अनिता लिमये
आज अक्षय तृतीया. संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. या मुहूर्ताचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व आणि पारमाथिर्क अर्थ उलगडणारा हा विशेष लेख..
...
'जशी उसात हो साखर। तसा देहात हो ईश्वर' अशी एक गीतपंक्ती आहे. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' असं संतश्रेष्ठ चोखामहाराज म्हणतात. तसंच अध्यात्माचं आहे. ते आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून आहे. साऱ्याच व्यवहारात, सणवारात, रूढी-परंपरांमध्ये ते मिसळून गेलं आहे. 'अध्यात्मविद्या विधानां' असं भगवंत स्वत: भगवद्गीतेत विभूतियोग सांगताना म्हणतात. 'जसे दुधामध्ये लोणी। तसे देही चक्रपाणि.' तो सर्वगत असला तर गुप्त आहे. विरजण, मंथन या प्रक्रिया जशा लोण्यासाठी आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे सारासारविवेक हाच अध्यात्माप्रत नेतो.
पूर्ण संवत्सरांत साडेतीन मुहूर्त मानले जातात. त्यातूनही अध्यात्माची प्रक्रिया लपलेली दिसेल. नवरात्रात नवविधा भक्तीचं जागरण घडतं. मग दश इंदियांना जिंकून येतो तो दशहरा. हे चित्तवृत्तींचं सीमोल्लंघन. विषयवासनांवर विजय मिळवणारी ही विजयादशमी. 'अंतरीचा ज्ञानदिवा' चेतवणारा हा पहिला शुभमुहूर्त. मग कातिर्क शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. या शुभदिनी 'अंतर्बाह्य जग आणि मन' सारेच उजळून निघते. दिव्यांच्या आवली म्हणजे पंक्तीच पंक्ती प्रकाशमान होतात. मेरूदंडाचं प्रतीक असणारी गुढी आणि चैत्रांतल्या लखलखीत सूर्याचा प्रकाश आणि तेज प्राशन करणारे गुढीवरचे रजताचे चकचकीत पात्र. ज्ञानग्रहणाचा संकेत देणारा गुढीपाडवा हा तिसरा मंगमलय मुहूर्त. अक्षयतृतीया हा शेवटचा मुहूर्त. पण हा अर्धा असला तरी पूर्णत्व देणारा बिंदू आहे.
आपल्या संस्कृतीत असे शुभमुहूर्त साडेतीन. नादब्रह्माचे मंत्राक्षररूप म्हणजे प्रणव. त्या ओंकाराच्या मात्रा साडेतीन (अ, ऊ, म आणि चंदबिंदू). मूलाधार चक्रात वेटोळे घालून बसलेल्या त्या कुंडलिनी शक्तीचे वेढेही साडेतीन. मानवी कुडीचे मापही ज्याच्या त्याच्या हाताने साडेतीन आणि आदिशक्तीची प्रसिद्ध पीठेही साडेतीनच.
'ऋतूंना कुसुमाकर' हा वसंत ऋतू. नव्या नवतीचा ऋतू. नव्या निर्मितीचा, सृजनाचा ऋतू. चित्रविचित्र अशा सृष्टी सौंदर्याने नटलेला चैत्र. 'शिव-गौरी-दोलोत्सव या चैत्रात केला जातो. त्याच्या सांगतेचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया. 'वेदानां सामवेदोस्मि' असं भगवंत श्रीकृष्ण गीतेत सांगतात. ईशतत्त्वाची गायनाच्या आधाराने आळवणी हे सामवेदाचे स्वरूप. ऋग्वेद, यजुवेर्द, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये तो तृ़तीय आहे, अक्षय आहे. त्रिवेणी संगमातल्या गंगा, यमुना, सरस्वती. त्यातली सरस्वती ही गुप्त आहे, गुह्य आहे. ईश्वरही खोल आहे, गूढ आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्गही आपल्या आत आहे. तशीच सरस्वती ही गुप्तगंगा. ती तृतीय आहे.. अक्षय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे मुख्य तीन देव. महेश ही अंतिम सत्ता आहे. शिव हा विश्वाचा आदिगुरू आहे. शिव ज्ञानरूप आहे. त्याचा तिसरा नेत्र मायेचे निरसन करतो. त्रिदेवांत शिव तृतीय आहे. तसेच तो अक्षय आहे. आपल्या संगीतात सप्तस्वरांमध्ये गंधार तिसरा आहे. नाभिकमल हे त्याचे उगमस्थान आहे. गळ्यात हुकमी 'गंधार' असणे ही नादब्रह्माची कृपा आहे. गंधारावर विजय म्हणजे 'गंधर्व'. 'गंधार' तृतीय आहे, अक्षय आहे. 'ग'कार हे तिसरे व्यंजन. विद्यादेवता गजाननाचे हे स्वरूप. १४ विद्या, ६४ कलांच्या ज्ञानाचे स्वरूप. 'ग' कार हे तिसरे व्यंजन विद्यादेवता गजाननाचे हे स्वरूप. 'गं' हे गणरायाचे आदिबीज. त्याचे स्थान तृतीय आहे, अक्षय आहे. रज, तम, सत्त्व हे त्रिगुण. त्यातला शुद्ध सत्त्वगुण हा परमार्थपोषक. 'तुका म्हणे येथे सत्त्वाचे सार्मथ्य। करावा परमार्थ अहनिर्शी' तो हा सत्त्वगुण. तो तृतीय आहे, तसाच अक्षय आहे. इडा, पिंगळा. सुषुम्ना या तीन नाड्या. सुषुम्ना नाडी हा कुडीतला आधारवड आहे. सहस्त्रार चक्राच्या 'अमृततळ्या'पर्यंत पोहोचविणारी ही वाट आहे. सुषुम्ना नाडी तृ़तीय आहे, अक्षय आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रांतली 'म' बाराची मात्रा तिसरी. प्रणवरूप गणेशाचे 'मकार महामंडळ' हे मस्तकस्थान आहे. आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे कुंडलिनी जागृतीचे महत्त्वाचे अंतिम टप्पे हे 'म'कारांत त्यामुळे येतात. 'म'कार उच्चारताना होणारे दोन्ही ओठांचे एकत्र येणे हे अद्वैताचे सूचक आहे. ओंकाराची 'म' मात्रा तृतीय आहे. अक्षय आहे. 'दया, क्षमा, शांति। तेथे देवाची वस्ती' असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. सहा विकारांचा अपशम आणि अहंकाराचा समूळ उच्छेद यांची परिणती 'शांती'त होते. शांती ही अत्यंत दुर्लभ आहे. ती विरक्तांच्या गळ्यांत माळ घालते. देवाच्या निवासस्थानांत 'शनि' तृतीय आहे, अक्षय आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही आदिशक्तीची तीन प्रमुख रूपे. नीरक्षीरविवेक करणाऱ्या 'सोहं, अहं स: 'या हंसावर (परमहंस स्थितीवर) आरुढ असणारी, सार देणारी सारदा, सरस्वती, तृतीय आहे, अक्षय आहे.
'अक्षय-तृतीय' ची ही यादीही अक्षय आहे. परमार्थाच्या अत्युच्य अवस्थेला 'तुरीय' किंवा 'तुर्या' असे नाव आहे. जिवा-शिवाचे पूर्ण ऐक्य झाल्यावर ती दिव्य अनुभूती कथन करायला कुणीच उरत नाही. ज्ञान, ज्ञाता, झेय ही त्रिपुटीच विलयाला जाते. मग असा विचार येतो की अक्षयतृतीयाचे मूळ रूप 'अक्षय-तुरीया' वर नसेल! परमार्थाच्या साधकांसाठी 'अक्षय-तुरीया' साधावी, याशिवाय दुसरे आशीर्वचन कोणते?
0 comments:
Post a Comment