माहुली गावाकडून 15 ते 20 मिनिटांचा पायी प्रवास आपल्याला माहुली धबधब्याजवळ नेऊन पोहोचवतो. मात्र हा प्रवासही अवर्णनीय भासतो. सभोवार पसरलेली हिरवाई, कोसळणा-या पाऊसधारा अंगावर झेलत हिरव्यागार गवताच्या मखमली गालिचावरून धबधब्याजवळ कधी पोहोचतो, ते कळतही नाही.
शहापूर : हिरवाईने नटलेला परिसर, फेसाळत कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, सभोवार पसरलेली हिरवाई जणू आपल्याला जणू तुम्हीही आमच्यासह पावसात चिंब होण्याचा अनुभव घ्या, असेच सुचवत असल्याचा भास शहापुरातील माहुली धबधब्याच्या परिसरात गेल्यावर होतो.
मुंबई परिसरातील निसर्गवेडय़ांना एका दिवसाच्या भटकंतीवर जाण्यासाठी हे ठिकाण आदर्श आहे. अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब झेलत मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकावर उतरल्यावर समोरच माहुली किल्ला स्वागतासाठी सज्ज असतो. आसनगाव स्थानकापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर तर मुंबई-आग्रा महामार्गापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. माहुली गावाकडून 15 ते 20 मिनिटांचा पायी प्रवास आपल्याला माहुली धबधब्याजवळ नेऊन पोहोचवतो. मात्र हा प्रवासही अवर्णनीय भासतो. सभोवार पसरलेली हिरवाई, कोसळणा-या पाऊसधारा अंगावर झेलत हिरव्यागार गवताच्या मखमली गालिचावरून धबधब्याजवळ कधी पोहोचतो, ते कळतही नाही.
हा किल्ला शिवकालीन आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांत वसलेल्या या किल्ल्याला आता ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या किल्ल्याच्या परिसरात कडय़ावरून कोसळणारे अनेक छोटे-मोठे धबधबे आपली नजर खिळवून ठेवतात आणि कधी एकदा या धबधब्यांखाली जातो, असे होते. मात्र केवळ धबधबाच नाही तर हा परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. ऐन, साग, खर, शिसव, हेदू, मोह, आंबा यासारख्या अनेक दुर्मीळ वनस्पती येथे दिसतात.
काळजी कोणती घ्याल ?
धबधब्याकडे जाताना शक्यतो नजीकच्या गावातील वा आदिवासी पाड्यातील जाणकार वाटाडय़ा नेल्यास नियोजित ठिकाणी पोहोचणे अगदी सोपे जाईल. तसेच धोकादायक निसरडे रस्ते, कडे वा वळणांची माहिती तर मिळलेच, पण अनावश्यक भटकंतीही टळेल.
धबधब्यावर कसे जाल?
मुंबईपासून 90 किमी अंतरावर तर ठाण्यापासून 60 किमी अंतरावर असलेल्या माहुलीकडे जाण्यासाठी आसनगावपर्यंत लोकलने येऊ शकता. तेथून केवळ पाच किमी अंतरावर माहुली धबधबा असून आसनगावपासून रिक्षांची सोय आहे.
स्वत:चे वाहन असल्यास मुंबई-नाशिक महामार्गावरून आसनगावजवळून माहुली धबधब्याजवळ जाता येते.
0 comments:
Post a Comment