... आणि कसाबमधला 'क्रूरकर्मा' जगाला दिसला!
२६ नोव्हेंबर २००८... रात्रीचे साडेआठ-पावणे नऊ वाजलेले. माझी शिफ्ट संपत आलेली. नाइट शिफ्टचा सहकारी रोहन (जुवेकर) नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच ऑफिसात पोहोचलेला... दुसरा सहकारी श्रीनिवास रणसुभे (श्री) याने नाइटच्या कामाला सुरूवात केलेली. तो महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये बसला होता. भारताने इंग्लंडविरुद्धची कटक वन डे जिंकली... डे-नाइट मॅचमध्ये सचिन तेंडुलकरची हाफसेन्चुरी फळाला आली होती. मॅचची ही बातमी वेबसाइटवर अपलोड करून मी रोहनला ' टाळी ' देणार होतो. (टाळी देणे याचा अर्थ पुढची जबाबदारी सहका-यावर टाकून घरी जाणे.)
तेवढ्यात... बातमी आली की, कुलाब्यात काहीतरी गडबड झाली आहे. दोन गटांमध्ये फायरिंग झालीय वगैरे. शिफ्ट संपता संपता कामाला लागलो होतो. आता बातमी कन्फर्म करायची, माहिती घ्यायची आणि बातमी करून साइटवर टाकायची... रोहन नाइट शिफ्टच्या कामाला लागला होता. पाच-दहा मिनिटातच नवभारत टाइम्समधल्या सहका-यांकडून कळले की, कुलाब्याच्या एका इमारतीतून रस्त्यावरून जाणा-या लोकांवर गोळीबार होतोय... ही एक नवीच भानगड होती. लगेच टीव्हीचा रिमोट हाती घेतला आणि चॅनेल सर्फिंग करायला लागलो. ' स्टार माझा ' वर कुणातरी एका नागरिकाची फोन इन प्रतिक्रिया सुरू होती... कुलाब्यातला एका इमारतीच्या खिडकीतून खाली रस्त्यावर फायरिंग सुरू आहे. रस्त्यावरचे लोकही दगडफेक करतायत... वगैरे वगैरे. फायरिंग, दगडफेक मुंबईत काही नवीन नाही. पण हा प्रकार जरा विचित्रच होता.
नक्की काय झालंय, काही कळत नव्हतं. या गोंधळात आणखी भर पडली ती अशी... महाराष्ट्र टाइम्समधील काही सहकारी ड्युटी संपवून सेंट्रल रेल्वेने घरी निघाले होते. पण मुंबई सीएसटी स्टेशनमध्ये फायरिंग सुरू असल्याचे कळले... म्हणून ते पळत पुन्हा ऑफिसात आले होते. श्रीने जी टॉकवरून ही माहिती तत्काळ पुरवली होती. ही काय नवीन भानगड आता... कुलाब्यात इमारतीतून फायरिंग, सीएसटी स्टेशनवर फायरिंग... एव्हाना टीव्ही चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज झळकायला सुरूवात झालेली... मुंबईत दोन ठिकाणी फायरिंग झाल्याचे कळत होते. आम्हीही वेबसाइटवर ब्रेकिंग न्यूज चालवत होतो. धड माहिती कळत नव्हती, पण एकाचवेळी दोन ठिकाणी फायरिंग म्हणजे मोठी बातमी होती. आता घरी जायला उशीर होणारच होता..
.
अर्ध्या एक तासात बातमी कळली ती भयंकरच होती. मुंबईत ठिकठिकाणी फायरिंग सुरू आहे, विलेपार्ल्याला टॅक्सीत बॉम्ब ब्लास्ट झालाय, सीएसटी स्टेशनात लोकांचे मुडदे पडलेत... एक एक बातमी थरकाप उडवणारी होती. आमच्या टीममधील इतर सहका-यांचे फोन यायला सुरूवात झाली. मुंबईत काहीतरी भयंकर घडतेय, एवढं स्पष्ट झालं होतं. सीएसटी स्टेशन टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपासून समोरच्याच फुटपाथवर आहे. खाली जाऊन नक्की काय झालंय, ते बघून येऊ, असं मी आणि रोहननं ठरवलं. पण ऑफिसमध्ये टीव्हीसमोर जमलेल्या कुणीतरी सांगितलं की, टाइम्स बिल्डिंगचे दरवाजे बंद करून घेतले आहेत. कुणालाही बाहेर जाऊ देत नाहीत की, आत येऊ देत नाहीत. आमचा हिरमोड झाला. आता फोन आणि टीव्हीवरूनच माहिती घेणं सुरू झालं.
आमच्या वेबसाइट टीमचे हेड (सुहास) फडके सरांचा घरून फोन होता... मुंबईत काही अतिरेकी घुसलेत आणि फायरिंग सुरू आहे. नक्की किती मृत आहेत, अजून काही कळत नाही, असे बोलणे झाले. मुंबईत अज्ञात व्यक्तींकडून ठिकठिकाणी फायरिंग अशी हेडलाइन साइटवर लावली होती. आणखी एक सहकारी निलेश बने हाही फोनवरून संपर्कात होताच. तो गिरगावातच होता, पण टाइम्स इमारतीचे दरवाजे बंद असल्याने त्याला ऑफिसात पोहोचणे शक्यच नव्हते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी एव्हाना वा-यासारखी सर्वत्र झाली होती. घरच्यांचेही फोन यायला सुरूवात झाली. मी ऑफिसात सुरक्षित आहे, हे ऐकल्यावर त्यांचाही जीव भांड्यात पडला. मला पटकन आठवण झाली ती धाकट्या भावाची. तो कांदिवलीला कामाला आहे. मागे २६ जुलैच्या महापुराच्या वेळी तो रात्रभर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अडकलेल्या दुमजली बसमध्ये बसून राहिला होता... त्याला फोन केला, तो घरी असल्याचे कळले, तेव्हा मला हायसे वाटले. मी पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्याच्या (बातमीदारीच्या) जगात परतलो.
रात्रीचे अकरा वाजले होते... महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्येही बातमीचीच गडबड होती. मृतांचा आकडा २०, ३०, ४० असा वाढत चालला होता. तसतशे बातम्यांचे अपडेसही होत होते. सीएसटी, कामा हॉस्पिटलच्या भागात दोघा खतरनाक अतिरेक्यांचा खुनी खेळ सुरू असताना, म.टा.चा क्राइम रिपोर्टर हेमंत साटम नेमका मुंबई महापालिका ऑफिसजवळ रस्त्यावरच अडकला. प्रेस क्लबमधून तो ऑफिसच्या दिशेने येत होता. पण ऑफिसचे गेट बंद आहेत, हे कळल्यावर तो पालिका सुरक्षारक्षकांसोबत महापालिकेच्या इमारतीजवळच थांबला. त्याच्याकडून रस्त्यावरही दोघा अतिरेक्यांनी फायरिंग केल्याचे कळले. घटनेचे गांभीर्य मिनिटामिनिटाला वाढत होते.
मटाच्या साइटवर बातम्यांचे अपडेटस् तर होते, पण फायरिंगचा फोटो काही मिळालेला नव्हता. सव्वा अकराच्या सुमारास टाइम्सच्या कॉमयान या इंटर्नल लिंकवर कुणी फोटोग्राफरने हल्ल्याचे फोटो लोड केलेत का, हे शोधायला सुरूवात केली. तेवढ्यात श्रीने पुन्हा जी मेलवरून स्क्रॅप पाठवला. टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ फोटोग्राफर श्रीराम वेर्णेकर यांनी काढलेला एका दहशतवाद्याचा फोटो कॉमयानमध्ये आहे, अशी माहिती त्याने पुरवली. त्याने जी टॉकवरूनच फोटोची फाईल सेन्ड केली... तो फोटो पाहिला आणि काळजात एकदम चर्रर्र.. झालं. सीएसटी रेल्वे स्टेशनकडून जो छोटा फुट ओवर ब्रीज टाइम्सच्या ऑफिसकडे येतो, त्याच पुलावरून तो यंग, बुटकासा, पण अंगापिंडाने मजबूत अतिरेकी खाली उतरत होता. (या ब्रीजचे आता कसाब ब्रीज असे अनऑफिशियल नामांतर झाले आहे. तर टाइम्स इमारतीच्या बाजूने ज्या छोट्या लेनमधून अतिरेकी कामा हॉस्पिटलच्या मागच्या गेटकडे गेले, ती कसाब गल्ली म्हणून फेमस झालीय...) त्या अतिरेक्याच्या डोळ्यात भयानता स्पष्ट दिसत होती. टाइम्सच्या दुस-या मजल्यावरून आपला जीव धोक्यात घालून, फोटोग्राफर श्रीराम वेर्णेकर यांनी त्या अतिरेक्याला कॅमे-यात टिपला होता. (त्या अतिरेक्याने वेर्णेकरांच्या दिशेनेही नंतर फायरिंग केल्याचे नंतर कळले.) अर्थातच रात्रीच्या अंधारात टिपलेला हा फोटो होता. थोडा शेक झाला होता. परंतु त्या अतिरेक्याने सीएसटी रेल्वे स्टेशनमध्ये काय विध्वंस केला असेल, त्याचे चित्र त्याच्या भेदक नजरेतून स्पष्ट दिसत होते. निळ्या रंगाचा वर्साचा टी शर्ट, खाली कार्गो जीन्स, डाव्या हाताला पुढच्या बाजूने लटकत असलेली सॅक आणि उजव्या हातात रायफल... बरोब्बर ११ वाजून १७ मिनिटांनी त्या खुँखार अतिरेक्याचा फोटो महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर सर्वात आधी झळकला.. ! ! रक्तरंजित दहशतवादाचा खराखुरा भयाण चेहरा maharashtratimes.
म.टा. डॉट कॉमवरून हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर काही मिनिटातच वृत्तवाहिन्यांनी तो फोटो टीव्हीवरून दाखवायला सुरूवात केली. टाइम्स नाऊ, एनडी टीव्ही, आज तक, झी २४ तास, स्टार माझा, आज तक... सगळ्यांनीच. त्यापैकी काहींनी महाराष्ट्र टाइम्सचा नामोल्लेख केला, काहींनी केला नाही. पण प्रश्न तो नाही. पाऊणशे लोकांचे जीव घेणा-या अतिरेक्यांचा काळा बुरखा फाटला गेला होता आणि त्यांचा विध्वंसक चेहरा जगापुढे उघडा पडला होता. आणि ही मोलाची कामगिरी बजावली होती ती फोटोग्राफर श्रीराम वेर्णेकर यांनी...
रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि अतिरेकी हल्ल्याचा थरार संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडन्टमध्येही (ओबेरॉय) काही अतिरेकी घुसले असून, तिथे देशी-विदेशी पर्यटकांना ओलिस ठेवण्यात आले होते. तिथेही बेछूट फायरिंग सुरू होते. कामा हॉस्पिटलमधील फायरिंगमध्ये एसीपी सदानंद दाते जखमी झाले होते. कुलाब्याच्या ज्या बिल्डिंगमधून फायरिंग होत होते, ती नरिमन हाऊस नावाची बिल्डिंग म्हणजे प्रत्यक्षात ज्यू कम्युनिटीचे सेंटर असल्याची माहिती कळली होती. मेट्रो टॉकीजच्या सिग्नलजवळ अतिरेक्यांनी रस्त्यावरच्या लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या... त्याही पोलीस जीपमधून. बाप रे.. ! नेमक्या किती अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला चढवला आहे, काही कळायला मार्ग नव्हता. जे. जे., सेंट जॉर्जेस या सरकारी हॉस्पिटल्समध्ये मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढत चालला होता... प्रत्यक्षात घटनास्थळी नसलो तरी अतिरेकी हल्ल्याची दाहकता क्षणाक्षणाला जाणवत होती.
आणि तेवढ्यात ' तो ' फ्लॅश टीव्हीवर झळकला... एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर आणि एसीपी अशोक कामठे हे जानेमाने पोलीस ऑफिसर अतिरेक्यांशी सामना करताना शहीद झाल्याची.. ! आतापर्यंत बातम्या अपडेट करण्याचा किल्ला मी आणि रोहन लढवत होतो. पण तो फ्लॅश पाहिला आणि... आणि हातातलं सगळं अवसानच गळालं. खुर्चीत बसल्या बसल्या अंग कापायला लागलं... सेनापती धारातिर्थी पडल्यानंतर सैनिकांची काय अवस्था होत असेल... अगदी तशीच माझी झाली होती. डोकं सुन्न झालं होतं. फ्लॅश पाहिला, पण बातमीवर विश्वास बसत नव्हता. तडक जागेवरून उठून म.टा.च्या संपादकीय टीमजवळ गेलो. चीफ रिपोर्टर समीर कर्वेला विचारलं, पोलीस ऑफिसर्सची बातमी खरी आहे का ? त्यानेही दुर्दैवाने ' हो... आताचं कळलं. कन्फर्म आहे... ' असंच उत्तर दिलं. पुन्हा साइटच्या ऑफिसात आलो आणि थरथरत्या हातांनीच बातमी ऑपरेट करायला घेतली... ' अतिरेक्यांशी लढताना तिघे पोलिस अधिकारी शहीद !' डोळ्याला आसवांची धार लागली होती. माझ्यापेक्षा रोहन वयाने लहान. त्याचीही अवस्था काही वेगळी नसावी. बातमी करतानाच सगळं सुन्न सुन्न होत गेलं.
२६ / ११ चा हल्ला साधासुधा नव्हता... हल्ला नव्हताच तो, युद्धचं होतं ते... गनिमी काव्याने मुंबईशी लढलं गेलेलं... पुढचे ६० तास ते युद्ध सुरूच होतं. हॉटेल ताजमध्ये शेवटचा अतिरेकी मारला गेला आणि युद्ध संपलं... त्यात जिंकलं कुणीच नाही, सगळ्यांचीच झाली फक्त हार, हार आणि फक्त हारच...
- सुनील घुमे
(सिनियर कॉपी एडिटर ,
--
जर वर्षभराचंच उद्दिष्ट असेल, तर फुले फुलवा.
दशकभराची योजना असेल, तर झाडे लावा.
आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचे असेल, तर माणसं घडवा.
घ्या एक ठाम निर्णय; जो बदलेल तुमचे जीवन:-
माझा जन्मच विजयासाठी झाला आहे.
मी एक योध्दा आहे, संकटांची भीती नाही मला.
जन्माबरोबरच सुरु झालेली स्पर्धा अखेरच्या क्षणापर्यंत चालणारच,
व्यक्ती म्हणून सर्वच जगतात, स्वत:साठी सर्वच जगतात
मी माझ्या आणि इतरांच्या स्वप्नांसाठी जगेन, लढेन.
मी जिंकायचं म्हणूनच जगणार!!!!
मी माझ्या जीवनाचे सार्थक करणारच!!!
मी यशाचे शिखर गाठणारच!!
मी माझे स्वप्न साकार करणारच!
============
As a youth of my nation,
I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.
http://www.myLot.
http://www.globeliv
http://hubpages.
0 comments:
Post a Comment