला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटिश सरकार तयार झाले. मात्र, तारीख निश्चित होत नव्हती. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी 15 तारीख ठरवली आणि ती भारतातील ज्येष्ठ नेत्यांना कळविली.
या तारखेची कहाणी इथेच संपत नाही. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या या निर्णयाला देशातील नेत्यांनी विरोध केला नाही. मात्र, पश्चिम बंगालच्या कोलकत्यातील त्या वेळचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ स्वामी मदनानंद यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, 15 ऑगस्ट 1947 हा "अशुभ' दिवस आहे. या दिवशी देशाला स्वातंत्र्य देण्यात येऊ नये. ब्रिटिशांनी 16 ऑगस्टला स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना सुचविले होते. तसे पत्रही त्यांनी पाठविले होते. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यास अनेक संकटे निर्माण होऊ शकतील, असे भाकीत स्वामी मदनानंद यांनी वर्तविले होते. स्वातंत्र्यानंतर देशात उसळलेला जातीय हिंसाचार, दुष्काळ, पाकिस्तान आणि चीनशी झालेले युद्ध अशी अनेक संकटे देशावर कोसळली. या सर्व संकटांचे मूळ त्या तारखेत असल्याचे मत स्वामी मदनानंद यांनी मानल्याचे डॉ. सगर यांनी नोंदविले आहे.
Source:- http://www.esakal.com/esakal/20100815/4711345308818330215.htm
0 comments:
Post a Comment