sponsers

Tuesday, December 14, 2010

<~~Aakashzep~~> गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय - by बेफिकीर [1 Attachment]

 

[Attachment(s) from =?UTF-8?B?4KS44KS+4KSX4KSwIOCkreCkguCkoeCkvuCksOClhw==?= included below]

हाच लेख पीडीएफ स्वरुपातही जोडला आहे

Source: http://yuvaadda.com/mimarathi/node/4423 / http://www.mimarathi.net/node/4423 

गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय 

by बेफिकीर

गझल कार्यशाळा व गझल परिचय यात फरक आहे. कार्यशाळेमध्ये तंत्राचा सराव करून घेतला जातो व काही वेळा लेखनातील सफाईचा! गझल परिचय यात गझलेबाबत एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे व त्याबरोबरच संपूर्ण गझल तंत्र, मात्रा कशा मोजाव्यात, सुटी कोणत्या घ्याव्यात, विविध वृत्ते कोणती, ती कशी योजावीत हे सोदाहरण लिहीलेले आहे.

भटसाहेबांनी मराठीला दिलेल्या देणगीमध्ये, म्हणजे 'गझलेची बाराखडी'मध्ये अर्थातच मात्रा कशा मोजाव्यात, विविध वृत्ते कोणती हे दिलेले नाही कारण तो त्यांचा हेतूच नव्हता. मात्र मला गेल्या काही काळात असे लोक भेटले की जे गझलतंत्र तर समजलेले आहेत पण त्यांना वृत्त व मात्रा याबाबत अनेक शंका आहेत.

अनेक पुस्तकांमधील माहिती, अनेक जाणकारांची मते व मला वाटलेले काही मुद्दे असे एकत्र घोळवून हा लेख लिहीलेला आहे.

खरे तर हा लेख माझ्या गझलसंग्रहात, 'बेफिकीरी'मध्येच छापणार होतो. पण काही कारणाने ते रद्द झाले.

मी स्वतः गझल लिहायला 'सुरेश भट डॉट इन' या संकेतस्थळावर व तेथील जाणकारांकडून शिकलो. हा लेख लिहिण्याचा अधिकार माझ्याकडे आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. मी बेधडक लिहीत आहे. मात्र इतके नक्की की हा लेख सर्व तांत्रिक शकांचे निरसन करू शकेल व गझलेबाबत एक दृष्टिकोनही देऊ शकेल.

माझ्या या लहानश्या प्रवासात अनेक मंडळींची मला मदत झाली. त्यांचे आभार!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

=================================================

गजलेचा इतिहास

प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की गझल हा काव्यप्रकार पूर्णतः उत्स्फुर्तपणे सुचणे जवळपास अशक्य आहे. इतर कविता, विशेषतः आज लिहिल्या जाणार्‍या मुक्तछंदातील कविता एखाद्याला वरपासून खालपर्यंत सलग लिहिणे शक्यही होईल. गझलेतील मात्र एखादी ओळ, एखादा शेर, एखादी कल्पना, असे सुचू शकते. त्यावरून व त्यानंतर इतर काही विचार गुंफले जाऊ शकतात. गझलेतील प्रत्येक शेर एक वेगळी कविता असल्याने, एकाच तंत्रात पाच विविध विचार कवीला एकत्रितरीत्या सुचणे जवळपास अशक्य असते.

याचमुळे गझल हा कृत्रिम काव्यप्रकार आहे अशी टीकाही होते आणि त्या कृत्रिमतेतही रंगीनता, सुलभता, सच्चाई आणि मनाला भिडणारा आशय मांडताही येतो. अशा प्रकारे, मूळ कल्पना काही टक्के आणि उरलेले टक्के 'कारागिरी' असे गझलेचे स्वरूप दिसते.

असे स्वरूप असलेली गझल करणे हे मुळीच कमीपणाचे लक्षण नाही. त्यात अपराधी मानण्यासारखे, आम्हाला शब्द ठोकावे लागतात असे म्हणण्यासारखे काहीही नाही. हा काव्यप्रकारच तसा आहे.

गझलेचा इतिहास मात्र खूपच जुना आणि क्लिष्ट आहे.

अरबांनी इराणवर केलेल्या हल्यानंतर 'स्थानिक फार्सी' भाषेऐवजी 'अरबी' बोलली जावी असा हुकूम काढला. इराण या तुलनेने दुर्बल असलेल्या देशातील साहित्य संस्कृती मात्र अरबांपेक्षा श्रेष्ठ होती असे म्हणतात. अरबी संस्कृतीत 'कसीदा' नावाचे काव्य रचले जायचे. सरदार, सुलतात, शहा अशा लोकांची जाहीर स्तुती करणारे काव्य असे त्याचे स्वरूप होते. हे काव्य रचून सादर केल्याबद्दल बिदागी मिळायची. हे काव्य गायच्य आधी 'तशबीब' म्हणून काही ओळी गायल्या जायच्या त्या गझल तंत्रात असायच्या.

हा तशबीब प्रकार इराण्यांनी स्वतळ्च्या संस्कृतीत स्वीकारला कारण तो मधुर होता व तो त्यांना आवडलाही.

काही जाणकारांच्या मते 'हाच' गझलेचा जन्म होता.

आश्चर्य करण्याजोगी बाब म्हणजे अरबांच्या सत्तापिपासेत असलेली सामाजिक स्थिती आणि त्यातच फुलणारी गझल!

इराण, अफगाणिस्तान मार्गे भारतात पोचलेल्या मुघलांनी शतकानुशतके राज्य केले. मुघलांची शासनव्यवस्था आपण सगळे जाणतोच!

कोणत्याही समाजाची स्थिती, संस्कृती व प्रगतीशीलता ही त्यातील स्त्रियांच्या स्थानावरून ठरायला हरकत नाही.

मुघल समाजात अर्थातच बुरखा ही स्त्रियांचे स्थान दाखवणारी वस्तू होती.

दिल्लीतील तो काळ हा मानवतेवर लागलेला कलंकच म्हणावा लागेल. नादिरशहा आणि अब्दाली या दोघांनी आणि अनेकदा मराठ्यांनी दिल्लीला 'उजाड' बनवले. अमानवी वृत्तीचे इतके प्रचंड प्रदर्शन अभूतपुर्वच म्हणावे लागेल. आज जो राजा / सुलतान आहे तो उद्या रस्त्यावर फरफटत आणला जात आहे. त्याचे डोळे फोडले जात आहेत. हाल हाल करून त्याला सर्वांसमक्ष मारले जात आहे. त्याचा जनानखाना विटंबिला जात आहे. आणि त्याचे राज्य लुटले जात आहे. हे करणारा दुसर्‍याच दिवशी स्वतःही अशाच परिस्थितीला सामोरा जात आहे. त्याला मारणारा कुणीतरी तिसराच निघत आहे.

आहे त्या परिस्थितीत घरदार सोडून पळणे, बायकांनी पुरुषाचा वेश धारण करून पळणे, सर्वत्र आगी लागलेल्या, सर्व काही उद्ध्वस्त झालेले, प्रेतांचा खच, कुणीही कुणालाही केवळ अन्नासाठी लुटत आहे अशी अत्यंत भयाण परिस्थिती दिल्लीत होती.

या काळात तेथे असलेली वस्ती आणि संस्कृतीही आजच्यासारखी नव्हतीच!

अत्यंत अरुंद गल्या, अस्वच्छ कारभार, त्यातच मशिदी, बुरख्याशिवाय स्त्री न दिसणे, अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती, व्यसनाधीनता, स्त्रीचा सहवास अशक्य असल्यामुळे किवा मूळ संस्कृतीतच ते मान्य असल्यामुळे समलिंगी संभोग अत्यंत मोठ्या प्रमाणावर असणे, सततची हिंसा, कशाचीही खात्री राहिलेली नसणे, गरीबी हे सर्व तेथील स्वभावविशेष होते.

मानवी मनाला स्थैर्य आणि सुरक्षितता अत्यावश्यक वाटतात. त्यामुळे या अशा परिस्थितीतही मिळतील ते चार बरे क्षण खूप असायचे. आवडत्या स्त्रीच्या चेहर्‍यावरून क्षणभरासाठी नकाब सरकणे, नजरानजर होणे, त्या नजरानजरेतूनच लाखो संदेश एकमेकांना पोचवले जाणे, व्यक्तीकरणासाठी इतर कोणतेही माध्यम उपलब्ध नसतानाही केवळ छतावर येऊन एकदा 'दीदार' व्हावा यासाठीची धडपड ही आयुष्यभर त्या अव्यक्त प्रेमाची तीव्रता बोचरी बनवत जाणारे आणि त्यातूनच हेलावणारे काव्य निर्माण करणारे घटक होते.

इराण व अफगाणिस्तान मार्गे येथे आलेल्या सैन्याबरोबर अनेक विद्वान, कवी, तत्ववेत्तेही आलेले होते. त्यांच्या येथील सैन्यात भारतीय सैनिक होते. दोन वेगळ्या भाषांमध्ये संभाषण अवघड असल्यामुळे नवीन भाषेची निर्मीती झाली. उर्दू! उर्दूचा अर्थ सैनिकांची छावणी असा आहे. उर्दूला आधी रेख्ता म्हणत!

केवळ चिखलातूनच कमळे उगवावीत तसे फार्सी आणि आता उर्दू कवींनी रचलेली शायरी ही त्याही परिस्थितीत दिल्लीची जान बनली.

प्रेयसीच्या नावाने कपडे फाडून फिरणारा आणि शायरी करणारा म्हणजेच गझलकार अशी टीका करणार्‍यांना या भयानक परिस्थितीत निर्माण होऊन रुजू पाहणार्‍या गझलेचे माधुर्य जाणवले नसावे.

लहानपणापासून अस्थैर्य, मारहाण, खून खराबा पाहणे, त्यातच कुठेतरी जीव जडणे, मात्र ते व्यक्तही करता यायच्या आधीच ताटातुट होणे आणि त्यानंतर 'गमे-रोजगार' म्हणजे उदरनिर्वाहासाठी दु:खे झेलतानाच त्या जुन्या तरल आठवणींनी मनात गर्दी करणे, पुन्हा जुने प्रेम अकस्मात भेटणे, एखादेच मीलन, त्यानंतरही ताटातुट, व्यसनाधीन होणे, कफल्लक किंवा कर्जबाजारी होणे, मयखान्यात जिंदगी गुजारणे, दारू पिऊ नका आणि प्रेमात पडू नका सांगणार्‍या धर्मोपदेशकांची खिल्ली उडवण्याची मानसिकता तयार होणे, मृत्यू समीप आल्याचे जाणवणे

... आणि या सर्व तीव्र आणि वेदनादायक अनुभुतीतून गझल रचणे!

आजच्या आपल्या शासनप्रणालीत कवितेला राजाश्रय नाही. ज्ञानपीठ वगैरे केवळ पुरस्कार आहेत. त्या मुघल संस्कृतीतच नव्हे तर अगदी शिवरायांच्या शासनातही कवींना राजाश्रय असायचा. कवी भूषण हा त्याचा पुरावा!

पठाणांनी केलेल्या भयानक हिंसक लुटीमुळे मोडकळीस आलेल्या दिल्लीतील मुघलांचे साम्राज्य नामधारी राहिलेले होते. औरंगजेबानंतर हिंमतवान राजाच लाभलेला नव्हता. मात्र हे लाल किल्यातील राजे विलासी तेवढे होते. पण त्यांच्यातील शेवटचा राजा, बहादुरशहा जफर हा स्वतःच विद्वान कवी होता. त्याने शायरीला राजाश्रय दिला. आणि तेच युग गझलेचे आजवरचे सर्वात महत्वाचे युग ठरले.

जफरच्या आधीही अनेक शायर होते. मीर दर्द, सौदा, वगैरे! हे श्रेष्ठच होते. पण त्या काळातील मीर तकी मीर हा आजही गझलेचा सम्राट समजला जातो.

सम्राट जफरच्या काळात स्वतः गालिब, जौक, मोमिन हे शायर झाले. जौकचा शिष्य दाग देहलवी हा तुफान लोकप्रिय ठरला. त्यानंतर 'दाग स्कूल'चे अनेक शायर झाले. आजही ती परंपरा बर्‍याच मोठ्या प्रमाणावर आहे. जिगर, मजाज, शकील, साहिर हे अलीकडचे शायर!

टप्याटप्याने गझल काहीशी बदलत गेली. सुरुवातीला प्रेमालाप करणारी गझल हल्ली जदीद, म्हणजे आधुनिक रूप घेऊन समाजावर भाष्य करते.

मात्र जवळपास सहा शतकांचा अनुभव पाठीशी असल्याने उर्दू गझलेत अनेक संकेतात्मक शब्दप्रयोग आहेत. जसे शमा परवाना, गुलो बुलबुल वगैरे!

मराठी गझल तरुण असल्यामुळे अजून तितकेसे संकेत निर्माण झालेले नाहीत.

मात्र, मागे वळून पाहिल्यास असे दिसेल की:

- गझल हा काव्यप्रकार कृत्रिम आहे व परकीय आहे, मात्र त्यातील आशय कोणत्याही संस्कृतीला आपलासा वाटू शकतो इतकेच नाही तर तो डोक्यावरही घेतला जातो.

- उर्दू गझल वाचून लक्षात येईल की भावनांची पराकोटीची तीव्रता अत्यंत दैनंदिन भाषेत काहीश्या मिश्कील आणि बर्‍याचश्या प्रभावीपणे व्यक्त केली जाते. हे गझलेचे लक्षण मानायला हवे.

- प्रेमकाव्य हे गझलेचे प्राथमिक स्वरूप होते व ते आजही आहेच! गझल हे हाडामांसाच्या माणसाचे काव्य आहे. यात कवी जे म्हणतो तीच अनुभुती लाखोंना आलेली असू शकते. 'अरे? हे आपणही अनुभवलेले आहे' असे वाटून उत्स्फुर्त दाद देण्यास गझल कारणीभूत ठरू शकते. मानसिक वेदना हा गझलेचा पाया आहे असे दिसते तर त्या वेदनांचा सोहळा साजरा करून चेहरा आनंदी असल्याचे भासवणे हा गझलेचा कळस! अर्थात, या स्वरुपात खूपदा बदलही घडू शकतोच!

- आज आपल्याकडे शायरीचे युग नाही. मात्र गालिब, जौकच्या काआत शायरीचे युग होते. चौकाचौकात लोक शायरीवरच चर्चा करायचे. मोठाल्ले मुशायरे घडायचे दरबारात! त्यातूनच राजकारणही निर्माण व्हायचे. हझल व तरही गझल हे त्याचेच परिणाम म्हणता येतील. हझल ही अनेकदा हास्योत्पादक, द्वयर्थी शेर असलेली असते तर तरही गझल म्हणजे स्पर्धा म्हणून एकाचवेळी शायरांना एक ओळ देऊन त्यावर त्यांच्याकडून मुशायर्‍यात जाहीर व उत्स्फुर्त गझल ऐकणे! जौकचा शिष्य 'दाग' हा नेमका याच प्रकारात सरस ठरला. अनेकांच्या मते त्याची शायरी जबान बयान शायरी आहे. म्हणजे शब्दांची करामत! मीरसारखा हेलावणारा आशय त्याच्याकडे नाही.

-देहलवी व लखनवी हे उर्दू शायरीचे दोन महत्वाचे महाल! त्यात देहलवी श्रेष्ठ समजला जायचा. देहलवी शायर विरहावर प्रेम करणारा व त्याच्यावरच प्रभावी भाष्य करणारा तर लखनवी शायर केवळ प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन करणारा असा साधारण फरक होता.

- गझल हा काव्यप्रकार कृत्रिम असल्यामुळे अर्थातच अनेक गझलकारांचा प्रवास खालीलप्रमाणेच होतो.

* तंत्र शिकणे

*तंत्रावर हुकुमत येत आहे याचा आनंद झाल्यामुळे अधिकाधिक गझला रचत राहणे

*सफाई येणे

*त्यानंतर आशयाच्या बाबतीत, म्हणजे त्याचा सच्चेपणा, तीव्रता, प्रभावी मांडणी, अचूक मांडणी याकडे लक्ष जाणे

या व यापुढील प्रक्रियांमध्ये अनेकदा काल्पनिक शेर होऊ शकतात. पण ते वाईट असतात असे नव्हे. जास्तीतजास्त प्रामाणिक शेर होणे हे उद्दिष्ट असले की पुरेसे आहे. 'घिसते घिसते मिट जाता आपने अबस बदला' असे म्हणताना गालिब खरोखरच प्रेयसीच्या (किवा अल्लाह / बादशाहच्या) उंबर्‍यावर डोके घासत नसतो.

एकंदरच महत्वाच्या शायरांची यादी इथे देत आहे.

अमीर खुसरो - १२५३ ते १३२५
मुहम्मद कुतुब शाह - १५६५ ते १६११
वली महम्मद उर्फ़ वली दखनी - १६६७ ते १७०८
मिर्ज़ा मुहम्मद रफ़ी उर्फ़ सौदा - १७१३ ते १७८०
ख्वाजा मीर दर्द - १७२१ ते १७८५
मीर तकी मीर - १७२३ ते १८१०
नज़ीर अकबराबादी - १७४० ते १८३०
बहादुरशहा जफ़र - १७५५ ते १८६२ ( सम्राट जफ़र )
आतिश - १७७८ ते १८४६
ज़ौक - १७८९ ते १८५४
गालिब - १७९६ ते १८६९
ब्रिज नारायण चकबस्त - १८८२ ते १९२६ (हिंदू शायर )
मोमीन - १८०१ त१ १८५२
अमीर मीनाई - १८२६ ते १९००
दाग देहलवी - १८३१ ते १९०५
अल्ताफ़ हुसेन उर्फ़ हाली - १८३७ ते १९१४
डॊ. रघुपती सहाय उर्फ़ फ़िराक गोरखपुरी - १८९६ ते १९८२ (हिंदू शायर )
हसरत मोहानी - १८७५ ते १९५२
सर मुहम्मद इक्बाल - १८७७ ते १९३८
जिगर मुरादाबादी - १८९० ते १९६०
जोश मलिहाबादी - १८९८ ते १९८२
फ़ैज़ अहमद फ़ैज़ - १९११ ते १९८४
अलि सरदार जाफ़री - १९१३ ते २०००
जॊं निसार अख्तर - १९१४ ते १९७६
शकील बदायुनी - १९१६ ते १९७०
कैफ़ी आज़मी - १९१८ ते २००२
कतील शिफ़ाई - १९१९ ते २००१
साहिर लुधियानवी - १९२१ ते १९८०
अहमद फ़राज़ - १९३१ ते २००८

या शिवाय मजाज व गुलज़ार हेही दोन महत्वाचे कवी!

दशकानुदशके सांस्कृतिक, सामाजिक पातळ्यांवर बदलत्या अवस्था पाहत पाहत उर्दू गज़ल आता भारतात रुजलेली होती मात्र, बरीच बदलली होती. मीर, गालिबच्या काळातील प्रेम, व्यथा या जरी तशाच राहिल्या असल्या तरी बयाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक विषय, राजकीय परिस्थितीचे उल्लेख येऊ लागले होते.

याला कारणे अनेक होती. इंग्रजांची राजवट, स्वातंत्र्यलढा, शासनप्रणाली बदलणे वगैरे वगैरे! समाज आधीहून थोडा तरी मुक्त झालेला असावा. अनेक स्त्रियांचे काव्यही दिसू लागले.

एकंदर, आपण पाहिले की कितीतरी वळणे घेत, चढ उतार सहन करत, धक्के खात बिचारी गज़ल शेवटी आम जनतेमधे रुजली.

याचे एकमेव आणि एकमेव कारण हेच की गज़लेत 'आपल्या भावना प्रकट झाल्या' याचा अनुभव रसिकाला येतो.

गज़ल दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या अनुभुतींवर केले जाणारे तंत्रशुद्ध काव्य आहे.

गज़ल हे तुमचे, माझे, कुठल्याही सामान्यातील सामान्य माणसाचे काव्य आहे.

गज़लेत मनुष्याच्या जीवनामधील अत्यंत मूलभूत भावनांवर, घटकांवर भाष्य केलेले आढळते. जसे प्रेम, विरह, दु:ख, संवादात्मकता, आर्तता, व्याकुळता इत्यादी!

आता गज़ल उर्दूमधून उर्दूच्या इतर बहिणींकडे स्थलांतरित व्हायला लागली. हिंदी, बंगाली, गुजराती व

मराठी.....

==============================================

मराठी गझल

मराठी भाषेला 'गज़ल' म्हणजे काय असते ते खर्‍या अर्थाने शिकवले कविवर्य सुरेश भट साहेबांनी! त्या आधीचे 'गज़ल' या सदरात मोडणारे सर्व साहित्य अशुद्ध होते. त्या खर्‍याखुर्‍या गज़ला नव्हत्या. विनय वाईकर साहेबांनी किंवा सुरेशचंद्र नाडकर्णी साहेबांनी गज़ल जरूर समजावुन सांगीतली, पण बाराखडी लिहिली नाही. बाराखडी भटांनी लिहिली.

बाराखडीमधे भटसाहेबांनी गज़लेचा प्रत्येक तांत्रिक भाग स्पष्ट केला. मराठी गजलसाठी माधवराव पटवर्धन, सुरेशचंद्र नाडकर्णी, डॉ. विनय वाईकर, मंगेश पाडगावकर ही नावे महत्वाची आहेत. सुरेश भट हे नाव मात्र त्यात सर्वात वर आहे कारण त्यांनी मराठीला गजलतंत्र शिकवले व ते सर्व कवींसाठी उपलब्धही करून दिले.

कवीवर्य सुरेश भट

भटसाहेबांनी मराठी माणसाला गजलचे तंत्र शिकवले. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्याचे अर्धे आयुष्य गजलेसाठी व्यतीत केल्यावर ते तंत्र कवीना शिकवले. त्यांची बाराखडीतील मते शिरसावंद्य आहेत. भटसाहेबांच्या त्या बाराखडीमुळे गजलकारांच्या पिढ्या तयार झाल्या व होत आहेत. मला गजल कशी रचली जाते हे बाराखडी नसती तर कधीच कळले नसते.

भटसाहेबांचा शब्दसंचय व अचूक छटा असलेला शब्द वापरायचे प्रभुत्व अचंबीत करणारे आहे.

बेरका होता दिलासा, मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता

यातील दिलाश्याला बेरका म्हणणे, खंजिराला लाघवी हे विशेषण देणे हे शिकण्यासारखेच आहे.

एल्गार हे एकच पुस्तक खरे तर गझलेच्छूचा गजलकार करायला पुरेसे आहे.

भटसाहेबांच्या गजलेमध्ये कित्येकवेळा आक्रमकताही आलेली दिसते.

त्यांच्याबाबत मिळालेल्या माहितीवरून ते एकाचवेळी अत्यंत हळवे, मिष्कील, बेदरकार व संवेदनाक्षम मनाचे व्यक्तीमत्व असावे असे वाटते.

त्यांच्या अनेक गजला व गीते महाराष्ट्राला पाठ आहेत. त्या सर्वोच्च पातळीवर गायल्याही गेल्या आहेत.

काव्यावरची हुकुमत त्यांची पुस्तके वाचून लक्षात येते.

त्यांच्या गजलेमध्ये काहीवेळा उघड होणारी आक्रमकता मला फारशी भावत नाही.

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता

पण ती कदाचित त्यांच्या काळामध्ये समाजामध्ये गजलेबाबत किंवा गझलकाराबाबत असलेल्या औदासीन्यामुळे आलेली असावी. पण त्यांच्या गजलांमधील तरलता व नाजुकपणा हेही वादातीत आहेत.

सुरेश भटांच्या गझलेत व उर्दू गझलेत मला जाणवलेले फरक!

१. उर्दू रिवायती गझलेत सामाजिक आशय फारसा जाणवत नाही. भटसाहेबांच्या गझलेत जाणवतो. त्यांच्या गझलेत टीकात्म शेरही अनेक सापडतात.

२. प्रेम या विषयावर भटसाहेबांची गझल तुलनेने कमी असावी. उर्दूत ते अधिक आहे असे जाणवते.

३. शब्द भटसाहेबांना शरण गेलेले असावेत. तसे ते बहुधा गालिबलाच गेलेले होते. शब्दांवरून उड्डाण प्रचंड आहे दोघांचे!

४. उर्दूतील गझलकारांनी गझलेचे तंत्र पुस्तक स्वरुपात कुठेही समजावून सांगीतले नसावे. कुणीतरी मला म्हणाले होते की सौदा किंना इन्शा यापैकी एकाने तसे लिहीले होते म्हणे! ते मला माहीत नाही. भटसाहेबांनी मात्र ते लिहीले. आणि त्यामुळेच आज मी हा उद्धटपणा करायला समर्थ झालो आहे.

५. उर्दूतील बहुसंख्यांनी तखल्लुस वापरले, भटसाहेब तखल्लुसच्या विरुद्ध होते.

भटांची मराठी गझल हे काही प्रमाणात जोमदार काव्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यात उर्दू गझलेतील तरलता, नाट्यमयता, मृदुता मला तरी अनेकदा फारशी जाणवत नाही. आश्चर्यकारकरीत्या, त्यांनी लिहीलेली गझलतंत्रातील गीते मात्र अत्यंत तरल आहेत. मल्मली तारुण्य, मालवुन टाक दीप सारखी!

त्यांच्या काव्यात अनेकदा 'हाय, गडे' असे शब्द येतात. ते अपरिहार्य आहेत असेही मला वाटत नाही. एखादा मिसरा कंसात का असावा हे त्यांनी बहुधा जाहीर नोंदवलेले नसावे. त्यांच्या अनेक कल्पना मला लक्षात येत नाहीत. यावर आणखीन एकांनीही असे लिहीले आहे म्हणून मी त्यांनीच दिलेली उदाहरणे वापरतो. विजांशी ओठांनी झिम्मा खेळणे, हाती उन्हे धरणे अशा कल्पना निदान माझ्या मनाला नेमकेपणाने जाणवत नाहीत. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे अनेकदा त्यांच्या गझलेचे स्वरूप भासते.

याचवेळेस, फक्त त्यांच्यामुळेच मराठीला शुद्ध आणि सशक्त गझल मिळाली आहे. अनेकांना 'गझल' म्हणजे काय आणि कशी रचायची याचे धडे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्या अनेक प्रतिमा आज अनेक कवी तशाच्या तशा वापरतानाही दिसतात. त्यांच्या काव्याचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यांच्या कित्येक गझला मुशायर्‍याची शान असणार हे नक्कीच! आज होणारे गझलोत्सव, गझलांजली, गझल सहयोग सारखे मोठे व अत्यंत छोटे कार्यक्रम हे केवळ भटांनी गझल शिकवली म्हणूनच होऊ शकतात. एक मात्र खरे आहे, मी जरी त्यांना भेटण्याइतका भाग्यवान नसलो तरीही मिळालेल्या माहितीनुसार .... 'ते जसे होते... तशीच गझल त्यांनी रचली'... !

===============================================

गझलतंत्र पाहण्याआधी मात्रा आणि वृत्ते याबाबत लिहीत आहे.

मात्रा व विविध वृत्ते

गजल हे एक वृत्तबद्धच काव्य आहे. त्यात बेशिस्तपणे लिहिणे अमान्य आहे. गजलेतील प्रत्येक शेरातील प्रत्येक ओळीच्या मात्रा समानच असतात. गजल गणवृत्तात अथवा मात्रावृत्तात रचली जाते.

वृत्ताचे तीन प्रकार पडतात.

१. प्रत्येक ओळीतील शब्दांच्या एकूण मात्रा जर समान भरत असतील तर ते लिखाण वृत्तबद्ध आहे. - मात्रावृत्त!
२. प्रत्येक ओळीतील लघू व गुरू अक्षरांचा क्रम समान आहे ते वृत्तबद्ध लिखाण आहे. - गणवृत्त!
३. प्रत्येक ओळीतील अक्षरांची संख्या जर समान असेल तर ते अक्षरछंदातील लिखाण आहे. -अक्षरछंद!

गज़ल अक्षरछंदात लिहिली जात नाही.

जेव्हा आपण गज़लेच्या प्रत्येक ओळीत लघू व गुरू अक्षरे ठराविक क्रमानेच लिहितो तेव्हा आपोआपच प्रत्येक ओळीच्या मात्रा समान भरतातच. याला अक्षरगणवृत्त किंवा नुसते गणवृत्त असे म्हणतात. अशा वृत्ताचा वापर केल्यास मात्रा मोजत बसाव्या लागतच नाहीत. परंतू काही वेळा गज़ल अक्षरगणवृत्तात न लिहूनही तिच्या प्रत्येक ओळीच्या मात्रा समान भरतात. म्हणजे, लघू व गुरू अक्षरांचा क्रम ओळीओळीत वेगवेगळा घेऊनही प्रत्येक ओळीच्या मात्रा समान असू शकतात. त्याला मात्रावृत्त असे म्हणतात.

वृत्तात लिखाण करणे हा फ़क्त सरावाचाच भाग आहे. वृत्ताची भीती बाळगण्यासारखे काहीही नाही. अगदी मात्रावृत्तात जरी गज़ल रचली तरीही सुरुवातीलाच जरा मात्रा मोजाव्या वगैरे लागतात. हे फ़क्त 'लय' डोक्यात बसेपर्यंतच करावे लागते. एकदा ओळीची लय पक्की झाली, जी सरावाने होतेच, की मात्रावृत्तात अगदी आत्मविश्वासाने गज़ल लिहिता येईल.

एकंदर:

१. गज़लेतील प्रत्येक ओळीच्या मात्रा समान आल्याच पाहिजेत.
२. गज़ल कधीही अक्षरछंदात लिहिली जात नाही. गज़लेतील ओळीतील अक्षरांची संख्या महत्वाची नाही.
३. अक्षरगणवृत्तात गज़ल लिहिल्यास आपोआप सर्व ओळीतील मात्र समान येतातच.
४. मात्रावृत्तात गज़ल लिहिल्यास अक्षरांचा क्रम जरी ओळी-ओळीत वेगवेगळा आला तरी मात्रांची संख्या समानच असायला हवी.

गज़ल कधीही वृत्ताबाहेर (गणवृत्ताबाहेर किंवा मात्रावृत्ताबाहेर ) लिहिली जाऊ शकत नाही. असमान मात्रा असलेल्या ओळी किंवा अक्षरगणवृत्तातील लघू - गुरू अक्षरांचा क्रम न पाळणारी गज़ल ही 'गज़ल' नसते.

मात्रा -

वृत्ताची माहिती होण्यासाठी मात्रा कशा मोजता येतील ते बघणे जरूरीचे आहे.

मात्रा म्हणजे - कोणताही शब्द / अक्षर उच्चारण्यास लागणारा काळ!

हा काळ मोजण्यासाठी एक मात्रा, दोन मात्रा असा मोजला जातो.

मराठी भाषेत तीन मात्रांचे अक्षर नसते. तसेच, दीड, अडीच मात्रांचे वगैरेही अक्षर नसते.

अक्षर एक तर एक मात्रेचे किंवा दोन मात्रांचेच असू शकते.

उघड आहे, मात्रा म्हणजे एखादी ओळ उच्चारण्यास लागणारा काळ असल्यामुळे व गज़लेतील प्रत्येक ओळ समान मात्रांचीच असल्यामुळे गज़लेच्या सर्व ओळी समान कालावधीतच उच्चारून होतात. यामुळेच प्रत्येक गज़ल ही 'गेय' होतेच! संगीतकारासाठी गज़लेला चाल लावून ती गीतस्वरुपात प्रसिद्ध करणे अगदी सहज शक्य होते ते यामुळेच.

सुरुवातील, 'प्रत्येक शब्दाच्या / अक्षराच्या मात्रा किती' हे मोजूनच माणूस एखादी ओळ रचणार यात काहीही गैर नाही. मात्र, वृत्ताप्रमाणेच, मात्रा ही पण एक सरावाने पकडीत येणारी गोष्ट आहे. सरावानंतर मात्रा मोजत बसाव्या लागत नाहीत.

मात्रा कशा मोजायच्या हे मात्र अनेक उदाहरणांसहित पहावे लागेल. कारण हा गज़लतंत्रातील, 'मतला-रदीफ़-काफ़िया-अलामत' यानंतरचा सर्वात महत्वाचा भाग आहे.

खाली अनेक अक्षरांच्या, ओळीच्या मात्रा मोजून दाखवलेल्या आहेत.

मराठीतील सर्व अक्षरे एक किंवा दोन मात्रांचीच असू शकतात. अधले मधले आकडे किंवा दोनहून अधिक मात्रा मराठीत नाहीत.

मराठी भाषेतील एकंदर स्वर खालीलप्रमाणे आहेत.

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ:

यातील फ़क्त अ, इ व उ हे तीनच स्वर एका मात्रेच आहेत. याचा अर्थ असा की ज्या अक्षरांमधे हे स्वर असतील ती अक्षरे सुट्टी असल्यास त्यांची मात्रा एकच होईल. एक मात्रेच्या अक्षरांना लघू अक्षर म्हणतात. या विधानातील 'सुट्टी असल्यास' या शब्दप्रयोगाचा अर्थ पुढे दिलेलाच आहे.

तसेच, आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: या प्रत्येक स्वराच्या मात्रा दोन होतात. याचा अर्थ असा की मराठीतील ज्या अक्षरांमधे हे स्वर असतील त्यांच्या मात्रा दोन होणारच! दोन मात्रांच्या अक्षरांना गुरू अक्षर असे म्हणतात.

उदाहरणे:

अहमदनगर - या शब्दातील प्रत्येक अक्षराची मात्रा एकच आहे. त्यामुळे एकूण मात्रांची संख्या झाली ७!

पुणे - या शब्दातील पु या अक्षराची मात्रा एक तर णे या अक्षराच्या मात्रा दोन - एकूण मात्रा - ३!

मुंबई - मुं या अक्षराच्या मात्रा २, ब या अक्षराची मात्रा १ तर ई या अक्षराच्या मात्रा २ - एकूण मात्रा - ५

सोलापूर - या शब्दातील सो च्या २, ला च्या २, पू च्या २ तर र ची १ मात्रा - एकूण मात्रा - ७

औरंगाबाद - औ (२), रं (२), गा (२ ), बा (२), द (१) - एकूण मात्रा ९

पांडुरंग - या शब्दात पा हे अक्षर 'आ' या स्वराचेही आहे व त्यावर अनुस्वारही आहे. तरीही त्याच्या मात्रा दोनच! तीन मात्रा होऊ शकत नाहीत. पां (२), डु (१), रं(२), ग(१) - एकूण मात्रा - ६

साध्या अक्षरांच्या मात्रा कशा मोजायच्या ते आपण पाहिले.

मात्र, जोडाक्षरांबाबत नियम जरा बदलतो.

ज्या शब्दात जोडाक्षर आहे त्या जोडाक्षराआधीचे अक्षर जर लघू असेल तर ते दीर्घ मानले जाते.

उदाहरणे:

आकर्षण - या शब्दातील 'क' खरा तर लघू आहे. पण 'र्ष' मधील 'अर्ध्या र' चा भार 'क' वर पडतो. म्हणजे, उच्चार करताना 'कर' ( पूर्ण क व अर्धा र) असा केला जातो. त्यामुळे, या लघू क च्या मात्रा दोन होतात. तो गुरू होतो. गंमत म्हणजे 'र्ष' हे अक्षर स्वत: जोडाक्षर असून त्याचा उच्चार करताना मात्र 'अर्धा र' क बरोबर उच्चारला गेल्यामुळे 'उर्वरीत' जो 'ष' राहतो त्याची मात्रा एकच होते. एकूण मात्रा - आ (२), कर (२), ष (१) व ण (१)! = ६

विश्वास - यातील वि हे अक्षर लघू अक्षर आहे. पण श्वा मधील श चा भार त्यावर पडल्यामुळे ते गुरू झाले. 'विश' असा उच्चार झाला. जो उच्चार करायला दोन मात्रांचा कालावधी लागला. श्वा मधील उर्वरीत 'वा' हा उच्चाराचा भाग मुळातच दोन मात्रांचा आहे कारण त्याचा स्वर 'आ' आहे. त्यामुळे विश (२), वा (२), स(१) = एकूण मात्रा - ५

निर्धास्त - यातील 'नि' लघू आहे, पण 'र्धा' या अक्षरातील 'र' चा भार त्याच्यावर पडल्यामुळे ते गुरू झाले. त्याच्या मात्रा झाल्या दोन! मात्रा म्हणजे उच्चार करायला लागणारा कालावधी! 'निर' असा उच्चार करायला दोन मात्रांचा कालावधी लागला. उच्चारामधील उरवरीत 'धा' मुळातच दोन मात्रांचा आहे कारण त्याचा स्वर 'आ' आहे. या 'धा'च्या पुढे 'स्त' हे जोडाक्षर आहे. त्यातील 'अर्ध्या स'च्या उच्चाराचा भार जरी 'धा' वर पडत असला तरी मुलातच 'धा' हे अक्षर दोन मात्रांचे असल्यामुळे त्याच्या मात्रा बदलत नाहीत, त्या दोनच राहतात. आता 'स्त' मधील अर्ध्या 'स' चा उच्चार 'धा' या अक्षराने ढापल्यामुळे बिचाया 'स्त' कडे उच्चारायला फ़क्त 'त'च राहतो. त्यामुळे त्या अक्षराच्या मात्रा होतात १! एकूण मात्रा निर (२), धास (२), त (१) = ५

शल्य - या शब्दातील 'ल्य' मधील 'अर्धा ल' श बरोबर उच्चारला जात असल्यामुळे श च्या मात्रा दोन तर उरलेल्या 'य' ची मात्रा एकच! एकून मात्रा शल (२), य (१) = ३

आपण पाहिले की:

जोडाक्षराच्या आधी जर लघू अक्षर असेल तर त्याच्या मात्रा दोन होतात, जर गुरू अक्षर असेल तर त्याच्या मात्रा दोन असतात त्या दोनच राहतात. लघू अक्षरात अर्धा उच्चार केला गेल्यामुळे जोडाक्षरातील उर्वरीत भाग हा 'अ, उ'इ' या स्वरांपैकी असेल तर त्या उर्वरीत भागाची मात्रा होते एक! म्हणजे, उर्वरीत भाग जर 'लघू' असेल तर त्याची मात्रा एकच उरते.

काही अपवाद!

हे अपवाद तितकेच महत्वाचे आहेत. यांचा वापर करण्याची वेळ गज़लकारांवर अनेक वेळा येते.

अपवाद क्रमांक १ -

क्ष हे एक अपवादात्मक अक्षर आहे. खरे तर ते एक लघू अक्षर आहे, कारण त्याचा स्वर 'अ' हा आहे. तसेच, ते आपल्या लिपीत जोडाक्षर नसून मूळ अक्षर आहे.

हे अक्षर जर 'क्षमा' या शब्दात आले तर त्याची मात्रा एकच राहते. मात्र ते अक्षर जर 'अक्षर' या शब्दात आले तर 'अक्षर' मधील 'अ' च्या मात्रा दोन होतात, कारण क्ष मधील अर्धा क हा 'अ' या अक्षराबरोबर उच्चारला जातो तर श हा एकटाच राहतो. म्हणजे, मुळात 'क्ष' हे जोडाक्षर नसूनही ते जोडाक्षराप्रमाणे वागले.

त्याचप्रमाणे 'ज्ञ' हे अक्षर जोडाक्षर नसूनही 'अज्ञ', 'अनभिज्ञ' अशा शब्दांमधे आले की अनुक्रमे 'अ' व 'भि' च्या मात्रा दोन करते. कारण त्यातील 'द' चा उच्चार आधीच्या अक्षरात मिसळतो. उरलेल्या 'न्य' च्या मात्रा दोन नाहीत, एकच आहे. कारण ते मुळात जोडाक्षर नाही. 'अज्ञान' या शब्दात 'अ' च्या मात्रा दोन व 'ज्ञा'च्या ही मात्रा दोन कारण 'ज्ञा'मधे 'आ' हा स्वर आहे जो गुरू आहे.

तेव्हा, अशी अक्षरे मुळात जोडाक्षरे नसूनही शब्दात मधे आली व त्यांच्या आधीचे अक्षर लघू असले तर त्याला गुरू करून टाकतात.

अपवाद क्रमांक २ -

काहीकाही वेळा जोडाक्षर पुढे असूनही मागच्या लघू अक्षराच्या दोन मात्रा होत नाहीत.

'पुन्हा' हा असा एक शब्द! यात 'न्हा' हे जोडाक्षर असूनही 'पु' च्या उच्चारात त्यातील 'न' मिसळत नाही. 'पुन्हा'चा उच्चार 'पुन - हा' असा न होता 'पु-न्हा' असाच होतो. मात्रा नेहमीच उच्चारावरच ठरतात.

'कट्यार' हा असाच आणखीन एक शब्द! यात 'ट्या' चा 'अर्धा ट' 'क'शी लग्न करत नाही. 'कट्यारचा' उच्चार 'क-ट्या-र' असाच असून 'कट-या-र' असा होत नाही.

काही वेळा पहिले जोडाक्षरच येते. अशा वेळी त्या अक्षराचा स्वर जर 'अ, उ, इ' यापैकी असेल तर त्याची मात्रा एक व त्याचा स्वर गुरू असेल तर मात्रा दोन होतात. जसे स्वत: मधील स्व एका मात्रेचा, प्रकार मधील प्र एका मात्रेचा, त्रास मधील त्रा दोन मात्रांचा, प्रेषित मधील प्रे दोन मात्रांचा!

आता उदाहरण म्हणून अनेक शब्दांच्या मात्रा पाहू:

मित्र - ३
सत्व -३
स्वत: - ३ (स्व ची एक मात्रा व त: च्या दोन मात्रा )
गज़ल - ३
संस्कृत - ४ (संस च्या दोन, कृ ची एक तर त चीही एक मात्रा )
मतला - ४
व्यय - २
अपव्यय - ५ (प व 'व्य' मध्ल 'अर्ध्या व'चा भार आला )
अफ़गाणिस्तान - अ (१), फ़(१), गा (२), णिस (२), ता(२), न(१)
ब्रिजवासी - ब्रि हे जोडाक्षर असले तरीही त्याची एक मात्रा, ज (१), वा(२), सी(२) = ६
सार्थक - सार, थ, क = ४
परिक्रमा - प, रिक, र, मा = ६
डुढ्ढाचार्य - डुढ (२), ढा (२), चार (२), य(१) = ७
क्षय - २
अक्षय - अक (२), श(१), य(१) = ४
धृतराष्ट्र - ध्रु (जोडाक्षर तरी पहिले आले व लघू आहे ) (१), त (१), राष्ट (२), र (१) = ५
धारातीर्थी - सर्व अक्षरे गुरू - ८ मात्रा!

आता आपण ओळींच्या मात्रा मोजू.

याच ओळीच्या मात्रा मोजू.

आता = ४
आपण = ४
ओळींच्या = ६
मात्रा = ४
मोजू = ४
एकूण मात्रा = २२

काही उदाहरणे:

१)

जाग आली, स्वप्न होते
बेमुरव्वतखोर व्हावे

जाग = ३
आली =४
स्वप्न =३
होते = ४ - एकूण मात्रा = १४

बेमुरव्वतखोर = १०
व्हावे = ४ = एकूण मात्रा - १४

२)

घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = २६

३)

यमाचा वेगळा, ञानेश्वरांचा वेगळा रेडा
१ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ = २८ मात्रा

४)

पहाड झाला चढून आता दरीत मारायची मुसंडी
१ २ १ २ २ १ २ १ २ २ १२ १ २ २ १ २ १ २ २ = ३२ मात्रा

५)

इर्शाद बोलणारे वा वा म्हणून गेले
२ २ १ २ १ २ २ २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

अशा रीतीने ओळीच्या मात्रा मोजता येतात.

आपण आधीच पाहिले की गज़लेतील प्रत्येक ओळीच्या मात्रा समान असल्याच पाहिजेत.

मात्रावृत्ताप्रमाणे लिहायला गेल्यास लयीची जाणीव होणे अत्यावश्यक असते. अक्षरगणवृत्तात जेव्हा ओळ लिहिली जाते तेव्हा मुळातच प्रत्येक ओळीत लघू व गुरू अक्षरांचा क्रम समानच असल्यामुळे आपोआपच प्रत्येक ओळीच्या मात्रा समान येतातच. यासाठी विविध वृत्ते आत्मसात करणे आवश्यक ठरते. अक्षरगणवृत्त म्हणजे लघू व गुरू अक्षरांचा ठराविक क्रम हे आपण आधी पाहिलेच होते.

गज़लकारांनी अनेक वृत्ते वापरलेली आहेत. त्यापैकी काही नित्य वापरली जाणारी वृत्ते इथे दाखवली जाणार आहेत.

त्यापुर्वी:

१. गज़लेच्या प्रत्येक ओळीच्या मात्रा समानच असायला हव्यात.
२. मात्रा कशा मोजायच्या ते आपण पाहिले.
३. अक्षरगणवृत्तात गज़ल लिहिली तर आपोआपच प्रत्येक ओळीतील मात्रा समान येतातच.
४. मात्रावृत्तात लिहिण्यासाठी प्रत्येक ओळीच्या मात्रा मोजणे किंवा लयीवर पकड घेणे आवश्यक आहे.
५. गज़ल अक्षरछंदात लिहिली जात नाही. म्हणजे, अक्षरांची संख्या समान असावी हे गज़लेत आवश्यक नाही.

वृत्ते:

आधी सांगीतल्याप्रमाणे वर्षानुवर्षे कवी अनेक वृत्ते सातत्याने उपयोजत आले आहेत.

वृत्त म्हणजे लघू व गुरू अक्षरांनी ठराविक क्रमाने एखाद्या ओळीत येणे!

आपण लघू अक्षरासाठी 'ल' हे अक्षर तर गुरू अक्षरासाठी 'गा' हे अक्षर घेऊ. हे 'सोपीकरण' व इतर अनेक 'सोपीकरणे' भटसाहेबांनी आधीच केलेली आहेतच. फ़क्त त्यांच्या प्रकाशित साहित्यात सर्व माहिती एकाच ठिकाणी नसल्यामुळे ती एका ठिकाणी उपलब्ध करणे हा या सर्व लेखमालिकांच्या उद्देशांपैकी एक उद्देश आहे.

सर्वप्रथम आपण गज़लकारांकडून वारंवार वापरले जाणारे व अतिशय सोपे असे आनंदकंद वृत्त तपासू:

वर म्हंटलेच आहे की लघू अक्षरासाठी ल तर गुरू अक्षरासाठी गा हे अक्षर आपण गृहीत धरणार आहोत.

आनंदकंद मधे ल व गा या अक्षरांचा क्रम खालीलप्रमाणे येतो. (क्रमाखाली अनुक्रमे अक्षरांच्या मात्रा व एक उदाहरणादाखल ओळही लिहिलेली आहे.)

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २ २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा
का ही त री च तू ही हो ते स पा व सा ने =

(काहीतरीच तूही होतेस पावसाने)

या वृत्तामधे जेथे टिंबे दाखवली आहेत त्या टिंबाच्या आधीचा गा व नंतरचा गा हे एका शब्दातील दोन गुरू अक्षरे असू शकत नाहीत. याला यती असे म्हणतात. यती म्हणजे जेथे पॊज घ्यायचा ती जागा! म्हणजे, ही ओळ अशी रचता येणार नाही:

का ही त री च तू 'हो... 'णा' रे स पा व सा ने

कारण या ओळीत 'होणारेस' या शब्दातील 'हो' यतीच्या एकीकडे तर 'णा' दुसरीकडे आला.

(अर्थात, गज़लेत 'होणार आहेस' चे 'होणारेस' असे लिहिले जातच नाही. हे फ़क्त उदाहरण दिले आहे.)

आता मूळ ओळीकडे जर पाहिले तर 'काहीतरीच तूही होतेस पावसाने' या ओळीतील सर्व अक्षरे ही 'आनंदकंद' या वृत्तामधे जो लघू - गुरू अक्षरांचा क्रम असतो त्याच क्रमाने आली आहेत. ती अक्षरे 'आनंदकंद' क्रमानेच आल्यामुळे आपोआप अशा सर्व ओळींच्या मात्रांची संख्या चोवीसच होणार.

आपल्याला सुचलेली एखादी कवीकल्पना आपण जेव्हा तोंडातल्या तोंडात म्हणून पाहतो तेव्हाच आपल्याला थोडासा ठेक्याचा, लयीचा, अक्षरांच्या क्रमाचा मनातल्या मनात अभ्यास करायचा असतो. ( हे सुरुवातीच्या बाबतीतील मत आहे.)

आता आपल्यासमोर एक वृत्त उलगडले गेले आहे. त्याच वृत्तातील काही इतर उदाहरणे पाहू:

भलताच त्रास होतो.... या छान वागण्याचा
१ १ २ १ २ १ २ २.... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा!

आता असा प्रश्न आहे की 'भलताच' या शब्दात लघू गुरू अक्षरांचा क्रम कुठे पाळला गेला? भलताच मधील 'ता' ठिक आहे कारण त्याच्याजागी गुरूच अक्षर पाहिजे, पण 'भल' ही दोन लघू अक्षरे आहेत जी एका गुरू अक्षराच्या जागी येऊन बसली. याला 'सुट घेणे' असे म्हणतात. ही सुट वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे घेता येत नसून, फ़क्त 'एका गुरू अक्षराऐवजी एकाच शब्दात व सलग येणारी दोन लघू अक्षरे घेणे चालते' अशी आहे. म्हणजे, एका गुरू अक्षराऐवजी घेतलेली दोन्ही लघू अक्षरे ही एकाच शब्दात असायला हवीत. ती दोन वेगवेगळ्या शब्दात असता कामा नयेत. तसेच, ती 'सलगच' असायला हवीत. म्हणजे, 'भलताच' या शब्दाऐवजी 'प्रचंडच' असा शब्द घेता येणार नाही. कारण प्रचंड या शब्दात एका गुरूऐवजी घेतलेली दोन लघू अक्षरे (प्र व ड ) ही सलग आलेली नसून दुसया गुरू अक्षराच्या आजूबाजूला आलेली आहेत. 'चं' हे अक्षर मुळातच दोन मात्रांचे व गुरू अक्षर आहे.

आनंदकंदमधीलच आणखीन एक उदाहरण पाहू. जेवढे निकष या वृत्ताबाबत देत आहे तेच इतर सर्व वृत्तांनाही लागू होत असल्यामुळे इतर वृत्तांची फ़क्त अक्षरक्रमाबाबतची माहितीच देणार आहे.

आणखी एक आनंदकंदचे उदाहरण!

आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो

या द्विपदीमधे 'उ' हे अक्षर लघू असूनही 'गा' म्हणजे गुरू अक्षराच्या जागी आलेले आहे. याचे कारण आपण मात्रा मोजताना पाहिलेले होते. 'त्सा' या अक्षरातील 'अर्ध्या त' चा भार 'उ' वर पडल्यामुळे 'उ' च्या मात्रा दोन होतात. ते गुरू अक्षराइतकाच उच्चारायला घेते.

या प्राथमिक माहितीनंतर आपण इतर अनेक वृत्ते पाहणार आहोत.

वृत्त - मंजुघोषा

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
पा हि जे हो ते कु णी रा गा व णा रे
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २= २१ मात्रा

वृत्त - कालगंगा

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
व्य क्त व्हा वे वा ट ले की ले ख णी सर सा व ते
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = २६ मात्रा

वृत्त - व्योमगंगा

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
आ ठ वा वा का ळ ते व्हा पा सु नी मी मी च आ हे
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ = २८ मात्रा

वृत्त - वियदगंगा

ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा
कु णा ला हे ह वे आ हे कु णा ला ते ह वे आ हे
१ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ = २८ मात्रा

वृत्त - मंदाकिनी

गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
ते वा ग णे सा धे सु धे ते बो ल णे गो डा त ले
२ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = २८ मात्रा

वृत्त - मृगाक्षी

ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
म ला वा टा य चे ये शी ल सु द्धा
१ २ २ २ १ २ २ २ १ २ २ = १९ मात्रा

वृत्त - भुजंगप्रयात

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
कु णा चे भ ले व्हा य चे को ण जा णे
१ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ = २० मात्रा

वृत्त - सती जलौघवेगा

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
कु णी च के ले न से ल ते मी क रू न जा वे
१ २ १ २ २ १ २ १ २ २ १ २ १ २ २= २४ मात्रा

वृत्त - हिरण्यकेशी

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
ख रे च आ हे ति चे ति ने ही ब रे च के ले ति च्या प री ने
१ २ १ २ २ १ २ १ २ २ १ २ १ २ २ १ २ १ २ २ = ३२ मात्रा

वृत्त - राधा

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा
का य हो ते का य झा ले आ प ले ना ते
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ = २३ मात्रा

वृत्त - साशंक

गा गा ल ल गा गा गा .... गा गा ल ल गा गा गा
का ही द श के त्या चे....... पा ल्हा ळ क शा सा ठी
२ २ १ १ २ २ २ .... २ २ १ १ २ २ २ = २४ मात्रा

वृत्त - सुमंदारमाला

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
कु ठे ती कु ठे मी कु ठे तो ज मा ना कु णा ला अ ता हा क मा रा य ची
१ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २

वृत्त - स्त्रग्विणी

गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
का य हो ता स तू का य झा ला स तू
२ १ २ २ १ २ २ १ २ १ २ २ = २० मात्रा

वृत्त - लज्जिता

गा ल गा गा ल गा ल गा गा गा
अलि क डे ए व ढ्या त थक तो मी
२ १ २ २ १ २ १ २ २ २ = १७ मात्रा

वृत्त - विधाता

गा गा गा गा गा गा गा ... गा गा गा गा गा गा गा
अस णे ही न क्की ना ही ... नस णे ही न क्की ना ही
२ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ = २८ मात्रा

वृत्त - मालिबाला

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
मी म्ह णा लो ते च झा ले शे व टी
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = १९ मात्रा

वृत्त - पादाकुलक

गा गा गा गा .... गा गा गा गा
आ ले जी वन... गे ले जी वन
२ २ २ २ २ २ २ २ = १६ मात्रा

वृत्त - कलिंदनंदिनी

ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा
ब रा च वे ळ ला ग ला श हा ण पण ज मा य ला
१ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ = २४ मात्रा

वृत्त - चामर

गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा
व्हा य चे अ से ल ते च हो त रा ह ते म्ह णा
२ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ = २३ मात्रा

वृत्त - भामिनी

गा ल गा गा ल गा गा ल गा गा
चं द्र मा आ ज मा झा च आ हे
२ १ २ २ १ २ २ १ २ २ = १७ मात्रा

वृत्ते म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून लघू व गुरू अक्षरांचा ठराविक क्रम आहे. वृत्ते आपली आपणही बनवता येतात. मात्र, शक्यतो शेवटी गुरू अक्षर असलेली वृत्ते व अर्थातच लयीत / ठेक्यात उच्चारता येणारी वृत्ते चांगली वाटतात. हजारो वृत्तांची माहिती माधवराव पटवर्धनांनी त्यांच्या छंदोरचना या जाडजुड पुस्तकात दिलेली आहे. त्यात आठ वेळा 'लघू' व नंतर दोन गुरू वगैरे अशा स्वरुपाची वृत्ते व त्यांतील कवितांची उदाहरणेही आहेत. मात्र, अशी व्रुत्ते गज़लेत वापरायला अवघड पडतात. याचे कारण आठ वेळा लघू अक्षरे एकामागोमाग घेणे हे गज़लेसारख्या काव्यप्रकारासाठी दुष्कर आहे. वापरायला कोणीच काही म्हणू शकत नाही. पण 'गडद गडद नभ होते' सारख्या ओळी बर्‍याचदा निसर्ग किंवा इतर काही वर्णनांसाठी चांगल्या वाटतात.

वर दिलेल्या वृत्तांव्यतिरिक्तही अनेक वृत्ते गज़लकार सातत्याने वापरताना दिसतात.

वृत्तांना वृत्तीही असते असे वाटते. काही काही वृत्ते फ़ारच बोलकी, काही फ़ारच आक्रमक, काही प्रेमालापासाठी योग्य अशी जाणवू शकतात. मात्र, हे विधान मी 'गज़लेचा कायदा' म्हणून लिहीत नसून फ़क्त मनातील विचार म्हणून लिहीत आहे. उदाहरणार्थ, कलिंदनंदिनी हे वृत्त फ़ारच लाघवी आहे व प्रेमालापाच्या अभिव्यक्तीसाठी उत्तम भासते. आनंदकंद बयापैकी स्पष्ट विचार मांडणारे, थोडे आक्रमक वाटावे असे आहे. भुजंगप्रयात खूपच बोलके वाटते. भुजंगप्रयातमधे आपण नेहमी बोलतो तसे बोलल्यासारखे वाटते. मात्र, ही सर्व मते म्हणजे 'नियम' नाहीत. कुठल्याही वृत्तात परिणामकारकपणे विचार मांडणे जमणे आवश्यक आहेच.
===============================================

गज़लतंत्र

गज़ल ही अनेक स्वतंत्र, मात्र किमान पाच, दोन दोन ओळींच्या कवितांची एक गज़लतंत्रातील मालिका असते, ज्यात आशय हा जीवनानुभुतींवर अवलंबून असतो.

द्विपदी किंवा शेर - शेर म्हणजे दोन ओळी! गज़लेतील कुठल्याही (एकाच शेराच्या )दोन ओळी गज़लेतून बाहेर काढून लिहिल्या व एखाद्याला वाचायला सांगीतल्या तर त्याला त्यातून पूर्ण अर्थ उमगायलाच हवा. या दोन ओळींचा अर्थ अजिबात इतर दोन ओळींवर अवलंबून असलेला नसावा. माझे तिच्यावर प्रेम बसले हे एका शेरात, ती नाही म्हणाली हे दुसर्‍या शेरात, नंतर बरेच दिवसांनी लाजून हो म्हणाली हे तिसर्‍या शेरात, लग्न मात्र चवथ्याशीच झाले हे चवथ्या शेरात व मला आजही तिची आठवण येते हे पाचव्या शेरात येऊ शकते. यात काहीही तांत्रिक अडचण नाही. मात्र, पहिल्या ओळीतील बसलेले प्रेम मी दुसयर्‍या ओळीत व्यक्त केले व दुसर्‍या ओळीत व्यक्त केलेल्या प्रेमावर ती तिसर्‍या ओळीत बरेच दिवसांनी लाजून हो म्हणाली असे असता कामा नये. प्रत्येक गज़लेतील प्रत्येक शेर हा आशयाबाबत पूर्ण स्वतंत्रच असला पाहिजे. पहिल्या शेरात जर 'मला जो माणूस भेटला तो वाईट होता' अश्या अर्थाचे काही असले तर दुसर्‍या शेरात, समजा त्याच माणसाबद्दल काही लिहायचे असल्यास 'आणि तो' किंवा 'अन तो' असे येऊ शकत नाही. म्हणजे, आधीच्या शेराचा काहीही संदर्भ असू नये. गज़लेतील प्रत्येक द्विपदी ही एक संपूर्ण व स्वतंत्र कविता असते. शेरातील पहिल्या ओळीला उर्दूमधे उला मिसरा तर दुसर्‍या ओळीला सानी मिसरा म्हणतात. मिसरा म्हणजे ओळीसाठी असलेला उर्दू शब्द! मराठीत 'ओळ' म्हणता येतेच.

मतला - गज़लेच्या पहिल्या द्विपदीस उर्दूमधे मतला असे म्हणतात. मराठीतही तसेच म्हणायला काही हरकत नसावी. मतला हा शेर गज़लेतील इतर सर्व शेरांहून एकाच बाबतीत वेगळा असतो. मतल्याच्या दोन्ही ओळींमधे काफ़िया व रदीफ़ येतात. पुढच्या प्रत्येक शेराच्या फ़क्त दुसयाच ओळीमधे ते आले तरी चालतात. पुढच्या प्रत्येक शेराच्या प्रत्येक ओळीमधे आले तरीही चालू शकतात, मात्र मतल्यात दोन्ही ओळीत यावेच लागतात तसे इतर शेरांमधे प्रत्येक ओळीत यावेच लागतात असे नाही. (काफ़िया व रदीफ़ म्हणजे काय ते पुढे आलेच आहे.)

उदाहरण!

आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा - हा मतला आहे.

कारण यात जमेल, सुचेल असे काफ़िया दोन्ही ओळीत आले आहेत. तसेच रदीफ़ म्हणजे 'तेव्हा' दोन्ही ओळीत आली आहे.

याच गज़लेतील पुढचा एक शेर!

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

यात 'रुचेल' हा काफ़िया व 'तेव्हा' ही रदीफ़ फ़क्त दुसर्‍याच ओळीत आले, पहिल्या ओळीत आले नाहीत. अशाच पद्धतीने, पुढचे आणखीन तीन शेर, हा विशिष्ट शेर व वर लिहिलेला मतला (मतला सर्वात पहिल्यांदा लिहिणे ) लिहिले की एक गज़ल पुर्ण होऊ शकते.

मतल्याप्रमाणेच दोन्ही ओळीत काफ़िया व रदीफ़ असलेला शेरही तांत्रिकदृष्ट्या योग्यच आहे. मात्र, मतल्यात व शेरात फ़रक इतकाच, की मतल्यात दोन्ही ओळीत ते येणे अत्यावश्यक आहे व इतर शेरामधे 'फ़क्त दुसयाच ओळीत' ते यावे लागते. मतल्यापुढील शेरांमधे कधीही काफ़िया व रदीफ़ शेराच्या 'फ़क्त पहिल्याच' ओळीत असू शकत नाहीत. ते दुसर्‍या ओळीत असलेच पाहिजेत.

एक उदाहरण!

आणू नको कधीही तसले मनात काही
आहे तुझाच आहे सध्या जगात नाही - मतला (गज़लेचा पहिला शेर!)

ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
संपायची कधी ही एकाधिकारशाही? - दुसरा शेर!

प्रत्येक दु:ख माझे शाई बनेल जेव्हा
होतील शब्द सारे साधेसुधे प्रवाही - तिसरा शेर

यात, मतल्यातील काफ़िये आहेत 'काही' व 'नाही'! (लक्षात घ्या, मनात व जगात हे काफ़िये नाहीत कारण त्यापुढे समान शब्द आलेले नाहीत. मनात च्या पुढे 'काही' हा शब्द असून जगात च्या पुढे 'नाही' हा शब्द आहे. या रचनेला रदीफ़ नाही.)

तेव्हा, मतल्यात दोन्ही ओळीत काफ़िये आले, 'नाही' व 'काही' हे!

आता, दुसर्‍या शेरात पुन्हा 'नाही' व 'एकाधिकारशाही' असे शब्द दोन्ही ओळींच्या शेवटीच आले आहेत. यातील, नाही व एकाधिकारशाही हे पुन्हा काफ़ियेच होऊ शकतात. त्यामुळे दुसरा शेरही मतल्यासारखाच झाला आहे. मात्र तसे जरूरीचे नाही. हे तिसया शेरावरून सिद्ध होते.

तिसया शेरात फ़क्त दुसयाच ओळीच्या शेवटी प्रवाही हा काफ़िया आला आहे.

तेव्हा:

१. मतला हा शेर गज़लेचा पहिला शेर असून त्यात दोन्ही ओळीत काफ़िया व रदीफ़ (त्या विशिष्ट गजलेला रदीफ़ असल्यास ) यावेच लागतात.
२. मतल्याचेच नियम पाळणारे गज़लेतील सर्व शेर असू शकतात, पण असलेच पाहिजेत असे नाही. त्यांच्यात फ़क्त दुसयाच ओळीत काफ़िया व रदीफ़ (त्या विशिष्ट गजलेला रदीफ़ असल्यास ) यावेच लागतात.

काफ़िया नसलेली गज़ल असू शकत नाही. रदीफ़ नसलेली गज़ल असू शकते.

मतला व शेराचे आणखी एक उदाहरण:

कळेना कुठे सर्व 'लंपास झाले'
किती राहिले नी किती 'श्वास झाले'

तुझी पावलापावलाला प्रचीती
मला वाटले फ़क्त 'आभास झाले'

(काफ़िये लंपास, श्वास, आभास व रदीफ़ 'झाले'!)

रदीफ़ - रदीफ़ या शब्दाला मराठीत अंत्ययमक असे म्हणतात. गज़लेत काफ़िया व रदीफ़ अशी दोन यमके असू शकतात. त्यातील काफ़िया अपरिहार्य असून त्याला 'यमक' असे म्हणतात तर रदीफ़ ला 'अंत्ययमक' असे म्हणतात. रदीफ़ या शब्दाचा अर्थ आहे उंटावरील स्वाराच्या मागे बसलेली स्त्री! एखादा स्वार अविवाहीत असला तरी उंटावर एकटा बसू शकतो. पण स्वाराशिवाय स्त्री एकटीच उंटावर बसत नाही. रदीफ़ म्हणजे गज़लेतील मतल्याच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी व त्यानंतरच्या प्रत्येक शेराच्या दुसया ओळीच्या शेवटी येणारे अक्षर / शब्द / शब्दसमूह!

उदाहरण १

हा जन्म कशासाठी हा काळ कशासाठी?
अप्राप्य क्षितीजांचे आभाळ कशासाठी?

डरपोक मला वाटे अवतार तुझा आता
खांबातच लपण्याला आयाळ कशासाठी?

यात 'कशासाठी' हा शब्द रदीफ़ आहे.

आज आनंदात राहू पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजूस सारू पाहुया पुढचे पुढे

मी नको आहे तुला हे माहिती आहे मला
एक छोटा जन्म काढू पाहुया पुढचे पुढे

यात 'पाहुया पुढचे पुढे' हा 'शब्दसमूह'च रदीफ़ आहे. कारण तो मतल्याच्या प्रत्येक ओळीच्या व पुढच्या शेराच्या दुसया ओळीच्या शेवटी समान आलेला आहे.

सोसेन का तुला मी?
भंडावतो मला मी

तुमच्यात राहण्याची
शिकलो कुठे कला मी?

यात 'मी' हा शब्द / अक्षर रदीफ़ आहे.

रदीफ़ नसलेली गज़ल असू शकते. उदाहरण!

जाहले आहे गज़ल मी भेटणे म्हणजे तुला
भंगणे सानी मनाचे, भाळणे मिसरा उला

शेत हे आयुष्य आहे, माणसे बुजगावणी
प्राण आहे मुक्त वारा, वाहतो तोवर डुला

यात उला, तुला, डुला हे काफ़िये आहेत. यात रदीफ़ नाही.

आता प्रश्न असा येईल की उला, डुला, तुला यालाच रदीफ़ का नाही म्हणायचे? तर रदीफ़ म्हणजे न बदलणारी अक्षरे / शब्द/ शब्दसमूह! उला, डुला व तुला मधे उ, डु व तु हे असमान आहेत. ते एकसारखे नाहीत. नुसतेच 'ला' हे अक्षर समान आहे. पण 'ला' लाही रदीफ़ म्हणता येणार नाही कारण ते अक्षर 'काफ़िया'चा भाग आहे, स्वतंत्र, सुट्टे अक्षर नाही.

रदीफ़ नसलेल्या गज़लेला 'गैरमुर्रद्दफ़' गज़ल असे म्हणतात. रदीफ़ असलेल्या व रदीफ़ नसलेल्या दोन्ही गज़ला तितक्याच महत्वाच्या असतात. रदीफ़वर दर्जा अवलंबत नाही.

काफ़िया - रदीफ़ असलेल्या गज़लेच्या मतल्यात दोन्ही ओळीत रदीफ़च्या आधी येणारा व पुढील शेरांमधे दुसया ओळीत रदीफ़च्या आधी येणारा सुट्टा शब्द , ज्यातील शेवटचे किमान एक अक्षर समान असून त्या आधीची अक्षरे भिन्न असतात, म्हणजे काफ़िया! ज्या गज़लेला रदीफ़ नाही त्या गज़लेतील मतल्याच्या दोन्ही ओळींच्या शेवटी येणारा सुट्टा शब्द , ज्यातील शेवटचे किमान एक अक्षर समान असून त्या आधीची अक्षरे भिन्न असतात, जो पुढील प्रत्येक शेरातील दुसया ओळीत येतोच तो काफ़िया!

काफ़िया हा गज़लेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. काफ़िया नसेल तर गज़ल ही रचना गज़लच ठरू शकत नाही.

काफ़ियामधील जो शेवटचा भाग असतो तो समान असतो.

जसे:

आधार
बाजार
ठार
वार
बेजार
धार

यात 'आर' हा उच्चार समान आहे.

तसेच:

वादळ
जळ
काजळ
मळ
हळहळ

यातील 'अळ' हा उच्चार समान आहे.

काफ़ियाची उदाहरणे!

घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी - मतला!

आज ती आली समोरी, चौकशी झाली जरा
वेळही गेलीच होती, ताणले नाही कुणी - दुसरा शेर!

यात, वर पाहिल्याप्रमाणे 'नाही कुणी' ही रदीफ़ झाली. थांबले, आपले, ताणले यातील समान भाग आहे 'अले'! म्हणजेच, थांबले, आपले, ताणले हे काफ़िये झाले. (नुसत्या समान भागाला, जसे 'अले' ला काफ़िया म्हणत नाहीत. संपूर्ण शब्दालाच काफ़िया म्हणतात. जसे थांबले, आपले, ताणले!) आता या गज़लेत पुढे, मावले, कापले, सोकावले, भांबावले असेच काफ़िया येऊ शकतील.

आणखी एक उदाहरण!

जरा कुठे सरावलो स्वत:त मी रमायला
लगेच पोचला तुझा सुगंध घमघमायला

दिमाख दाखवून फ़क्त विरघळून संपलो
जसा विड्यास लावतात वर्ख चमचमायला

यात रदीफ़ नाही. तसेच, समान भाग आधीच्या गज़लेप्रमाणे 'अले' सारखा 'अला' असा नसून 'अमायला' असा आहे. त्यामुळे काफ़िये झाले रमायला, घमघमायला, चमचमायला!

आणखी एक उदाहरण घेऊ!

अभ्यास अन तयारी सारे उगीच आहे
जी जी निघेल इच्छा ती वेगळीच आहे

चोरून पाहताना, चोरून पाहतो मी
मीही तसाच आहे, तीही तशीच आहे

यात 'आहे' ही रदीफ़ झाली. काफ़िये झाले उगीच, वेगळीच, तशीच! कारण त्यात 'ईच' हा भाग समान आहे.

या गज़लेत 'प्रतीत' असा काफ़िया घेता येणार नाही, कारण त्यात 'ईच' च्या ऐवजी 'ईत' असे आले.

स्वरकाफ़िया हा एक महत्वाचा प्रकार आहे. स्वरकाफ़ियामधे रदीफ़च्या आधी येणाया शब्दातील शेवटच्या अक्षराचा फ़क्त स्वर समान असावा लागतो. उदाहरण!

आज आनंदात राहू, पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजुस सारू, पाहुया पुढचे पुढे

मी नको आहे तुला हे माहिती आहे मला
एक छोटा जन्म काढू, पाहुया पुढचे पुढे

यात 'पाहुया पुढचे पुढे' ही रदीफ़ झाली! आता त्या आधी आलेले शब्द कोणते? तर राहू, सारू, काढू! यात समान फ़क्त 'ऊ' हा उच्चारच आहे. याला स्वरकाफ़िया असे म्हणतात.

आणखी एक उदाहरण!

किती गोजिरे व्हायचे, कोण जाणे
कशाला तुझे व्हायचे, कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

यात 'व्हायचे कोण जाणे' ही रदीफ़ झाली. त्या आधीचे शब्द आहेत गोजिरे, तुझे, आमचे! यातील समान भाग आहे फ़क्त प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा स्वर! त्यामुळे 'ए' हा स्वर या गज़लेचा काफ़िया झाला.

स्वरकाफ़ियाच्या वापरामुळे विचार जरा जास्त मुक्तपणे व्यक्त व्हायला मदत होऊ शकते.

रदीफ़ व काफ़िया -

१. रदीफ़ म्हणजे मतल्याच्या दोन्ही ओळींच्या शेवटी व पुढील प्रत्येक शेराच्या दुसया ओळीच्या शेवटी येतोच असा समान शब्दसमूह / शब्द / अक्षर! एकाच गज़लेत रदीफ़ कधीही बदलत नाही. ती मतल्यात दोन्ही ओळीत व इतर शेरांच्या दुसया ओळीत आलीच पाहिजे. रदीफ़च नसलेली गज़ल असू शकते. त्याला गैरमुरद्दफ़ गज़ल असे म्हणतात. रदीफ़ कधीही नुसता स्वर असू शकत नाही. ते किमान एक 'सुट्टे' अक्षर तरी असतेच.

२. काफ़िया म्हणजे मतल्यातील दोन्ही ओळीत व पुढील प्रत्येक शेराच्या दुसया ओळीत रदीफ़च्या आधी येणारा एक शब्द , ज्यातील शेवटचे किमान एक अक्षर समान असून त्या आधीची अक्षरे भिन्न असतात किंवा एक स्वर! काफ़ियातील 'समान' अक्षरांच्या आधीची अक्षरे बदलू शकतात. जसे उधार, करार, सुमार यात 'आर' समान आहे व उधा, करा, सुमा अशी भिन्न अक्षरे आहेत. मात्र स्वरकाफ़िया असेल तर फ़क्त काफ़ियाच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा फ़क्त स्वरच समान असावा लागतो. मतल्यात दोन्ही ओळीत एकच काफ़िया घेता येत नाही. तसा तो घेतल्यास तो रदीफ़चाच भाग धरला जाईल. मतल्यात दोन्ही ओळींमधे दोन भिन्न काफ़िये घेणे आवश्यक आहे. पुढील शेरांमधे मतल्यातील एखादा काफ़िया पुन्हा आला तरी चालतो. मतल्यातील दोनपैकी एक काफ़िया पुढील सर्व शेरांमधे वापरला तरी तांत्रिकदृष्ट्या योग्यच आहे. मात्र, त्यात रंगत नाही. काफ़िया हा गज़लेचा आत्मा असून काफ़ियावर गज़लेचे बरेचसे सौंदर्य अवलंबून असते. काफ़ियाचा शब्द / स्वर हा गज़ल समेवर आल्याची भावना निर्माण करतो.

अलामत - गज़लेला तांत्रिकदृष्ट्या सुंदर बनवण्याचे काम काफ़ियामधील एक विशिष्ट स्वर करतो, त्याचे नाव अलामत! भटसाहेबांनी याला स्वरचिन्ह असे नाव दिलेले आहे.

अलामत म्हणजे 'उच्चार निदर्शक अक्षराचे अचूक ठिकाणी अस्तित्व असणे'!

उदाहरणे!

आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा

यात 'तेव्हा' ही रदीफ़, तर सुचेल, जमेल हे काफ़िये झाले. अलामत काफ़ियामधेच असते. सुचेल व जमेल या दोन्ही शब्दातील 'चे' व 'मे' या अक्षरांमधील 'ए' हा उच्चार या गज़लेत अलामत आहे. म्हणजे, 'पुढील', 'असाल', 'बिगूल' असे शब्द काफ़िये म्हणून या गज़लेत येऊ शकणार नाहीत. कारण या शब्दांमधे 'ए' हा स्वर पाळला जात नसून 'ई", 'आ' व 'ऊ' हे स्वर येत आहेत.

आणखी एक उदाहरण!

वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो

यात रदीफ़ नाही. काफ़िये आहेत नसानसांनो व रसांनो! यात अलामत आहे 'आं'! येथे 'परींनो', गुरूंनो' असे काफ़िये येऊ शकत नाहीत. ( असांनो मधील सा महत्वाचा आहेच, परी व गुरू हे शब्द फ़क्त उदाहरणासाठी दिले आहेत. )

आलेच आहे होत, हो खंबीर माझ्यासारखा
संपेन मी नावानिशी, धर धीर माझ्यासारखा

यात 'माझ्यासारखा' ही रदीफ़ तर खंबीर, धीर हे काफ़िये आहेत. यात अलामत आहे 'ई"! यात आधार, माहेर, शंकासूर असे काफ़िये येऊ शकनार नाहीत. कारण त्यात अनुक्रमे 'आ', 'ए' व 'ऊ' या अलामती आहेत. या गज़लेत त्यामुळे फ़क्त 'ई' हीच अलामत असलेले काफ़िये चालतील.

अलामत गज़लेत अत्यंत महत्वाची आहे. अलामत हा काफ़ियाचाच भाग आहे. मात्र त्याचा अभ्यास वेगळा करण्याचे कारण अलामत चुकणे म्हणजे गज़लच चुकणे असे आहे म्हणून!

एकंदर -

गज़ल - किमान पाच 'दोन दोन' ओळींच्या स्वतंत्र कवितांची मालिका, ज्यात गज़लतंत्र पाळले गेलेले असून आशय हा स्वानुभुती, प्रेम, व्यथा, तत्त्वज्ञान यावर भाष्य करणारा आहे.

शेर / द्विपदी - गज़लेतील कोणत्याही संलग्न दोन ओळी ज्यामधे पहिल्या ओळी्तील आशयाचा प्रभावी समारोप दुसया ओळीत केलेला असतो.

मतला - गज़लेचा पहिला शेर, ज्यात दोन्ही ओळींमधे काफ़िया व रदिफ़ येतात.

रदीफ़ - मतल्याच्या दोन्ही ओळींच्या शेवटी व त्यापुढील प्रत्येक शेराच्या दुसया ओळीच्या शेवटी येणारे समान सुट्टे अक्षर / शब्द / शब्दसमूह! पुढील शेरांच्या पहिल्याही ओळीत रदीफ़ आली तरी चालते, पण दुसया ओळीत यावीच लागते. एका गज़लेत एकच रदीफ़ सर्वत्र येते. रदीफ़ बदलू शकत नाही. रदीफ़ हा काफ़ियाचा भाग नाही. ते समान सुट्टे अक्षर, सुट्टा शब्द किंवा सुट्टा शब्दसमूह असतो. रदीफ़ नसलेल्या गज़ला असू शकतात.

काफ़िया - मतल्याच्या दोन्ही ओळींमधे रदीफ़च्या अलीकडे व त्यापुढील प्रत्येक शेरातील दुसया ओळीत रदीफ़च्या अलिकडे येणारा 'एक शब्द / एक स्वर' म्हणजे काफ़िया! काफ़िया जर शब्द-काफ़िया असला तर प्रत्येक काफ़ियातील एकंदर अक्षरांपैकी किमान शेवटून एक अक्षर तरी समान राहतेच. त्या आधीची अक्षरे वेगवेगळी असू शकतात. कफ़ियाच्या 'शेवटून' एकाहून अधिक अक्षरे समान असणे शक्य असते. पण एक तरी अक्षर समान असलेच पाहिजे. स्वरकाफ़ियामधे रदीफ़च्या आधी येणाया शब्दातील फ़क्त शेवटच्या अक्षराचा स्वरच समान राहतो. मतल्यात दोन्ही ओळीत एकच काफ़िया घेता येत नाही. अन्यथा ती रदीफ़च समजली जाईल. मतल्यातील एखादा काफ़िया पुढील शेरांमधे वापरणे तांत्रिकद्रुष्ट्या चालते. तोच काफ़िया एकाहून अधिकवेळा किंवा सर्व शेरांमधे आला तरी चालू शकते. मात्र, मतल्यामधे तोच काफ़िया दोनदा येऊ शकत नाही. काफ़ियाशिवाय गज़ल असू शकत नाही.

अलामत - काफ़ियातील शेवटून समान असलेल्या अक्षरांआधी जे अक्षर येते त्याचा स्वर म्हणजे अलामत!

========================================

गजलेचा फायदा -

गजल रचणे किंवा दुसऱ्याच्या गजलेचा आस्वाद घेण्याचा छंद निर्माण होणे हे माणसाला खूप फायदेशीर ठरते. माणूस आपली परिस्थिती फारशी बदलू शकत नाही. गजल वाचून तर नाहीच नाही. मात्र, गजल वाचून एक मनस्थिती मात्र मिळते ज्यायोगे परिस्थितीकडे पाहायचा दृष्टीकोन बदलू शकतो. याचे कारण पुन्हा हेच आहे की गजल ही एका साध्या माणसाने स्वतःच्या आयुष्यातून निर्माण केलेले काव्य असते. त्यामुळे त्याचे संदर्भ, त्यातील व्यथा, भावना, संवेदना या बऱ्याच प्रमाणात आपल्याशीही आयडेंटिफाय होऊ शकतात किंवा होतात. काही लोक देवळात बसतात, काही मद्यालयात, काही लोकांमध्ये मिसळतात तर काही कायम व्यग्र राहायचा प्रयत्न करतात. या सर्वाच्या मागे 'आपल्याला हव्या तशा परिस्थितीत राहण्याची व मनः शांती मिळवण्याची' इच्छा असते. कारण माणूस जीवनातील अनेक कटकटींनी त्रासलेला असतो. अशा वेळेस आपापले मार्ग सुचतात. यातील एक मार्ग आहे गजलेचा आस्वाद घेणे! कारण गजल या काव्याची धुंदी चढू शकते. त्यात माणूस हरवू शकतो. काही काळ नित्य रहाटगाडग्यापासून दूर जाऊ शकतो. गजल हे काव्य ती रचणाऱ्याला तसेच आस्वादकालाही एक वेगळा आनंद देते. हा आनंद फक्त जाणवता येतो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा शेर आपल्याला आठवतो व आपल्या मनाच्या मदतीला धावतो. गजल रचणे यात खूप वेळही चांगला जातो. आस्वादामुळेही एक हक्काचा मार्ग उपलब्ध होतो.

मात्र, हे सगळे होण्यासाठी 'गजलच' का, 'एकंदरच कविता' का याबाबत मते पुढे दिली आहेत.

=========================================

गजल व इतर कविता यातील फरकः

१. तांत्रिक फरक - गजल ही किमान पाच, स्वतंत्र अर्थाच्या व एकमेकांवर विसंबून नसलेल्या गजलतंत्रातील द्विपदींची मालिका असते. कवितेला किती ओळी असाव्यात, किती कडवी असावीत, वृत्त / छंद असावा की नसावा, ओळींची रचना कशी असावी, प्रत्येक ओळ वेमात्रांमध्ये गळी असावी किंवा नसावी याबाबत काहीही नियम नाहीत.

२. आशयासंबंधातील फरक - गजलेत गजलकाराच्या अनुभुतींवर त्याने केलेले असे भाष्य असते ज्यातून एक विचार, एक भावना, एक संवेदना भिडते. कवितेत वाट्टेल तो विषय असू शकतो.

या फरकांमधून असे कुठेही म्हणायचे नाही की कविता गजलेइतकी श्रेष्ठ नाही. कुठलीही गजल मुळात कविताच असते. फक्त ती गजल तंत्र पाळते. श्रेष्ठत्व हे तंत्रावर अवलंबून नाही की आशयावर! श्रेष्ठत्व अवलंबून आहे काव्यातील विचारांवर! फक्त, गजल व कविता यांचा आस्वाद घेताना आस्वादकाची भूमिका वेगवेगळी असणार हे सांगण्यासाठी हे फरक नोंदवले आहेत.

लावणीत शृंगाररस, पोवाड्यात वीररस, अभंग / ओवीमध्ये भक्तीरस मिळतो. तसा गजलेत 'जीवन-रस' मिळतो.

गजल हे मनातून आलेले व मनोव्यापारांशी निगडीत असणारेच काव्य असते. कविता कशावरही असू शकते.

==========================================

गजलियत

गजलियत हा शब्द जरी गजल या शब्दावरून आल्यासारखा वाटला तरी तो फक्त गजलपुरता मर्यादीत नाही. गजलियत कशातही असते. प्रेयसीच्या नखऱ्यांमधे, अदांमधे, दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमधे, कवीच्या आयुष्यामधे, गद्य लिखाणामधे, कुठल्याही कवितेमधे, कोणत्याही संवादात किंवा कृत्यात गजलियत असू शकते. गजलियत ही एक वृत्ती आहे. वृत्तीतून निर्माण होणारी 'काव्यात्मक पातळी' आहे जिच्यावर कवी किंवा आस्वादक रेंगाळून धुंद होऊ शकतो.

गजलियत म्हणजे 'काव्य' मात्र नाही.

काव्य व गजलियत यातील रेषा लक्षात यावी यासाठी उदाहरण!

काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात... क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत

या कुसुमाग्रजांच्या ओळींमध्ये काव्य आहे. प्रेयसी आज स्वतःच धुंद होऊन प्रियकराच्या गळ्यात हात टाकून बसली आहे. पहाट होत आहे याचे तिला भानच नाही. समाजाला आपले प्रेम समजू नये यासाठी कवी तिला सरळ 'आता जा' असे म्हणत नसून 'तुझे चांदण्याचे हात माझ्या गळ्यातून काढ' असे सांगत आहे. म्हणजे, हे हात माझ्या गळ्यात असण्याची योग्य वेळ 'चांदणे' असतानाची आहे हेही सुचवले जात आहे व ते सुंदर पद्धतीनेही सुचवले जात आहे. हळूहळू जवळ येणारी किरणे आता दिसायची वेळ झाली आहे. ते आपले प्रेम समाजासमोर उघड करण्याची शक्यता आहे. यासाठी 'दिवसाचे दूत' हा शब्दप्रयोग केलेला आहे. यातच, कवीला तिच्या सहवासाची तितकीच ओढ आ,हे मात्र आता भान ठेवायची वेळ आली आहे हे सुचवले जात आहे. सरळ आशयाला सुंदर पद्धतीने मांडणे म्हणजे काव्य! यात आशय फार खोल असेलच असे नाही.

बैठने कौन दे है फिर उसको
जो तेरे आस्ताँसे उठता है

मीर तकी मीर! या शेराचा अर्थ - तुझ्या उंबऱ्यावरून एकदा जो उठतो त्याला पुन्हा तेथे कोण जागा घेऊ देईल? वास्तविक हा शेर प्रेयसीला उद्देशून आहे. सगळी दुनियाच तुझ्यावर फिदा आहे. तू मात्र सगळ्यांनाच अप्राप्य आहेस. तुझे एक दर्शन व्हावे म्हणून सगळे आशिक तुझ्या घरासमोर गर्दी करतात. त्यांच्यात चढाओढ चालते. 'आपलेच प्रेम कसे खरे व महान आहे' हे दाखवण्याची स्पर्धा चालते. त्यात एखाद्याला काही कारणाने मागे फिरावे लागले की स्पर्धकांच्या यादीतून तो कायमचाच गेला. पुन्हा त्याला ती जागा कोण घेऊन देणार? यात आशयाला सुंदर करण्याची कुठलीही अनावश्यक उर्मी आढळत नाही. अत्यंत साधे शब्द योजलेले आहेत. पण हा शेर फक्त प्रेयसीलाच लागू होईल? मशिदीच्या उंबऱ्याला लागू नाही होणार? आपलीच भक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवून खुदाकडून जास्तीतजास्त वरदान मिळावे याची ही स्पर्धा नसेल? हा शेर जीवनालाही उद्देशून आहे. एकदा माणूस मेला की पुन्हा कोण त्याची आठवण काढत बसणार आहे? हाच शेर तारुण्यालाही उद्देशून लागू होतो. एकदा तारुण्य गेले की तुम्हाला कोण महत्त्व देणार आहे? हाच शेर प्रेयसीच्या हृदयालाही उद्देशून आहे. एकदा तिच्या मनातून प्रियकराची 'ती' जागा गेल्यावर परत मिळवणे महाकर्मकठीण आहे. अत्यंत साध्या शब्दांमधून अंतर्मुख करण्याची कुवत शेरात असणे, तो शेर व्यथेतून निर्माण होऊनही सर्वसमावेशक होणे, दीर्घकाळ स्मरणात राहील असा असणे व तरीही उत्स्फुर्तच भासणे (म्हणजे कारागीरीतून आलेला आहे असे अजिबात न वाटणे ) ही गजलियतची वैशिष्ट्ये आहेत. पण गजलियतचा खरा अर्थ आहे शेरामधील जादू! ही जादू नेमकेपणाने सांगता येणार नाही. तो एक फील असतो व तो ज्याचा त्याला येतो. युवराजने मारलेल्या सलग सहा षटकारांमध्ये काव्य आहे. मात्र द्रविडने दीर्घकाळ टिच्चून खेळून सामना जिंकून देण्यात गजलियत आहे. याचे कारण त्यात सामना हारण्याची पूर्ण शक्यता असताना एक अनपेक्षित वळण लागून सामन्याचा निकाल वेगळाच लागला. तसेच, फलंदाज पडला होता म्हणून क्षेत्ररक्षकाने खिलाडूपणे त्याला धावचीत केले नाही व त्याच फलंदाजामुळे सामना गमावावा लागला यात गजलियत आहे. 'पर्दा है पर्दा है' या महंमद रफींच्या स्वरांमध्ये काव्य आहे. 'इक दिन बिकजायेगा माटी के मोल' या मुकेशच्या स्वरांमध्ये गजलियत आहे. सर्कशीत तोफेच्या तोंडातून बाहेर पडून बरोबर झोपाळ्यांखालील जाळ्यामध्ये पडणाऱ्या कलाकाराकडे काव्य आहे. पण तसे न पडू शकता मधेच पडून कंबरडे मोडल्याचा अभिनय करून, रडून, प्रेक्षकांना हासवणाऱ्या विदुषकाकदे गजलियत आहे. 'त्याला खरच किती लागले असेल' हा विचार सर्कस पाहून बाहेर पडल्यावर मनात येऊ शकतो. कवितेतून रोमांच उभे करण्यात काव्य आहे, शहारा आणण्यात अन तोही शेर संपून गेल्यावर बऱ्याच क्षणांनी, यात गजलियत आहे. वीस वर्षाच्या तरुणीने आपल्या स्वप्नातील राजकुमाराची आठवण आल्यावर मनाशीच लाजणे यात काव्य आहे. सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ स्त्रीने आजही तितक्याच प्रेमाने आपल्या पतीला चहा करून देणे यात गजलियत आहे. वेश्येची तारीफ करणे यात काव्य आहे. वेश्येशी लग्न करणे यात गजलियत आहे. भरपूर पैसे असलेल्या माणसाने आपल्या पिढ्यांसाठी बंगले बांधून ठेवणे यात काव्य आहे. गरीब माणसाने आपल्या मुलाला आपला व्यवसाय शिकवणे व स्वतःच्या पायावर उभा करणे यात गजलियत आहे. आईने आई होणे हे काव्य आहे, बापाने आई होणे ही गजलियत आहे.

काव्य - जे ऐकल्यावर घशातून दाद दिली जाते.
गजलियत - जे ऐकल्यावर पोटातून दाद येते.

मीर व कुसुमाग्रज दोघेही तितकेच श्रेष्ठ! त्यांच्या विशिष्ट ओळी फक्त तुलनेसाठी म्हणून घेतल्या.
============================================

मुसलसल व गैरमुसलसल

सर्व शेर एकाच विषयावर असणे यास मुसलसल गजल म्हणतात. सर्व / एकाच गजलेतील काही शेर विविध विषयांवर असणे यास गैरमुसलसल गजल म्हणतात.

गजलकार कोणत्याही प्रकारात गजल करू शकतो. खरे तर, असे काही ठरवून केले जात नसते. आपल्या विविध अनुभुती गजलेत गुंफण्याची उर्मी नैसर्गीक असते. उर्दूमध्ये बहुतांशी काव्य प्रेम या विषयावर झालेले असल्याने बहुतांशी उर्दू गजला मुसलसल असतात. काही शेर धर्मोपदेशक, मदिरा या विषयावरही असतात. उर्दू गजलेच्या सुवर्णयुगातील सामाजिक परिस्थितीमुळे उर्दूमध्ये तशा गजला होणे हे अपेक्षितच होते.

मराठीमधील गजलकारांनी खूपच नावीन्य आणलेले आहे. अनेक विषयांवर मराठीत शेर झालेले आहेत. मराठी गजल खऱ्या अर्थाने रुजली तेव्हा आपल्याकडे लोकशाही शासनप्रणाली होती. त्यामुळे एका विशिष्ट शांत सामाजिक स्थितीमध्ये मराठीत गजल आली. त्यामुळे त्यात अनेक विषय आले. जरी कुठलाही विषय गजलेस वर्ज्य नसला तरीही कवी गजलेत स्वतः दिसायला हवाच. उगाचच नुसत्या भ्रष्टाचारावर किंवा शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या मंचीय गजला करण्यात अर्थ नाही. गांधींचे विचार आज कसे मानले जात नाहीत किंवा नेत्यांनी आपल्या स्वातंत्र्याचे तीन तेरा वाजवले यावर गजलेत आक्रोष करण्यात अर्थ नाही. गजल हळुवार असायला हवी. स्वतःच्या अनुभुतींशी प्रामाणिक असायला हवी.

स्वतःशी प्रामाणिक राहून केलेली गजल मुसलसल आहे की गैरमुसलसल या प्रश्नाला मग काही महत्त्व नाही.
===============================================

तांत्रिक सुटी

गजलकारांना गजलेच्या तंत्राने घातलेल्या मर्यादांमुळे व अनेकदा आशयाच्या विशिष्टपणाच्या उर्मीमुळे तंत्रात काही सुटी घ्याव्याशा वाटू शकतात व काही प्रमाणात घेताही येतात. मात्र याबाबत फार काळजीपुर्वक वागणे अपेक्षित असते. म्हणजे, घेतलेली सुट स्वतःच जाहीर केलेली बरी. त्यातून हे समजते की गजलकाराला तंत्र माहीत असूनही सूट घ्यावीशी वाटली. काही सुटी घेण्याची उदाहरणेः

१. गुरू ऐवजी दोन सलग लघू अक्षरे घेणे - हे या आधी सोदाहरण दाखवलेले आहेच.

२. ओळीचे शेवटचे अक्षर जर वृत्ताप्रमाणे गुरू असेल व कवीला असा एखादा शब्द योजायचा असेल ज्यात त्या गुरू अक्षरानंतरही एक लघू अक्षर येते, ते लघू अक्षर तो वृत्तात बसत नसतानाही काही ठिकाणी घेऊ शकतो. मात्र, अशा सुटी प्रचंड प्रमाणात वापरणे हास्यास्पद असून त्यांचा वापर अपरिहार्य असल्याचे निदान प्रकाशित गजलेतून तरी दिसलेच पाहिजे.

३. अलामतीत अ या स्वराऐवजी उ, किंवा इ घेणे याचप्रमाणे उ ऐवजी अ / इ किंवा इ ऐवजी अ / उ घेणे हेही काहीवेळा चालते.

हळू हळू दूर जात आहे मनातली एक एक व्यक्ती
हळू हळू झेप घेत आहे मनास व्यापायला विरक्ती

अजून दिलदार ओळ सुचता तुझ्या सुगंधात नाहतो मी
अजूनही चालते म्हणा तर तुझ्यावरी जुनीच युक्ती

वरील दोन शेरांमध्ये 'मतल्यात प्रस्थापित झालेली अ ही अलामत' पुढच्या शेरात 'उ' अशी वापरली गेलेली आहे. मात्र, ही सुटही किंवा मुळातच असे सूट घेणे हे अपरिहार्य असावे हे पुन्हा लिहिणे!

४. मतल्यात प्रस्थापित झालेली जमीन (जमीन म्हणजे गजलेचे वृत्त, रदीफ, काफिया व अलामत यांचे काँबिनेशन, हे काँबिनेशन मतल्यात सिद्ध होते व रसिकाला पुढच्या शेरात काय काफिया असायला हवा व काय रदीफ असायला हवी हे समजते) पुढील सर्व शेरात पाळायला लागते. पण काही जाणकार गजलकारांनी काव्यगुणाचा त्याग होऊ नये म्हणून एखाद्या अक्षराने भिन्न असलेला एखादा काफियाही वापरल्याची उदाहरणे दिसतात. ही जरी सूट म्हणून नसली तरी अत्यंत अपरिहार्य स्थितीत 'स्वतःच घेतलेली सुट जाहीर करून' मग वापरावे.

उदाहरणः

समजा मतल्यात आजार व बाजार असे काफिया आले तर पुढील शेरांमध्ये त्यातील 'जार' कॉमनच राहायला पाहिजे. पण त्यासारखे शब्द जर कमी असले तर काय? मग मतल्यातच मुळात असे काफिया वापरावेत (अर्थातच, मतलाच बदलणे जरुरीचे होते ) की पुढे नुसते 'आर' आले तरी चालेल, 'जार' नसले तरी चालेल. पण समजा शायराने भर मुशायऱ्यात जर सांगीतले की मी मुद्दाम एक शेर 'व्यापार' असा काफिया वापरून करत आहे व ते माझ्यासाठी जरुरीचे आहे तर त्याला कोण हरकत घेणार आहे?

मराठी भाषेत (देवनागरी लिपीमुळे ) हा सुटींचा प्रश्न कवींना जास्त भेडसावतो. उर्दूमध्ये 'सा' हे अक्षर उदाहरणार्थ 'स + आ' असे काहीसे लिहिण्याची पद्धत असावी, ज्यामुळे फक्त 'आ' हा काफिया ठरू शकतो व 'स' माफ होतो.
५. भटसाहेबांचा एक मतला व त्या गजलेतील नंतरचा एक शेर पाहुयात.

तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका--
'अजून गा रे.. अजून गा रे .. अजून काही..'

आता मतल्यात किनारे, तारे असे काफिया, म्हणजे 'आरे' हा अक्षरसमूह कॉमन व एकाच शब्दाचा भाग असे प्रस्थापित झाले आहेत.

मात्र, पुढील शेरामध्ये 'गा रे' हे दोन शब्द आहेत तरीही त्यांच्यात 'आरे' हा उच्चार कॉमनच आहे. वास्तविक पाहता काफिया हा एकच शब्द असू शकतो. पण मुळात काव्य व त्यातही गजल ही नादसाधर्म्याने नटलेली कविता असते. त्यात अशी सूट घेण्याने उलट लज्जत वाढतेच. उर्दू गजलांमध्ये हे कित्येक वेळा झालेले आहे.
===============================================

शेवटी, गजलियत असेल तर गद्य लिहिले तरी आवडणारच. आपण सर्वमान्य तंत्र पाहात आहोत म्हणून ही चर्चा!

गजलच का?

कोणत्याही कवीला हा प्रश्न पडू शकेल. काव्यच लिहायचे तर ते गजलेच्या माध्यमातून का लिहायचे? इतके तांत्रिक काव्य लिहिण्यापेक्षा आम्ही ओवी लिहू, लावणी लिहू, भावगीत लिहू, मुक्तछंद लिहू!

एकदा रसिकांचीही पावती घेऊन पाहावी.

मी पाहिलेल्या अनेक कविसंमेलनांमध्ये 'केवळ शेवटी काफिया व रदीफच्या समेवर ओळ आली' याची जाणीव होऊनच रसिक मुक्त दाद देतात. शेराचा अर्थ काय होता, त्या अर्थात काही दडलेले होते काय वगैरेवर विचार करणे एखाद्या भरगच्च संमेलनात शक्य होईलच असे नाही. पण एक नादसाधर्म्य व लयबद्धता असल्यामुळे मुळातच गजल भाव खाऊन जाते.

पण हे काही गजल करण्याचे कारण असू शकत नाही.

गजल करण्याचे कारण असते 'कोणताही अनावश्यक व वरवर काव्यात्मक वाटणाऱ्या शब्दांचा अनावश्यक भरणा न करता सूचकपणे आपली जीवनानुभुती व मनस्थिती विविध विषयांच्या माध्यमातून प्रदर्शित करणे '!

गजलेत एकाचवेळी तंत्राची मर्यादा व पाच भिन्न विषयांवरील कविता करण्याची मुभा यांचे काँबिनेशन असते. कोणत्याही काव्यप्रकारात हे सहसा होत नाही. म्हणजे, स्वातंत्र्यवीरांवर केलेल्या कवितेत तोच विषय शेवटपर्यंत येणार. पण गजलेत असे करण्याची गरज नाही. म्हणजेच, एकाचवेळी तंत्राने बांधणारी पण आशयाआबत मुक्त होणारी अशी ही कविता आहे.
गजलेत बहुतांशी कोणत्याही विषयावर भाष्य करता येते. लावणीमध्ये 'विठ्ठल भेटतच नाही' ही भावना येत नाही. अभंगात 'भावजी दमांनं' म्हणणे योग्य ठरणार नाही. भावगीतात 'काय हे आजकालचे भ्रष्ट नेते' असे म्हणणे योग्य ठरणार नाही.पोवाड्यात 'संसार मांडते मी' म्हणणे किंवा 'धुंदी कळ्यांना' म्हणणे विचित्र वाटेल. गजलेवर हे असले अंकुश नाहीत. विषय कोणताही असो, ती आपल्या स्वतंत्र ढंगाने कवीला बोलके करत भावना रसिकांपर्यंत पोचवते.
म्हणून ...... 'गजल'!
===========================================

परभाषिक शब्दांचा अंतर्भाव

गजलेत अनेकवेळा प्रचलीत आहेत म्हणून परभाषिक शब्द घेतले जातात. मुळात 'इरादा' हा शब्द मराठी नाही, पण तो गजलेत घेतला गेलेला आढळतो. तसेच, टेबलाला उगीच कुणी 'मेज' म्हणून गजलेत घेण्यात काही अर्थ नाही हेही खरे.

याबाबत निश्चीत असे लिखाण जरी फारसे उपलब्ध नसले तरी सर्वमान्य विचारांप्रमाणे जाता येते. ते विचार खालीलप्रमाणे

१. जो परभाषिक शब्द मराठीमध्ये 'मराठी पर्यायी शब्दाहून किंवा जवळजवळ तितकाच ' प्रचलीत आहे तो घेता येतो व घेतला जातो.

२. जो परभाषिक शब्द मराठी रसिकाला बऱ्यापैकी नियमीत परिचयाचा आहे तोही घ्यायला हरकत नाही.
३. जे परभाषिक शब्द मराठीत प्रचलीत नाहीत ते गजलेत घेतले जात नाहीत. म्हणजे, जू-ए-शीर, खून (रक्त या अर्थी )वगैरे!

४. जे परभाषिक शब्द आपल्या संस्कृतीशी निगडीत नाहीत ते सहसा गजलेत नसतात. जसे, साकी, हिज्र वगैरे!

५. इंग्रजी शब्दांनी जरी गजल आधुनिक होत असली तरी शक्यतोवर इंग्रजी शब्द टाळलेले बरे!

भाषा हे जरी संपर्काचे व संवादाचे माध्यम असले व आजच्या समाजाला हिंदी व इंग्रजी व्यवस्थित ज्ञात असले तरी गजलेला एक मातृभाषिकपणा ठेवणे आवश्यक आहे.
===========================================

मतला व मक्ता

गजलच्या पहिल्या शेराला मतला म्हणतात हे आपण पाहिले आहे. मतला म्हणजे तो शेर ज्यात गजलेची जमीन स्पष्ट होते. म्हणजे, या विशिष्ट गजलेत कोणते वृत्त, कोणता काफिया, काय अलामत व कोणती रदीफ आहे हे स्पष्ट होते. हे स्पष्ट होण्याचे कारण म्हणजे 'मतला' या शेरातील दोन्ही ओळीत रदीफ, काफिया व अर्थातच काफियाबरोबरची अलामत येते व दोन्ही ओळी कोणत्या वृत्तात आहेत ते लक्षात येते.

कवीमनाला जेव्हा एखादी अनुभुती छेडत असते तेव्हा कवीला त्यातून एखादी कल्पना, एखादी ओळ, एखाद्या विशिष्ट वृत्तात सुचून जाते. गजल ही सर्वसाधारणपणे ९० % कारागिरी असलेली व १० % मूळ (ओरिजिनल ) असलेली कविता असते. ज्या कवीच्या बाबतीत कारागिरी ५० % व मूळ ५० % होईल तो खूपच श्रेष्ठ कवी म्हणायला हरकत नाही. याचे कारण एखाद्या गजलेतील 'सर्व अनुभुती, सर्व कल्पना, सुचतानाच एकाच वृत्तात सुचतील' हे होणे कठीण आहे. एखादी ओळ संपूर्णपणे मूळ असणे सहज शक्य होते. पण सर्वच ओळी मूळ स्वरुपात जशा सुचतील तशाच गजलेत सूट होणे कठीण असते. समजा अशा पाच भिन्न कल्पना किंवा अनुभुती आपोआप शब्दरूप घेऊनच मुखातून बाहेर आल्या तरीही त्या एकाच वृत्तात येतील असे नाही. त्यातून पाच भिन्न गजलांचे भिन्न शेर निर्माण जरूर होऊ शकतील. पण एक गजल रचण्यासाठी जे पाच शेर लागतात ते गजलेच्या तंत्राच्या मर्यादांमुळे कवीकडून कारागिरीची प्रचंड अपेक्षा करू लागतात.

अशा वेळी कारागिरीच १०० % असलेले शेर निर्माण होणार नाहीत हे बघायला लागावे.

पण या सर्वामुळे व पाच शेर रचण्याचे बंधन असल्यामुळे कवी कारागिरी वाढवत नेतो. त्यामुळे मूळ कल्पनेला तडा जातो असे नाही. पण मूळ कल्पना बऱ्याचदा सांकेतिक पद्धतीने उलगडून समोर येते. म्हणजे, 'चांदणे' म्हंटले की प्रेम किंवा विरह याचा उल्लेख आहे हे रसिक जाणायला लागतो. याचप्रमाणे, सांकेतिक भाषा वापरल्यामुळे बरेचदा मूळ कल्पनेव्यतिरिक्तही काही इतर अर्थही त्या शेरातून निघायला वाव राहतो.

मात्र, प्रत्येक सुचलेली ओळ किंवा कल्पना ही मतल्यातच गुंफली पाहिजे असे नाही किंवा तसे करता येईलच असे नाही. म्हणजे, एखादी कल्पना पूर्णपणे मांडून व्हायला दोन ओळी लागतात. (लागायला हव्यातही.) अशा वेळेस दुसरी ओळ पूर्ण होताना आपल्याला गजलेचे काफिया व रदीफ, तसेच वृत्त सुचवून जाते. ते सुचल्यावर कवी दुसरी एखादी अनुभुती त्याच जमीनीत कशी मांडता येईल याचा विचार करू लागतो.अशा पद्धतीनेही काही वेळा गजला तयार होतात. यात काहीही चूक नाही. कारण गजल मुळात बरीचशी कारागिरीवर अवलंबून असते. नेमक्या याच कारणाने 'मुक्तछंद' इतर कुठल्याही अनावश्यक शब्दांचा किंवा प्रतिमांचा सहारा न घेता सरळ सरळ भिडताना दिसतो. याचमुळे मुक्तछंद ते गजल हा प्रवास कवी तंत्रात पक्का झाला आहे व विचार मांडण्यासाठी हुकुमीपणे तंत्राचा वापर करू शकत आहे याचा निदर्शक असतो.

मी एक शेर रचला होता. मला २००५ मध्ये झालेल्या अपघातात मुंबई पुणे महामार्गावर मी गाडीत एकटाच अडकून पडलेलो होतो व माझ्या डाव्या गुडघ्याचा चक्काचूर झालेला होता. मी इतर गाड्या थांबाव्यात व मला मदत मिळावी यासाठी माझ्या गाडीतून हात बाहेर काढून तब्बल अर्धा तास थांबलो होतो. पण सगळेच प्रचंड वेगात जात असल्यामुळे कुणाला कळतच नव्हते की या गाडीत कुणी आहे, किंवा कळले तरी थांबणेच शक्य नव्हते. तब्बल चार वर्षांनी त्या घटनेची पुन्हा आठवण झाली तेव्हा मला दोन ओळी जवळजवळ ४० ते ५० % आहेत तशाच सुचल्या.

घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी

यातील 'घातली मी साद' ऐवजी प्रथम मला 'लागले हृदयास' सुचले होते. 'हृदयास लागणे' हे मला 'पायाला लागणे' या वरून सुचले होते. 'थांबले नाही कुणी' हे तसेच्यातसेच सुचले होते. या 'थांबले नाही कुणी'ने मला एकाच ओळीत काफिया व रदीफही सुचवून टाकले होते. 'आपले नाही कुणी' हे मला काही क्षण विचार केल्यावर सुचले. 'चांगले आहेत सारे' हे तीन शब्द आणखीन थोडा विचार केल्यावर सुचले. अचानक एक मतला तयार झाला. पण बहुतांशी वेळा असा मतला तयार झाल्याचा अनुभव मला नाही. तसेच, मी 'घातली मी साद' ऐवजी 'लागले पायास' असे लिहिले असते तर तो मतला अशक्त झाला असता. या उदाहरणातून मला कारागिरी व मूळ कल्पना यांचे नाते दाखवायचे होते.

तेव्हा, सुचलेल्या कल्पनेचा मतलाच झाला पाहिजे असेही नाही व मतलाच सुचावा याचा प्रयत्न कवीने करणेही योग्य नाही. एक दोन कल्पना मनात रेंगाळल्यावर हळूहळू त्यावरचे उघड भाष्य मुखातून येतेच. मग कारागिरी करून दोन शेर करता येतात.

यामुळे 'मतला' हा 'नेहमीच मूळ असतो असे नसल्यामुळे', मतला रचणे हे अत्यंत विचारपुर्वक करण्याचे काम होऊन बसते.

अनेकदा इतर शेर सुचल्यावर 'मतला' काय रचायचा असा विचार करावा लागतो, याचे कारण मतल्यात दोन काफिया असतात, ते दोन्ही रदीफशी जुळायला लागतात व त्यातही त्यातून एक अर्थपूर्ण शेर निर्माण व्हायला लागतो.

गजलकारांची गजल रचण्यातील एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे 'मतला रचणे'!

मतला रचताना गजलकाराने आधी रचलेल्या सर्व शेरांमधील एक भावना जाणून घ्यावी लागते. त्याला सुयोग्य असे विचार किंवा प्रकृती असलेली कल्पना रचावी लागते. गजलेतील एक, दोन शेर बरे वाटणे व मतला नापास होणे हे रसिकाला सहज समजते.

आता मक्त्याकडे वळूयात.

मक्ता म्हणजे गजलेचा असा शेवटचा शेर ज्यात कवीने आपले नाव गुंफलेले आहे. ज्या शेरात कवीने आपले नाव गुंफलेले नाही असा शेवटचा शेर मक्ता ठरत नाही. मक्त्यामध्ये एक वेगळेच आव्हान असते. आपण जर उपनाम घेतलेले असलेले, तर त्या उपनामालाही काही अर्थ असू शकतो. जसे, मी घेतलेले उपनाम 'बेफिकीर'! बेफिकीरचा अर्थ निष्काळजी, बेदरकार असा काहीतरी होईल. आपण मूळ नावच जर घेतले असेल तर त्याचा अर्थ फार वेगळाच असतो, जसे श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण, अनंत म्हणजे गणपती, देवेंद्र म्हणजे देवांचाही इंद्र असे!

मक्त्यामधील आव्हान हे की आपले उपनाम (याला उर्दूमध्ये तखल्लुस म्हणतात ) शेरामध्ये बेमालुमपणे मिसळले पाहिजे. जर मूळच नाव मक्त्यात घ्यायचे असेल तर ते मिसळेल असे नाही, पण त्याच्या वापराने शेराला बाधा येता कामा नये किंवा शेर कृत्रिम वाटता कामा नये. मक्त्यामध्ये कवीला आपले नाव कुठल्याही ओळीत, कुठेही व अगदी काफिया म्हणूनही वापरता येते. आपलेच नाव रदीफ म्हणून वापरणे हे हास्यास्पद ठरावे.

गजलेला मतला असायलाच लागतो. मक्ता मात्र कवीच्या निवडीप्रमाणे असतो किंवा नसतो. मक्ता, म्हणजे कवीचे नाव गुंफलेला शेवटचा शेर, गजलेत असलाच पाहिजे असे काही नाही. भटसाहेबांनी घेतलेली भूमिका अशी आहे की आजच्या तांत्रिक युगात मक्त्याची गरजच नाही, उलट कवीच्या नावाच्या अंतर्भावामुळे उगाच तितक्या मात्रा ब्लॉक होऊन कवीवर उर्वरीत मात्रांमध्ये मुद्दा सांगायचे बंधन येते. त्यांच्यामते पुर्वी मक्ता वापरायचे याचे कारण 'ही गजल कोणाची आहे' हे कळणे गरजेचे असायचे कारण पुस्तके छापली जायची नाहीत.

उर्दूमध्ये बहुतांशी गजलांमध्ये मक्ते आहेत.

मी स्वतः उपनाम घेतलेले असून मी प्रत्येक गजलेत मक्ता घेतला आहे. (अर्थातच, उपनाम घेण्यापुर्वीच्या काळातील गजलांमध्ये तो नसणार ).

मी तसे करत आहे याचे कारण मला मक्ता घ्यायला आवडते इतकेच आहे. ती एक शैली आहे, स्वीकारली तरी चालते व नाही स्विकारली तरी चालते.
============================================

गजलेत 'किमान पाच' शेरच का?

मुळात उर्दूमध्ये मी तरी 'तांत्रिकदृष्ट्या गजल अशी असते, तशी असते' या स्वरुपाचे भाष्य वाचलेले नाही. जी काही आहे ती शायरी आहे किंवा समीक्षा आहे. जसे भटसाहेबांनी बाराखडी लिहून गजलतंत्र मराठी कवींना सांगीतले तसे उर्दूमध्ये कुणी व केव्हा सांगीतले हे मला ज्ञात नाही. खलील बीन अहमदने वृत्ते तयार केली, पण गजलतंत्र कुणी तयार केले असावे हे वाचायला मिळाले नाही.

काही मराठी लोक 'पंचमहाभूते' वगैरेचे दाखले देऊन 'पाच' या आकड्याला एकंदरच फार महत्त्व आहे असे सांगत गजलेतील पाच शेरांचे कारण निर्माण करतात. व्यक्तीशः मला ते पटत नाही.

उर्दूमध्ये असे मात्र म्हंटले गेले असावे की 'किमान पाच व जास्तीतजास्त कितीही' किंवा 'किमान पाच व जास्तीतजास्त अकरा किंवा सतरा' शेर असतात. तसेच, शेरांची संख्या विषम असावी असेही उर्दूमध्ये म्हंटले गेले असावे.

एक असे मत आहे की गजल ऐकायला येणारे रसिक विविध वयाचे व विविध क्षेत्रातील असल्यामुळे प्रत्येकाला 'आपलासा' वाटणारा एक शेर मिळावा या दृष्टीने गजलेत किमान तेवढे शेर ठेवत असावेत. पण हेही तितकेसे पटत नाही.

अर्थात, आपले आपल्यालाच ताडावे लागते की 'किमान पाच' शेर हा नियम कुठून आला असावा.

१. एखाद्या रचनेला किमान कविता म्हणण्याइतक्या, म्हणजे दहा तरी ओळी असाव्यात या दृष्टीने असे असावे. अन्यथा, फक्त मतला रचूनही त्याला गजल म्हंटले गेले असते. तसेच, एखाद्या शेरालाही म्हंटले गेले असते. मग त्याच्यातून काहीच निष्पन्न झाले नसते. ना रसोत्पत्ती ना कवीच्या प्रतिभेचा आविष्कार!

२. रुबाई चार ओळींची असते व कतआ म्हणजे गजलेतील कोणतेही दोन शेर! हे प्रकार गजलेच्या आधी निर्माण झाले की नंतर हे मी वाचलेले नाही. पण उघड वाटते की नंतरच निर्माण झालेले असावेत. यांच्यापेक्षा गजल किंवा गजलेपेक्षा रुबाई वेगळी असण्याचे कारण बहुधा ओळींची मांडणी ( म्हणजे दोन ओळी की चार ओळी असे ) व ओळींची संख्या असावे.

३. मतला व मक्ता घ्यायचे म्हंटल्यावर 'सुट्टे काही शेर तरी पाहिजेत' या विचाराने कदाचित असे झाले असावे.

४. हा काव्यप्रकार निश्चीत करतानाच मुद्दाम हा निर्णय घेण्यात आला असावा. काव्यप्रकाराला काही निश्चीत स्वरुप असावे या उद्देशाने!

५. कवीला एकाहून अधिक विषयांवर भाष्य करता यावे किंवा एकाच विषयावर भिन्न पद्धतीने भाष्य करता यावे या विचाराने असे करण्यात आले असावे.
==============================================

काही वैयक्तीक मते

ही मते वैयक्तीक असून ते गजलेचे कायदे किंवा सिद्धांत नाहीत. या मतांबाबत ज्याने त्याने आपापले मत ठरवावे. माझा काहीच आग्रह नाही.

१. गजलेचा आशय साधारणपणे प्रेम, प्रेमातील अनेक टप्पे, विरह, अप्राप्य प्रेम, व्यथा, विश्वाबाबतच्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न, रुढी व समजांबाबत योग्य किंवा मिष्कील टीका, ईशचिंतन, देव या संकल्पनेवर मिष्कील टीका यांनी नटलेला व यांचा अंतर्भाव करणारा असावा.

२. गजलेचा आशय पूर्णपणे सामाजिक किंवा पूर्णपणे नात्यागोत्यांशी संबंधीत असू नये.

३. गजलेमधे हिंसक वर्णन, नग्नता, अश्लीलता, बीभत्सता, सवंगता, पाणउतारे, जहरी टीका, व्यक्तींचे उल्लेख करताना शिवराळ किंवा टोकाचे वाईट शब्द वापरणे किंवा नुसताच उपदेश हे नसावे.

४. उत्स्फुर्तता अत्यंत महत्त्वाची आहे. उत्स्फुर्तपणे जे सुचते ते लिहिण्यामुळे कारागीरी कमी होण्यास वाव मिळतो व गजल प्रभावीत होण्याची शक्यता कमी होते. यासाठी क्षणाक्षणाला घडणाऱ्या गोष्टींवर मंथन करत राहणे व वृत्तावर पकड मिळवणे हे महत्त्वाचे आहे.

५. एखादा कवी वर्षाला एक गजल करेल तर दुसरा दिवसाला दोन! त्यावर गजलेचा किंवा कवीचा दर्जा ठरत नाही.

६. गजल गाऊन सादर केली जाते की वाचून हे महत्त्वाचे नाही.

७. कवीला गुरू असू शकत नाही. गजलेचे तंत्र ही एकच बाब शिकण्याची आहे.

८. समीक्षकांचे महत्त्व काय हे काही केल्या मला कळत नाही.

९. गजल रसिकाला समजलीच पाहिजे. समजण्यामध्ये काहीही अडचण असता कामा नये. निदान शब्दार्थ तरी पूर्णपणे समजलाच पाहिजे.

१०. साध्या साध्या शब्दांमध्ये गजल लिहिली गेल्यास ती दीर्घकाळ लक्षात ठेवणे सोपे जाते.

११. दहा वर्षे गजल करणारा व सोळा महिने गजल करणारा यांच्यात दर्जात्मक तफावत असेलच असे नाही. नवोदीताकडे कदाचित जास्त हातोटी असेल.

१२. श्रेष्ठ गजलकाराच्या सर्व गजला श्रेष्ठ नसतात. सर्व शेर श्रेष्ठ नसतात. त्याची टक्केवारीही ठरवता येणार नाही.

============================================

वरील सर्व माहिती प्राथमिक माहिती आहे. यापुढे गझल खरी सुरू होते. हे अनेक गझलांचा आस्वाद घेतल्यानंतर जाणवावे.

वरील माहितीने युक्त असा गझल परिचय कार्यक्रम मी मोफत करतो. आजवर असे सहा कार्यक्रम मी केलेले आहेत. या माहितीची प्रत ठेवायची असल्यास कृपया माझ्या नावासह ठेवावीत अशी विनंती! हा स्वार्थच आहे.

या लेखावरील चर्चेतूनही अनेक नवीन बाबी बोलता येतील. पण ते चर्चेत कोणता मुद्दा येतो यावर अवलंबून असेल! गझल रचण्याची काहीही माहिती नसलेल्या एक शुद्ध गझल रचता येईल इतपत मात्र माहिती या लेखात नक्कीच आहे. तसे झाले तर फारच छान होईल खरे तर!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

===========================================

__._,_.___

Attachment(s) from =?UTF-8?B?4KS44KS+4KSX4KSwIOCkreCkguCkoeCkvuCksOClhw==?=

1 of 1 File(s)

Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers