भारतातल्या मुलांना पाकिस्तानात आमंत्रित करून कला सादर करायची संधी दिली जाते का?
स्टार प्लस वाहिनीवरच्या ' छोटे उस्ताद ' या रिअॅलिटी शोमध्ये पाकिस्तानी मुला-मुलींना सहभागी करून घेण्यात आल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. २६ / ११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुम्ही पाकिस्तानी जनतेचं मुंबईत स्वागत कसलं करता ? , असा खडा सवाल त्यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना केला आहे.
बच्चेकंपनीला आपल्यातील सुप्त गुण सादर करण्याची संधी देणारा छोटे उस्ताद हा कार्यक्रम. कुठल्याही कलेला सीमेचं बंधन नसतं, या न्यायानं स्टार प्लस वाहिनीनं आणि निर्मात्यांनी या रिअॅलिटी शोमध्ये पाकिस्तानी बालकलाकारांना आमंत्रित केलं. नेमकं तिथेच मनसे उखडली. पक्षाच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे सदस्य आणि मनसैनिक, सोमवारी अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वाखाली स्टार प्लसच्या ऑफिसवर धडकले आणि त्यांनी ' छोटे उस्ताद ' कार्यक्रमावर आक्षेप घेतला.
पाकिस्तानचे बालकलाकार मुंबईत येतात, आपण त्यांचं स्वागत करतो, त्यांच्या नावानं डंका पिटतो, हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मनसेनं चॅनलला आणि निर्मात्यांना दिला आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी मंडळींचं चाललेलं हे आगत-स्वागत समस्त देशवासियांसाठीच धक्कादायक असल्याचंही अमेय खोपकर यांनी नमूद केलं. या पाकिस्तानी उस्तादांना लगेचच त्यांच्या मायदेशी रवाना न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आपल्या देशात कलाकारांची कमतरता नाही, मग ही आणखी इम्पोर्टेड मंडळी हवीत कशाला ? भारतातल्या शोमध्ये सहभागी होणारी ही मुलं शो सुरू होताना वंदे मातरम् म्हणणार आहेत का ?, असा मुद्दाही मनसेनं उपस्थित केला आहे. २६ / ११ च्या हल्ल्यात किती मुलं मारली गेली, किती अनाथ झाली, हे तुम्हाला ठाऊक नाही का ? , असा सवालही त्यांनी केलाय. यापुढे जो कुणी पाकिस्तानींना भारतात आणेल त्याला आम्ही सोडणार नाही, असं मनसेनं बजावलंय. याआधी त्यांनी पाकिस्तानी विनोदवीर शकील सिद्दीकीलाही घरचा रस्ता दाखवला होता.
दरम्यान, मनसेच्या या भूमिकेबद्दल टेलिव्हिजन जगतात दोन भिन्न मतं व्यक्त होत आहेत. महेश भट्ट यांनी मनसेच्या या कृत्याचा निषेध केलाय. धार्मिक द्वेष भडकवण्यासाठी आता आपण लहान मुलांचा वापर करणार का ? , असा त्यांचा प्रश्न आहे. तर लेखक-दिग्दर्शक विनित नंदा यांनी लोकशाहीची भाषा केली आहे. मात्र, निर्माता संघटनेचे अध्यक्ष टी पी अग्रवाल यांनी मनसेची बाजू उचलून धरली आहे. भारतातल्या मुलांना पाकिस्तानात आमंत्रित करून कला सादर करायची संधी दिली जाते का, मग या उठाठेवी आपण का करायच्या ?, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment