हृदयरोग झाल्यासारखे वाटतं
Heart Attack Symptoms
हृदयाची धडधड वाढली की वाटतं हृदयरोग झाला. हृदयरोग झाला हे ओळखायचं कसं?
असा एक नेहमी विनोद सांगतात,एका माणसाला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या मित्राने त्याला एका त्वरीत एका चांगल्या रूग्णालयात हलविले. डॉक्टरांनी प्रयत्नाची शिकस्त केली. अनेक तपासण्या व औषधोपचार केले. तो माणूस बरा झाला. त्याच्या हातात रूग्णालयाचे बिल पडले आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
यासारख्या घटना अनेक प्रश्न निर्माण करून जातात. हृदयविकारात आधुनिक तपासण्यांची खरोखरच गरज असते का? हृदयविकाराचे निदान आणि त्याच्या कारणांचे निदान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. छातीची पट्टी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफने हृदयविकाराचे निदान होऊ शकते. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे हृदयाच्या कार्यासाठी लागणाऱ्या विद्युत प्रणालीचा कागदावरील आलेख. जेव्हा हृदय नीट काम करीत नाही. तेव्हा आलेखात काही निश्चित बदल होतात, ज्यायोगे हृदयविकाराचं, हृदयविकाराच्या झटक्यांचं निदान होऊ शकतं. हृदय विकाराचे कारण हृदयाच्या धमणीचं आकुंचन किंवा धमणी बंद होणे हे असते. जे ईसीजीने कळू शकत नाही तसेच हृदय विकाराबरोबर हृदयाच्या झडपांचा आजार तसेच हृदयाचा वाढलेला आकार हे निश्चित समजू शकत नाही. यासाठी छातीचा फोटो (एक्स-रे) काढला जातो. थोडक्यात काय तर ई.सी.जी. व छातीच्या एक्सरेने हृदयाच्या आजारच प्राथमिक निदान करता येते.
हृदयाच्या धमन्यांचं आकुंचन वा बंद होणे ऍथॅरोस्केलरॉसीस हा रक्तातील चरबीचे वाढलेले प्रमाण व काही वेळेस रक्तातील गुठळ्यामुळे होऊ शकते. यापैकी कोणत्याही कारणाने नक्की धमणी बंद पडली हे समजण्यासाठी रक्त्याच्या तपासण्या कराव्या लागतात.
अंजायनाच्या (छातीत विशिष्ट प्रकारची चमक येणे) ही हृदय विकार झटक्याची पूर्वीची पायरी असते आणि या वेळेस योग्य उपचाराने पुढील संकट टळू शकते. त्यासाठी हृदय धमणी कुठे बंद व किती आकुंचन पावली आहे, हे शोधून त्या धमणीतील रक्ताचा मार्ग मोकळा करणे, किंवा वळविणे (बायपास) हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार असतो. त्यासाठी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख धमन्यापैकी किंवा त्याच्या शाखांपैकी कोठे दोष आहे हे शोधण्यासाठी पायाच्या शिरेतून एक अति सूक्ष्म नळी हृदयापर्यंत नेऊन एक रंगद्रव (OYE) हृदयाच्या धमणीत सोडला जातो. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे अनेक एक्स रे काढले जातात. एक्स रे वर ते रंगद्रव कुठे पसरले आहे व कुठे अडकले हे कळू शकते. त्यावरून कोणती धमणी कुठे बंद पडली अगर आकुंचित झाली ते कळते.
अजायनाच्या निदानासाठी रूग्णाला वैद्यकिय सुविधांनी सुसज्ज रूग्णालयात एक विशिष्ट व्यायाम करायला लावून त्याचा सलग ई.सी.जी. काढला जातो. वाढत गेलेल्या व्यायामाबरोबर ज्या क्षणी ई.सी.जी. मध्ये हृदय विकाराची पूर्व लक्षणे दिसू लागतात. त्याक्षणी व्यायाम थांबविला जातो. याला स्ट्रेट-ट्रेस्ट म्हणतात. एखादी व्यक्ती हृदय विकाराला बळी पडू शकेल की नाही हे या पद्धतीने ठरविता येते.
काही वेळा हृदयाच्या गतीच्या अनियमितपणामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. यासाठी २४ तास हृदयाचा ई.सी.जी. काढावा लागतो. याच पद्धतीला डॉक्टर 'मॉनेटरींग' असे म्हणतात.
यापुढील तपासण्या अत्याधुनिक प्रकारच्या अशा आहेत. त्यात प्रथम येते ती टू-डी-एकोकार्डिओग्राफी ध्वनीलहरींचा वापर करून त्याची प्रतिमा संगणकाद्वारे उमटविली जाते. यामध्ये हृदयातील झडपा, हृदयाची स्थिती, जवनिका, कर्णिका या विषयी माहिती मिळू शकते.
यापेक्षा आधुनिक म्हणजे कलर डॉप्लर यामध्ये टू-डी-एकोकर्डिओग्राफी मध्ये समजणारी सगळी माहिती मिळतेच, परंतु ऑक्सीजन न मिळणारा भाग व पुरेसा ऑक्सीजन मिळणारे हृदयाचे स्थायू हे वेगवेगळ्या रंगात दिसतात. हृदय किती प्रमाणात खराब झाले आहे, याचा अंदाज यावरून घेता येतो.
विज्ञानाची प्रगती जसजशी होत आहे. तसतशी परिक्षण (डायग्रोस्ट्रोक्स) करण्यामध्येही क्रांती होत आहे. संगणकाचा आधार घेऊन हे तंत्रज्ञान निकसित होत आहे. आपण प्रवासात असतांना देखील विशिष्ट उपकरण लावल्यावर शेकडो कि.मी. अंतरावर असलेल्या आपल्या डॉक्टरांना ई.सी.जी. कळू शकतो व त्यावरून तो औषधे सुचवू शकतो. अशीच क्रांती या क्षेत्रात होत राहील. हे परिक्षण करून घेतल्यावर आपल्याला हृदयाची निश्चित विकृती कळते व त्यावरून काही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. त्या दृष्टीने तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्या तरी या तपासण्या सर्वसामान्य लोकांसाठी महागड्याच आहेत. त्याही या आधुनिक प्रकारातल्या तपासण्या मोठ्या शहरातील ठराविक रूग्णालयातच उपलब्ध आहेत. त्यामुळे सामान्य माणसासाठी त्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
0 comments:
Post a Comment