"प्रत्येकाला जीवनात रोजच्या कटकटीपासून थोडी सुटका हवी असते असं मला वाटत असतं.रोजचं जीवन आणि त्यातले व्याप हे संभाळण्यात आपण ज्यावेळी खूपच मेटाकुटीला येतो तेव्हा अशी कुठेतरी जागा असावी की त्या जागेत जाऊन इतरापासून हरवून जावं असं वाटणं स्वाभाविक आहे."
माझ्या प्रश्नाचं अंशतः उत्तर म्हणून माधवी मला सांगत होती.
टेबलावरचा पुस्तकांचा ढिगारा पाहून कुतूहल म्हणून मी तिला प्रश्न केला होता.
"अशावेळी एव्हडी पुस्तकं वाचायला तुला सुचतं तरी कसं?"
ह्या माझ्या प्रश्नाचं ते अंशतः उत्तर होतं.
माधवी,माझ्या मित्राची-निलेश पाडगांवकरांची- एकच एक मुलगी.रिक्षा-स्कूटरच्या अपघातात तिच्या पायाला लागलं होतं.म्हणून ती गेले पंधरा दिवस एका खासगी क्लिनीकमधे उपचार करून घेत होती.
माझा मित्र रोज रात्री अकरा वाजे पर्यंत तिच्या बिछान्या शेजारी बसून तिला कंपनी देत होता.आज त्याला अतिशय जरूरीच्या कामाकरता बाहेर गावी जावं लागणार होतं,म्हणून मला त्याने आजची रात्र तिला कंपनी देण्याची विनंती केली.
त्यासाठी मी तिच्या क्लिनीकमधे गेलो होतो.
माधवी कॉलेजच्या शेवटच्या वर्गात शिकत होती.तिच्या बिछान्या शेजारी असलेल्या टेबलावर पुस्तकांचा ढिग होता.
माधवी मला पुढे सांगत होती,
"मग ती जागा टीव्ही पहाण्याची असो,सिनेमा थियेटर असो,पुस्तकं वाचण्याची लायब्ररी असो किंवा मनात आलेली कुठचीही शांतता असलेली जागा असो.कुठचंही स्थान की ज्या ठिकाणी एखाद्याला अस्तव्यस्ततापासून दूर जाऊन आराम मिळेल,बेचैन असताना चिंतामुक्त रहायला मिळेल,किंवा खूपच राग आला असल्यास शांत व्हायला मिळेल तर किती बरं वाटेल?.
वास्तविकतेतून सुटका मिळवून देण्याची,मनाला अवसर आणून देण्याची कुठली का मदत असेना ती मिळाली तरी चालेल असं वाटत असतं."
असं म्हणून माझ्या चेहर्यावरची प्रतिक्रीया काय? हे न्याहळून बघत होती.
माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर तिने दिलं नाही हे पाहून मी म्हणालो,
"अजून तू मला माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर दिलं नाहीस."
"सांगते ऐका"
असं म्हणून शेजारच्या ग्लासातलं पाणी पिण्याची इच्छा दाखवून मला ग्लास द्यायला सांगून ते पाणी पिऊन झाल्यावर मला म्हणाली,
"मला आठवतं मी शाळेत असताना,लागोपाठ तिन वर्षात माझ्यावर तिन शस्त्रक्रिया झाल्या.माझ्या डाव्या हाताचं हाड दुखावल्याने,डाव्याच पायच्या गुडघ्याला खेळताना इजा झाल्याने,आणि परत उजव्या पायाच्या गुडघ्यावर तश्याच प्रकारची इजा झाल्याने ह्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या."
"लहानपणी तू खूपच धडपडी होतीस,तोल जाऊन पण पडायचीस.म्हणून तुझ्या बाबाला मी म्हणायचो,
"तुझी माधवी,"पाडगांवकर" आडनावाची शोभून दिसते."
जूनी आठवण येऊन मी माधवीला सांगीतलं.
"त्यावेळी मला तुमचा खूप राग यायचा.पण मला जवळ घेऊन,
"गंमतीत बोललो"
असं म्हणून मला दिलासा द्यायचा.त्याने मला बरं वाटायचं"
असं म्हणून माधवी पुढे सांगू लागली,
"त्या तिन शस्त्रकियांमुळे माझे शाळेचे दिवस बुडाले हे उघडंच आहे.माझे शाळकरी मित्र-मैत्रीणी कधीतरी भेटायचे. पण माझे मित्रमंडळीत वेळ घालवायचे दिवस बरेचसे फुकट गेले होते.गुडघ्यांच्या इजेने मला बिछान्यावर झोपून संपूर्ण विश्रांती घ्यावी लागली होती.माझं शरीर जेव्हा निष्क्रिय झालं होतं तेव्हा मन क्रियाशील रहाण्यासाठी काही मार्ग धुंडाळणं मला क्रमप्राप्त होतं.झोपून झोपून कंटाळा येत राहिला.
त्या काळात मी माझ्या बालपणातल्या जीगर दोस्तांची-छोट्या,छोट्या पुस्तकांची-मदत घेतली. पुस्तकाच्या एक एक पानातून भरभर जाऊन त्यातल्या गोष्टी पुन्हा वाचून, लिहिलेल्या शब्दात हरवून जायची.माझ्या अवतीभोवती सुंदर देखावे,जादूचे किस्से आणि विनोदाचे फवारे असायचे.जेव्हा माझ्या सभोवतालचं सर्वकाही दहशतपूर्ण वाटायचं आणि ते हाताळायला कठीण जायचं, तेव्हा गोष्टीतल्या निरनीराळ्या पात्रांची मदत घेऊन मला आराम वाटायचा. रात्रीचं, वेदानामुळे मला जेव्हा असह्य व्हायचं तेव्हा भूतं,पर्या,उनाड मुलं,जासूस आणि पिंजर्यातले पक्षी ह्या सर्व कल्पीत कथेतल्या चिन्हीत व्यक्ती,माझे जीवश्च-कंठश्च व्हायचे."
डॉक्टरकडे जाण्याच्या भेटी आणि त्यांच्याकडून मिळणार्या इलाजाची आठवण येऊन मी थोडीशी घाबरीघुबरी झाले किंवा असहाय झाले की ह्या चिन्हीत व्यक्ती माझा सहारा बनायच्या".
"वाः! मोठी हुशार आहेस.तुझ्या पुस्तक वाचनाचं,गौप्य माझ्या लक्षात आलं.
हे साहित्यातले तुझे स्नेही तुला अशावेळी हवं ते द्यायचे. मग ते मोठ्याने रडणं,जोरात हंसणं, धैर्य,बळ, सहानुभूती, उपदेश असेनातका,त्यावेळी ते तुला तुझे स्नेही वाटायचे.
खरं ना?"
"खरंच तुम्ही माझ्या मनातलं बोललात"
असं म्हणून माधवी सांगू लागली,
"त्या काळात आणि अजूनही माझ्या जीवनात सामना करायला पुस्तकं वाचणं हा मला एक मार्ग झाला आहे.थोडा काळ दुसर्या जगात जीवन जगायला आणि थोडा अवसर घ्यायला पुस्ताकाकडून मला मार्ग सापडतो.वास्तवीक जगात मी तशी थोडीशी लाजवट आणि सतर्क असते.पण मी जेव्हा वाचन करते तेव्हा माझ्या साहित्य-मित्रांसारखं मी मला धैर्यबाज, शूर आणि सहासी आहे असा बहाणा करू शकते.
मी त्यावेळी,जरी बिछान्याला खिळून होते तरी,एखाद्या आकर्षक देशात गेल्याचं किंवा एखाद्या स्वैर कल्पनेतल्या बेटावरच्या सफेद वाळूत माझ्या पायाची बोटं मी रूतून बसले आहे असा बहाणा करायची.जर का माझ्या जवळ माझी पुस्तकं नसती तर त्या तिन वर्षातल्या तिन शस्त्रक्रीयेतल्या वास्तवीकेतून निभावून जाण्यासाठी कोणता मार्ग मी काढला असता याची कल्पनाच करवत नाही."
मी म्हणालो,
"पण आता तू मोठी झालीस.अजून तू अशावेळी पुस्तकांचाच सहारा घेतेस कां?तुझ्या टेबलावरच्या पुस्तकांचा ढिग बघून असं माझ्या मनात येतं म्हणून विचारतो."
"आता जरी माझ्या जीवनात मी एक सर्व साधारण मुलगी म्हणून पदार्पण केलं असलं तरी पुस्तकं माझ्या मदतीला असतात.एखाद वेळेला माझा माझ्या मैत्रीणीशी वाद झाला किंवा एखादी कठीण समस्या सोडवण्याचा माझ्यावर प्रसंग आला तर मी माझ्या पुस्तकाच्या कपाटातून एखादं पुस्तक काढून निराळ्या विश्वात रमून जाते."
मला माधवी म्हणाली.
"बोल,बोल तुझ्या मनातलं ऐकायला बरं वाटतं."
असं मी म्हणाल्यावर, घड्याळाकडे बघायला लागली.
"अकरा वाजले की तुम्हाला घरी जावं लागणार.पण मी तुम्हाला पटकन सांगून टाकते."
असं म्हणून सांगू लागली,
"जरी मी माझ्या जीवनात, नवीन नवीन, पाऊलं टाकण्याच्या प्रयत्नात असले तरी जेव्हा मी नव्या पुस्तकाची नवी करकरीत पानं परतवीत असते किंवा जुन्या मित्र-पुस्तकाची कोरम झालेली,सुरकुतलेली पानं परतवीत असते,तेव्हा मला माहित असतं की माझा आत्मा मी निर्मळ करीत आहे,आणि प्राप्त परिस्थितीचा सामना करायला मी समर्थ आहे.
माझ्या पुस्तकातल्या गोष्टी आणि ज्या विश्वातून त्या आलेल्या असतात तिथून मला त्या स्वैर कल्पनांचे डोस देत असतात पण त्याबरोबर वास्तवीक विश्वाचं मुल्यमापन करायलाही मदत करतात.
ही माझी एक सुटका करून घेण्याची पद्धत आहे आणि प्रत्येकाला त्याची स्वतःची पद्धत माहित असणार असं मला वाटतं."
तेव्हड्यात नर्स आली आणि मला जाण्याचा इशारा केला.
"माधवी तुझ्या सहवासात वेळ मजेत गेला.तुला लवकर आराम मिळो.टेक केअर."
एव्हडं म्हणायला नर्सने मला मुभा दिली.
"गुडनाईट काका,यूटू"
हे माधवीचे शब्द माझ्या कानात घरी जाई पर्यंत घुमत होते.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
__._,_.___
.
0 comments:
Post a Comment