आपले आईबाबा, आपली खेळणी दुसऱ्याबरोबर शेअर करण्याच्या भावनेतूनच सिबलिंग राइवलरीला सुरुवात होते. पालकांनी वेळीच योग्य भूमिका घेतली, तर या नकारात्मक विचारधारेलाच आळा बसू शकतो.
त्या दोघा 'अब्जाधीश' भावांमधील पराकोटीच्या वैराच्या तथाकथित कथा आपण सारेच ऐकून आहोत. काही वर्षांपूवीर् 'रिलायन्स'चे निरनिराळे उद्योग मुकेश आणि अनिल अंबानी या दोघा भावांनी विभागून घेतले. तेव्हापासून ते उघडपणे एकमेकांच्या विरोधात स्पर्धकाच्या रुपात उभे आहेत. याचा कहर झाला तो, अलीकडच्या हेलिकॉप्टर प्रकरणात. एकाने दुसऱ्याला कायमचं संपवण्यासाठी असा कट रचला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात कुणालाही अतिशयोक्ती वाटू नये इतकं त्यांचं वैर विकोपाला जाऊ शकतं. अशातऱ्हेची द्वेषभावना ही निव्वळ अतिमहत्त्वाकांक्षी, यशस्वी व्यक्तींमध्येच असते असं मात्र अजिबातच नाही. अगदी लहान वयापासूनच या 'सिब्लिंग राइवलरी'ची बीजं रुजतात. कित्येकदा तर दुसऱ्या भावंडाचं आगमन होणार ही बातमीच पहिल्याला अस्वस्थ करते. आपले आईबाबा, आपलं घर, खेळणी, हे अवघं विश्वच आता आपल्याला आणखी कुणाबरोबर तरी वाटून घ्यावं लागणार ही गोष्ट त्या लहानग्या जिवाला महाकठीण वाटू शकते आणि कधीकधी पालकच आपल्या वागण्यातून या असुरक्षिततेच्या भावनेला खतपाणी घालतात. द्वेषभावना रुजवतात.
प्रत्येक मूल हे आपला स्वत:चा असा वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव, गुणवैशिष्ट्यं आणि व्यक्तिमत्त्व घेऊन येतं. कितीही नाकारलं तरी मुलांमधील एकाविषयी पालकांना अधिक ओढा असतो. डावं-उजवं केलं जातं. कौतुक, टीका करताना समान वागणूक दिली जात नाही. आणि यातूनच दोघांमध्ये स्पर्धा, स्पधेर्तून द्वेष वाढू लागतो.
दोघांपैकी एक अधिक हुशार, अधिक देखणं किंवा कुठल्याही बाबतीत अधिक सरस असेल तर मग द्वेष वाटायला सबळ कारणही मिळतं. ही स्पर्धा कधी फारच उघड, ढोबळ होऊन सामोरी येते तर कधी छुपी राहाते. लहानपणी भावंडांना एकमेकांची सोबत करणं, वस्तू शेअर करणं, प्रसंगी मदत करणं, विश्वासाने एकमेकांची सिक्रेट्स शेअर करणं अनेकदा भाग पडतं. परस्परांविषयी द्वेष असल्यास या गोष्टी शक्य होत नाहीत. एकमेकांच्या जवळ आणणाऱ्या प्रसंगांतून प्रेम वाढत जाण्याऐवजी मग द्वेषच वाढत जातो आणि प्रौढ वयात जिथे सगळ्याच नात्यांना व्यवहाराची कसोटीही पार पाडावी लागते, भावंडांनाही त्याला तोंड द्यावंच लागतं. काही वेळा मग नको इतकी कटुता निर्माण होते तर काहींच्या बाबतीत नात्याचे बंध तुटतील इतक्या गोष्टी ताणल्या जातात. मुंबईसारख्या महानगरीत 'हम दो हमारा/हमारी एक' हेच कुटुंबाचं स्वरुप गेल्या काही वर्षांत रूढ होऊ लागलं असताना 'सिब्लिंग राइवलरी'चा प्रश्न गैरलागू वाटू शकतो. पण, मधल्या काळात अनेकांच्या पगारांत चांगलीच वाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा 'मुलाला कुणीतरी सोबत हवं' याची जाणीव वाढू लागली आहे. उच्चभ्रू आणि उच्चमध्यमवगीर्यांत पुन्हा किमान दोन मुलं आवश्यक असल्याचा विचार ठळकपणे दिसू लागलाय. अर्थात, ताज्या 'मंदी'मुळे त्या बाबतीतही अनेक जणांची अवस्था 'तळ्यात मळ्यात' होऊन बसलीय. परंतु, दुसऱ्या मुलाचा विचार केलाच तर मात्र 'सिब्लिंग राइवलरी'च्या समस्येचा विचार आधीच गांभीर्याने करायलाच हवा.
............
.
* पालकांची जबाबदारी
हे सारं टाळायचं असेल तर पालकांनी लहानपणापासून काही बाबतीत दक्ष असायला हवं. दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची बातमी पहिल्याला देतानाच, त्याच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने त्याला वा तिला येणाऱ्या भावंडासाठी 'पॉझिटिव्हली' तयार करावं. येणारं दुसरं अपत्य हे पहिल्याला सोबत करण्यासाठी आहे, असा विचार हा मुळातच दुसऱ्याला 'सेकण्डरी' वागणूक देणारा आहे. आपण सगळ्यांनी एकमेकांना सोबत करायची आहे, मोठ्यांनी लहानांना जपायचं आहे आणि प्रसंगी लहानांनीही मोठ्यांना मदत करायला हरकत नसते, असा विचार बिंबवल्यास कुटुंबातील वातावरण अधिक निकोप होऊ शकतं.
* आत्मकेंदी वृत्तीत वाढ
दोघांपैकी एक जण अगदी आपल्यासारखं आहे, असं वाटून घेऊन वैयक्तिक आयुष्यात स्वत:ला न मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा त्या मुलावर वर्षाव करण्याचंही पालकांनी टाळावं. संबंधित मुलामधील मूलभूत आत्मकेंदी वृत्ती अशामुळे वाढीस लागून व्यक्तिमत्त्व स्वाथीर् प्रवृत्तीचं होऊ शकतं.
* वयात पुरेसं अंतर
दोघा मुलांमध्ये पुरेसं अंतर असल्यास एकाच वेळी दोघांकडे सारखंच लक्ष देण्याचा ताण पालकांवर येणार नाही. पर्यायाने दोघांपैकी एकाला एकटं वा असुरक्षित वाटण्याची वेळही येणार नाही. दोघांपैकी एकाबद्दल अधिक प्रेम असल्याचं पालकांनी कधीच दाखवू नये. नाहीतर, आईबाबांचं आपल्याखेरीज दुसऱ्या अपत्यावर अधिक प्रेम असल्याचा संशय मुलांच्या मनात असतोच, त्याला खतपाणी मिळेल. मग, भावंडांतील वैर वाढतं.
0 comments:
Post a Comment