---------- Forwarded message ----------
From: Anil Gore <marathikaka@gmail.com>
Date: 2010/9/13
Subject: Re: गणेशविद्या प्रसार चळवळ
To: kavyatarang marathikavita <kavyatarang.marathikavita@gmail.com>
सर्वच भाषा स्थानिक
आपण बोलताना अनेकदा काही भाषा स्थानिक,काही राष्ट्रभाषा तर काही जागतिक भाषा असल्याचा उल्लेख करतो.पण नीट विचार केला तर सर्व भाषा स्थानिकच असल्याचे आढळते. यासाठी काही उदाहरणे पाहूया!
पुढील काही मराठी वाक्ये पहा
(१) सावकाराने शरदच्या घरावर गाढवाचा नांगर फ़िरवला. (२) मुळावर घाव घातला की फ़ांद्या आपोआप खाली येतात.(३) तात्या म्हणजे आमच्या गा्वातील जुने खोड !(४) पत्रकारांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली.(५) संस्काराने मनाची मशागत होते. (५)शुद्ध बीजापोटी फ़ळे रसाळ गोमटी! (६)दंगलीच्या काळात गावात अफ़वांचे पीक आले होते.(७)महाराष्ट्रात समतेचा विचार चांगलाच रुजला आहे. (८) लक्ष्मणराव किर्लोस्करांनी लावलेल्या उद्योगाच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.
आता काही इंग्रजी वाक्ये पहा
(१)बाळासाहेब वॉज रायडिंग द वेव्ह ऑफ़ पॉप्युलॅरिटी इन १९९०.(२)बापू वॉज इन सिंकिंग कंडिशन.(३)'झटपट' इज फ़्लॅगशिप प्रॉडक्ट ऑफ़ 'केप्र मसालेवाले.(४)जनता पतपेढी हॅज लॉंन्चड न्यू सेरीज ऑफ़ बॉन्ड्स इन जैसलमेर.(५)सर्फ़िंग,डाउनलोड,अपलोड आर वर्डस इन इंटरनेट वर्ल्ड. (६)मिलिटरी वॉज अॅन्करड इन लालबाग ड्युरिंग रायट्स. (७)नेपाळ गेव्ह मेनी ऑफ़शोअर ऑर्डर्स टू भारत. (८)राम समहाऊ रिचड टू शोअर आफ़्टर हिज बिझनेस बॅड पॅच.
वरील वाक्ये पाहता मराठीवर शेतीचा प्रभाव जाणवतो.मराठीची जडण-घडण झाली त्या काळात शेती हेच महाराष्ट्राचे जीवन होते.येथील लोकांचे खाणे,पिंणे,जगणे,पोषाख,सण,उत्सव,वैभवाच्या कल्पना सारे काही शेतीशी जोडलेले आहे.वाक्यातील मजकुराचा शेतीशी संबंध असो की नसो,वाक्यांत शेतीसंबंधी शब्द हमखास आढळतात.शेतीत अनुभवाला येणारे शब्द उपमा म्हणून वापरले तर मराठी लोकांना ते लगेच व सहज समजतात.यामुळे मराठीत शेतीशी संबंधित शब्द मोठ्या संख्येने दिसतात.
असाच इंग्रजी भाषेवर समुद्र,नौकानयन यांचा प्रभाव जाणवतो.इंग्रजीची जडण-घडण झाली त्या काळात इंग्लंडमधील लोकांचा चाचेगिरी (इंग्लिश खाडीत येणारी जहाजे लुटणे) हा मुख्य व्यवसाय होता.चाचे मंडळी प्रचलित लॅटिन,फ़्रेंच भाषेऐवजी स्वत:चे सांकेतिक शब्द वापरत असत(जसे मुंबईचे गुन्हेगार 'पेटी,खोका,घोडा,ढगात' हे शब्द वापरतात). चाच्यांनी वापरलेले शब्द रूढ होऊन त्या शब्दांचाच पहिला इंग्रजी शब्दकोश झाला असावा.चाच्याची(समुद्री चोर)भाषा असल्याने इंग्रजीत वरील समुद्राशी जोडलेले अधोरेखित शब्द आढळतात.याच चाचे मंडळींनी भाषेची व्याप्ती वाढवताना शब्द 'निर्माण'केले नाही,तर इतर भाषेतील तयार शब्द 'लुटले'.
मराठीत 'अफ़वांचे पीक आले'हे वर्णन येते,तर हिंदीत,'अफ़वाहोंकी बाढ आयी'असे वर्णन येते.पीक येणे हा मराठी लोकांचा नित्य अनुभव,तर बाढ(पूर)येणे हा हिंदी प्रदेशातील नित्य अनुभव ! थोडक्यात,कोणतीही भाषा ही एखाद्या विशिष्ट भूभागाचे प्रतिनिधित्व करते. जगात पिके,हवामान,पोषाख,आहार,उपजिवीकेची साधने विचारसरणी,राज्यपद्धती यावर आधारित भिन्नता जितक्या प्रमाणात आहे,तितक्याच प्रमाणात भाषाभिन्नता आहे व असणारच,हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भारतासारख्या खंडप्राय देशाची किंवा सर्व जगाची एकच भाषा असावी,असा विचार काही भाबडे लोक करतात.मानवी मनाचा विचार करता स्थानिक भाषाच प्रत्येकाला आपली वाटते इतकेच नव्हे तर नीट समजतेसुद्धा ! यामुळे राष्ट्रभाषा,जागतिक भाषा या कल्पना फ़ोल आणि अयशस्वी ठरतात,ठरतील.हे वास्तव सर्वांनी समजून घेतले तर भाषिक संघर्ष कमी होतील.जागतिकीकरणाला सामोरे जाण्यासाठी जागतिक भाषा ही कविकल्पना बाजूला ठेवून आपण बहुभाषिक झाले पाहिजे.प्रत्येक भाषा ही कोणत्या तरी भौगोलिक स्थानाची ओळख आहे हे आपण समजावून घेतले तर अनेक भाषिक प्रश्न व संघर्षांवर योग्य तोडगा काढता येईल.
हिंदी भाषेला राष्ट्रभाषा आणि इंग्रजीला जागतिक भाषा म्हणण्याचा अट्टहास अनेक सुशिक्षित करतात. भारताची राष्ट्रभाषा निदान आज दि.२४जुलै२०१० पर्यंत ठरलेली नाही.तसेच कोणत्याही अधिकृत जागतिक व्यवस्थेने मूठभर लोकांच्या इंग्रजी या भाषेला जागतिक भाषा असे घोषित केलेले नाही.याबाबत नीट माहिती घेउन शिक्षित मंडळींनी भारताची राष्ट्रभाषा आणि जागतिक भाषा यासंबंधी अफ़वा पसरवणे बंद केले तर बरे होईल.या अफ़वांमुळे भारतात हिंदी भाषिकांत एक खोटा अहंगंड निर्माण झाला आहे.असाच खोटा अहंगंड इंग्रजी मातृभाषा असलेल्या तीन कोटी (होय,सहाशे पन्नास कोटींच्या जगात ते फ़क्त इतकेच आहेत) लोकांच्या मनात जागतिक पातळीवर निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात या अफ़वांचा प्रसार फ़ार मोठ्या प्रमाणात झाला आहे.या अफ़वांमुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे. मोंगलांचे अत्याचार.रोगांच्या साथी,भूकंप,पूर हया व अन्य अनेक संकटांमुळे महाराष्ट्रात झालेल्या एकूण नुकसानीपेक्षा अधिक नुकसान या दोन अफ़वांमुळे झाले आहे.
या अफवांमुळे महाराष्ट्रीय मराठी लोकांचे निम्मे आयुष्य इंग्रजी भाषा शिकण्यातच जाते. मराठी कुटुंबाच्या शेजारी दोन वर्षे कोणी परप्रांतीय रहायला आला व त्याचे नियमित बोलणे झाले तर दोन्ही कुटुंबांना एकमेकांची भाषा येऊ लागते. इंग्रजी ही अत्यंत विस्कळित असल्याने ती कोणालाच नीट येत नाही. १ ली ते १० वी शाळेत इंग्रजी विषय सक्तीचा, घरीदारी जमेल तेवढे इंग्रजीचे अवडंबर माजविणे हे उपाय इंग्रजी नीट यावी यासाठी केले जातात. आई-बाबा-काका-मामा-आजी-आजोबा-आत्या-मावशी हे शब्द अस्पृश्य असल्याप्रमाणे वाळीत टाकले जातात. कोणताही विषय कळला नाही तरी चालेल, पण शाळा इंग्रजीच हवी असा खास स्त्रीहट्ट घराघरात धरला जातो. मराठी वृत्तपत्र बंद करणे, घराची पाटी व सर्वांची स्वाक्षरी इंग्रजीत असा आटापिटा केला जातो. वर्षानुवर्षे असा इंग्रजीचा अट्टहास करूनही 'इंग्रजी कच्चे' असा ठपका बसतोच. मुळात इंग्रजीचा विकास भाषा म्हणून झालेला नाही. इंग्रजी म्हणजे केवळ एक शब्दसंग्रह आहे. जगात महाराष्ट्र वगळता सर्व भागात याची जाणीव असल्याने ते या भाषेला अवास्तव महत्व देत नाहीत. आपणही असे महत्व देणे बंद केले तर आपण सुखी होउ शकू. स्वभाषेत शिक्षण, स्वभाषेत विचार, स्वभाषेत कामकाज-मनोरंजन-संपर्क यामुळे चीन, जपान, जर्मनी वगैरे १७० देशातील तरूण खूप नवे शोध लावतात, नवी आधुनिक उपकरणे तयार करतात. भारतातही महाराष्ट्र सोडून इतर प्रांतातील तरूण नवे विचार मांडू शकतात, कारण इंग्रजी शब्द पाठ करणे-फाडफाड इंग्रजी-स्पोकन इंग्रजीचे क्लास लावणे यात त्यांची उमेदीची वर्षे वाया जात नाहीत.
आपापल्या भाषा हे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. एखाद्या भागातील भाषेत तेथील नैसर्गिक परिस्थिती, उपजिविकेची साधने, चालीरित्ती, इतिहास, वापरातील वस्तू ,संस्कृती, राज्यपद्धती, तत्कालीन नियम, अन्नपदार्थ, व्यसने, रोग, वनस्पती, चांगल्या-वाईटाबाबत समजुती, सामाजिक वातावरण यांचे प्रतिबिंब आढळते. एखादी भाषा नष्ट होते तेव्हा इतिहासाचा मागोवा सहजपणे घेण्याचे एक सोपे साधन आपण गमावतो. हे पाप घडू नये म्हणून एकच राष्ट्रभाषा किंवा एखादी जागतिक भाषा असावी, हा विचारच मनातून काढून टाकायला हवा. मराठीपुरता विचार केला तरी उखळ, मुसळ, जातं, सूप, चकमकीचे खडे, पखाल, कावड या व अशा शेकडो वस्तू केवळ जुन्या मराठी लिखाणातूनच कळतील. या वस्तू आज फारशा वापरात नाहीत पण फक्त पन्नास वर्षांपूर्वी त्या दररोज वापरायच्या जीवनावश्यक वस्तू होत्या. भाषा जपल्या तर मानवी इतिहास जपला जाईल. एखाद्या विशिष्ट काळातील कथा, कविता, लिखाण जी माहिती देते, ती आणि तेवढी माहिती इतर कोणत्याही साधनांनी मिळणे अशक्य आहे.
परस्पर संपर्कासाठी अनेक भाषा मोडीत काढून एक अथवा काही मोजक्या भाषा सर्वांवर लादणे हा अयोग्य प्रयत्न आहे. अनेक देशांतील सरकारी यंत्रणांना व महत्वाकांक्षी, हुकूमशाही संघटनांना आपले आदेश, विचार जनतेपर्यंत लवकर पोचावेत म्हणून अशी एकभाषिक व्यवस्था हवीशी वाटते. पण अशा व्यवस्थेमुळे सुसंवादाऐवजी विसंवाद-विघटनाचाच अधिक धोका आहे. सरकार व अशा संघटनांनी सर्व भाषा स्थानिक आहेत हे समजावून घेतले पाहिजे. कोणतीही एक भाषा इतरांवर लादणे अनैसर्गिक, अयोग्य तर आहेच पण समाज एकत्र करण्याच्या उद्देशाशी विसंगत आहे. जगात शांतता, समृद्धी येण्यासाठी व एकात्मतेसाठी सर्वांनी बहुभाषिक होणे हा उत्तम मार्ग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ४६ भाषांची एक यादी बनवली आहे. या भाषांचे जुजबी ज्ञान असेल अशा व्यक्तीला जगात कोणत्याही भागात भाषेची अडचण येणार नाही, असे याबाबतच्या तज्ञांचे मत आहे. आपंण मराठी आहोत म्हणजे मराठी भूप्रदेशाचे आपण प्रतिनिधी आहोत. आपले सारे जगणेच मराठी करून आपण मातीचे ॠण फेडायचा निर्धार करूया !
प्रा.अनिल गोरे
समर्थ मराठी संस्था
>७०५,बुधवार पेठ,
पुणे - ४११ ००२.
भ्रमणध्वनी - ९४२२००१६७१
0 comments:
Post a Comment