गणेशविद्या प्रसार चळवळ
मराठी मजकूर लिहिण्यासाठी सध्या जी चिन्हे लोकप्रिय आहेत, त्या चिन्हांना मुळाक्षरे व जोडाक्षरे म्हणतात. या लोकप्रिय चिन्हसमूहाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी खुद्द गणेशाने बनवली अशी श्रद्धा आहे. व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना घातलेल्या अटींमुळे ही दर्जेदार लिपी तयार झाली. मराठीसह काश्मिरी, संस्कृत, सिंधी, हिंदी, नेपाळी भाषांसाठी ही लिपी सर्वाधिक वापरात आहे. जगातील कोणतीही भाषा या लिपीत अधिक अचूकपणे लिहिता-वाचता येते.
महर्षी व्यासांना महाभारत लिहायचे होते
. महाभारताची कथा सुचल्यावर हा ग्रंथ प्रचंड होईल, असे त्यांना जाणवले. एवढा प्रचंड ग्रंथ लिहायला तसाच जबरदस्त लेखक हवा होता. गणपतीच हे अवघड काम करू शकेल, हे व्यासांना माहीत होते. त्यांनी लेखनसहाय्य करायची विनंती गजाननाला केली. गणपती जेवढा बुद्धिमान तेवढाच खोडकर! भराभर आणि सतत सांगणार असाल तरच मी लिहीन. एकदा थांबलो की पुन्हा तुमचे हे काम करणार नाही, अशी अट त्याने व्यासांना घातली. गणपतीचा लिहिण्याचा वेग प्रचंड होता. महाभारत सांगताना श्वास घ्यायला तरी सवड मिळेल की नाही याची व्यासांना काळजी वाटू लागली.
बराच विचार केल्यावर महर्षीं व्यासांना एक युक्ती सुचली
. गणपतीने घातलेली अटही मोडणार नाही, आणि महाभारत सांगताना आपल्यालाही थोडी उसंत मिळेल, असा उपाय त्यांना सापडला. त्यांनी गणपतीला सांगितले, "हा नवा ग्रंथ नव्या लिपीसह लिहिला जावा, अशी माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत कोणीही वापरली नाही अशी एक लिपी तू हा ग्रंथ लिहिताना वापर. तुझ्या बुद्धिमतेची, प्रतिभेची छाप विश्वावर रहावी. यापूर्वी वापरात असलेल्या लिप्यांपेक्षा अधिक उपयुक्त, अधिक सोयीची लिपी तू तयार कर. आपण जे उच्चारतो, तेच तंतोतंत लिहिले जाईल, अशी एक नवी आधुनिक लिपी तू निर्माण करू शकशील. त्याच लिपीसह तू महाभारत लिही."
साक्षात बुद्धिदेवता असलेल्या गणेशाने हे आव्हान आनंदाने स्वीकारले
. व्यासांनी उच्चारलेले शब्द काळजीपूर्वक ऐकून त्याने प्रत्येक उच्चारासाठी एकेक चिन्ह तयार केले. जोडाक्षरांचे उच्चार ऐकताना कोणते अक्षर अर्धे, कोणते पूर्ण ते नीट ऐकून त्यानुसार चिन्हे बनवली आणि लिहिली. याकरता विचार करताना गणेशाला अधूनमधून थोडे-थोडे थांबावे लागे. व्यासांना त्यावेळी थोडीशी उसंत मिळायची. या लिखाणाच्या वेळी बावन्न अक्षरे तयार झाली. यात सोळा स्वर, तर छत्तीस व्यंजने आहेत. सोळा स्वर मानवी मुखातील स्पंदनाने निर्माण होतात. मानवी पाठकण्याच्या तेहेत्तीस मणक्यांच्या स्पंदनाने तेहेत्तीस व्यंजने निर्माण होतात. काही व्यंजनांच्या संयुक्त उच्चाराने तीन संयुक्त व्यंजने तयार होतात. प्रत्येक मानवी मणक्याशी एकेक मराठी मुळाक्षर जोडलेले आहे. केवळ ऐकलेल्या आवाजावरून संबंधित उच्चार मुखातल्या की मणक्यातल्या स्पंदनापासून उगम पावला हे समजणे अतिशय अवघड आहे. श्रीगणेशाकडे ही शक्ती आहे, हे माहीत असल्यानेच महर्षी व्यासांनी गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली असावी. जितके वेगवेगळे उच्चार आहेत तितकीच स्वतंत्र अक्षरचिन्हे गणपतीने बनवली. या चिन्हांनाच मुळाक्षरे म्हणतात. यापासूनच गणेशाने जोडाक्षरेही तयार केली.
महाभारत लेखनाच्या निमित्ताने श्रीगणेशाच्या हातून ध्वनीवर आधारित उत्तम लिपी तयार झाली
. खुद्द गणेशाने बनवलेली ही लिपी आपण वापरतो म्हणून 'जसा उच्चार तसे लिहिणे' आपल्याला मराठीत जमते ! मानवी शरीरातील उच्चारक्रियेशी थेट संबंधामुळे ही लिपी अचूक लिहायला व वाचायला अतिशय सोयीची ठरत असावी. देवाने तयार केली व नागरिक वापरतात म्हणून ही लिपी देवनागरी या नावाने प्रसिद्ध झाली. या लिपीत बावन्न मुळाक्षरे आहेत, तर पृथ्वीवरील वर्षही बावन्न आठवड्यांचे आहे. गणेशविद्या पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाशी घट्टपणे जोडलेली आहे, हे लक्षात येते.
कागदाचा वापर होण्यापूर्वी वनस्पतींच्या अवयवांपासून बनलेल्या पानांवर लिखाण केले जात असे
. उत्तरेत भुर्जपत्रावर लिखाण केले जाई. दक्षिणेत भुर्जपत्रे उपलब्ध नसल्याने ताडपत्रांचा वापर होत असे. भुर्जपत्रे आकाराने उभी असतात. उच्चारभेदांसाठी श्रीगणेशाने योजलेली वेलांटी, रफार, मात्रा, अनुस्वार, चंद्र, अर्धचंद्र वगैरे चिन्हे अक्षराच्या वर आणि उकार, रुकार, रकार, नुक्ता वगैरे चिन्हे अक्षरांच्या खाली देणे या उभ्या पानांवर सोयीचे ठरते. उभे तीन स्तर असलेली देवनागरी लिपी उत्तरेत लोकप्रिय झाली. दक्षिण भारतीय मुळाक्षरे मराठीशी साम्य दाखवत असली तरी उच्चारभेदांसाठी योजलेली चिन्हे मुळाक्षरांच्या डावी-उजवीकडे जोडतात. ताडपत्रे आडवी असल्याने त्यावर लिहिताना ही चिन्हे अक्षरांच्या डावी-उजवीकडे देणे सोयीचे ठरते. याचमुळे दक्षिणी भाषांतील लिखाण आडवे पसरट असते. ताडपत्रांना रुंदी जास्त तर उंची कमी म्हणून दक्षिणी भाषांच्या लिपीत शिरोरेखाही नसतात.
गणेशाने तयार केलेली ही देवनागरी लिपी गणेशविद्या म्हणूनही ओळखतात
. मुलांच्या शालेय शिक्षणाच्या प्रारंभाला 'श्रीगणेशा' असे म्हणतात! केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्याही देवनागरी लिपी हे जगाला मिळालेले वरदान आहे. जगातील कोणत्याही भाषेतील कुठलाही उच्चार लेखी नोंदवण्यासाठी इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत कमी अक्षरे व कमी जागा लागते. सर्व जगाने ही गणेशविद्या (देवनागरी लिपी) वापरली तर जगातील कागदाचा वापर ६० % कमी होईल. संपूर्ण जगातील जंगलतोड ६०% कमी तर शाईमुळे होणारे शिशाचे प्रदूषणही ६०% कमी होईल. जगभर संपर्क असणार्या भारतीयांनी गणेशविद्येचा प्रसार सर्व देशांत करायला हातभार लावला पाहिजे.
भारतीयांनी तर प्रत्येक कामात ही लिपी वापरली पाहिजे
. ज्या भाषांसाठी देवनागरी लिपी वापरतात, त्यापैकी मराठीसाठी सर्वात कमी अक्षरे लागतात. महाराष्ट्रभर कोणत्याही दुकानात, घरात, उद्योगात, पत्रकावर, पुस्तक, पावती, जाहिरात, फलक, यासाठी मराठी भाषा, मराठी शब्द वापरल्यास छपाई खर्च कमी होईल. मराठी शब्द-वाक्ये-अंक व संख्या इंग्रजी शब्द-वाक्य-अंक व संख्यांपेक्षा लहान असल्याने बोलणे, लिहिणे,वाचणे या क्रिया लवकर होतात. जे व्यावसायिक मराठी शब्द व अंक वापरतात, त्यांचे काम कमी वेळात होते. त्यांचा नफा वाढतो. देवनागरी लिपी, मराठी शब्द, मराठी अंक यांचा वापर केल्याने गणेशाची कृपा तर होईलच, पण शिवाय लक्ष्मीचीही कृपा होईल. गणेशभक्तांना या कृपेचा लाभ होईलच. नास्तिकांनीही पर्यावरण रक्षणासाठी इंग्रजीचा वापर पूर्ण बंद करून देवनागरी लिपीसह मराठी भाषेचा वापर करावा. निसर्ग-पृथ्वीच्या रक्षणासाठी श्रीगजानन सर्वांना अशी बुद्धी देवो, ही प्रार्थना!
प्रा
.अनिल गोरे
गणेशविद्या प्रसार चळवळ
.
समर्थ
मराठी संस्था
७०५
,बुधवार पेठ, पुणे - ४११ ००२
भ्रमणध्वनी
- ९४२२००१६७१
-पत्ता marathikaka@gmail.com
__._,_.___
.
0 comments:
Post a Comment