मुंबई - मराठी मालिका अन् चित्रपटांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मराठीतील प्रतिभावंत कलावंतांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही मराठी कलाकारांनी आपला झेंडा रोवला आहे. आता त्यापाठोपाठ ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे पडले आहे. "फ्रेमफ्लिक्स ऍनिमेशन अवॉर्ड'च्या पहिल्या दहा नामांकनामध्ये मराठी तरुणांच्या तब्बल चार ते पाच "ऍनिमेशन शॉर्टफिल्म' दाखल झाल्या आहेत. त्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येतील. अंतिम सोहळा 16 मे रोजी गोवा येथे पार पडणार आहे.
"ऍनिमेशन' तसेच "व्हिज्युअल्स इफेक्ट'मध्ये आवड असणाऱ्या तरुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी "फ्रेमबॉक्स' या आघाडीच्या ऍनिमेशन आणि "व्हिज्युअल्स इफेक्ट स्टुडिओ'ने "फ्रेमफ्लिक्स ऍनिमेशन अवॉर्ड'ची घोषणा केली. या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. केवळ भारतातूनच नाही तर भारताबाहेरीलही काही तरुणांनी आपापल्या "शॉर्ट फिल्म' पाठविल्या होत्या. त्यापैकी केवळ दहा "ऍनिमेशन शॉर्टफिल्म'ची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये चार मराठी तरुणांच्या "शॉर्टफिल्म' आहेत. त्यामध्ये पुणे येथील दोन आणि वाशी (नवी मुंबई) व अंधेरी (मुंबई) येथील एकेक "शॉर्टफिल्म' निवडण्यात आली आहे. त्यांची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. याबाबत "फ्रेमबॉक्स'चे सीईओ नवीन गुप्ता म्हणाले, ""आम्ही "ऍनिमेशन'मध्ये "करिअर' करणाऱ्या नवनवीन गुणवान कलाकारांना नेहमीच संधी देत आलो आहोत. महाराष्ट्रातील तरुणांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला. "धूम' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी, एएए डिजिटल इमॅजिनचे अरविंद कुमार, प्राणा स्टुडिओजचे नीलेश सरदेसाई अशा एकूण अठरा जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.''
0 comments:
Post a Comment