चंगळवाद आणि भोगवादाच्या भोवऱ्यामध्ये भिरभिरणाऱ्या आजच्या युगामध्ये नात्यांमधील निष्ठा, निखळपणा, निरलसपणा लोप पावतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, व्यक्तिस्वातंत्र्याच्या टोकाच्या कल्पना, उच्च राहणीमानाचे पोकळ, दांभिक मापदंड, यातून निर्माण होणारी संपत्तीची लालसा, स्वार्थ व त्यातून घडणारे विवेक व नीतीचे किळसवाणे अधःपतन व चांगुलपणा, प्रेम, माणुसकी, नाते यांचे अक्षम्य विस्मरण माणसाला कोणत्या खाईत नेणार याची चिंता वाटते.
इतर प्राणिमात्रांप्रमाणेच तहानभुकेसारख्या उपजत प्रवृत्ती असणारा माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो ते त्याला मिळालेल्या प्रेम, माणुसकी, नातेसंबंध जपण्याच्या उदात्त दैवी भावनांमुळे. आजच्या धकाधकीच्या काळात रक्ताच्या, जोडलेल्या, लोभाच्या सर्वच नातेसंबंधांना योग्य न्याय देणे जरी अशक्य होत असले तरी जवळची, रक्ताची व काही निवडक स्नेहाची जोडलेली नाती हळुवारपणे जपली पाहिजेत. रक्ताची नाती ही पूर्वसंचिताने पावन झालेली समजून स्वीकारली पाहिजेत व सांभाळलीही पाहिजेत.
रक्ताच्या नात्यांबाबत विचार करता मुले मोठी झाल्यानंतर कधीकधी आईवडील व मुलांमध्ये विसंवाद झालेला पाहायला मिळतो. मग नाते नुसतेच विसविशीत होत नाही, तर पुरते तुटतेही. चुका दोन्ही बाजूंनी असतात. आईवडील मुलांकडून अधिक अपेक्षा ठेवतात. मुलांना लहानाचे मोठे करताना काढलेल्या खस्ता, मुले मोठी झाल्यावर आठवून मुलांनी त्याचप्रकारे आपल्यासाठी केले पाहिजे, ही अपेक्षा ठेवल्यास पदरी निराशा व दुःख येण्याची शक्यता आहे. बदलत्या काळाचे भान ठेवणे अपेक्षित आहे. पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत, संदर्भ बदलत आहेत, याचीही जाणीव ज्येष्ठांनी ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेण्यातून प्रसंगी क्षमाशीलता दाखवून नात्यांमधील दुरावा कमी करता येईल. नातेसंबंध दृढ होण्यासाठी व फुलण्यासाठी थोडीफार त्यागवृत्ती लाभदायक ठरते. एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे-मोठे त्याग नात्यातील रेशीमबंधने अधिक घट्ट करतात. मग टी व्ही पाहताना हवी ती वाहिनी लावली नाही म्हणून सासू व सून किंवा आजी व नातू यांच्यात वाद होणार नाही. नव्या घराचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलाने आईच्या अचानक उद्भवणाऱ्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन कर्तव्यपूर्तीचे समाधान घेतल्यास त्या माऊलीलाही भरून पावेल!
अशा प्रकारे एकमेकांच्या गरजांचा, इच्छांचा, आवडींचा आदर केल्यास नात्यामधील स्नेह, लाघव, ओलावा वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही.
संवादाद्वारे मनातील गैरसमज, संशयाचे मळभ वेळीच दूर केल्यास नात्यांमधील गढूळपणा नाहीसा होऊन स्नेहाचा, सौहार्दाचा, विश्वासाचा झरा पुन्हा झुळझुळू लागेल. "माघार मी का घेऊ,' असा दुराग्रह इथे उपयोगी नाही. अशामुळे संबंध ताणलेले राहतात. तेव्हा जीवनप्रवासाच्या या वाळवंटामधील हे नात्यांचे ओऍसिस ताजे, टवटवीत व हिरवेगार ठेवण्याचा सुजाणपणा आपण दाखवू या. हे स्नेहसोबती जीवनसागरातील अनमोल मोती आहेत. हृदयीच्या शिंपल्यात यांना जपून ठेवू, तरच हा जीवनप्रवास सुखकारक होईल.
__._,_.___
.
0 comments:
Post a Comment