-मुकुंद पोतदार
* कसोटी : 162 कसोटींमध्ये 54.72 च्या सरासरीने 12970 धावा. 43 शतके, 54 अर्धशतके.
104 झेल. 44 बळी.
* वन-डे (श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी) : 436 सामन्यांत 44.50 च्या सरासरीने 17178 धावा.
45 शतके, 95 अर्धशतके. 132 झेल. 154 बळी.
* ट्वेंटी-20 : एका सामन्यात दहा धावा आणि दोन बळी.
भारतीय क्रिकेट संघाचा 1989 मध्ये पाकिस्तान दौरा ठरला होता. त्या संघात कुरळे केस असलेला एक शालेय मुलगा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणात त्याला रडीचे डावपेच खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाविरुद्ध दोन हात करायचे होते. त्या संघात के. श्रीकांत, महंमद अझरुद्दीन, संजय मांजरेकर, नवज्योतसिंग सिद्धू असे कसलेले फलंदाज होते, तरीही या चिमुरड्याकडून संघाला बऱ्याच आशा होत्या. किंबहुना भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील "नेक्स्ट ग्रेट' अशी त्याची गणना होत होती. हा मुलगा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. त्या दौऱ्यात एका सामन्यात एका पाक प्रेक्षकाने एक फलक झळकाविला. "सचिन गो होम अँड ड्रिंक मिल्क' असा "सल्ला' त्यावर होता.
सचिन हा "दूध पिता बच्चा' असल्याचे त्याला सुचवायचे होते किंबहुना त्याचे दुधाचे दात अजून पडायचे आहेत, असेही त्याला अभिप्रेत असेल. मात्र "दुधाचे दात पडले असतील किंवा नसतील, गोलंदाजांचे दात घशात घालणारा फलंदाज' असा दरारा निर्माण करण्यास सचिनने त्याच दौऱ्यापासून सुरवात केली. तेव्हा त्याने इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनूस, अब्दुल कादीर अशा मातब्बर गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. हा चिमुरडा मग बघताबघता भारतीय फलंदाजीचा तारणहार बनला.
सचिनने अनेक विश्वविक्रम नोंदविले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याने प्रतिस्पर्ध्यांचीही मनापासून शाबासकी मिळविली. परदेशी तज्ज्ञांनी त्याची एकमताने प्रशंसा केली. दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमन यांनी "सचिनची शैली माझ्या शैलीशी सर्वाधिक साम्य दर्शविते,' असे गौरवोद्गार काढले होते. सुनील गावसकरनी त्यांच्या काळात सर्वोत्तम असलेल्या वेस्ट इंडिजच्या वेगवान तोफखान्याचा निर्धाराने सामना केला होता. त्याचप्रमाणे सचिनने त्यावेळी सर्वोत्तम असलेल्या कांगारूंविरुद्ध सर्वोत्तम खेळी केली. महान लेगस्पिनर शेन वॉर्न याची अनेक अस्त्रे त्याने निष्प्रभ केली.
सचिनला कारकिर्दीत पाठदुखी आणि "टेनिस एल्बो' अशा दुखापतींनीही ग्रासले. मात्र त्याने विलक्षण मेहनतीच्या जोरावर या दुखण्यांवर मात केली. 1999 मध्ये विश्वकरंडक स्पर्धा सुरू असतानाच सचिनचे वडील रमेश यांचे निधन झाले. सचिन अंत्यसंस्कार आटोपून लगेच इंग्लंडला रवाना झाला. नंतर केनियाविरुद्ध त्याने शतकही झळकाविले.
सचिनने आकडेवारीच्या निकषावर तर आपण "ऑल टाइम ग्रेट' बनल्याशिवाय राहणार नाही, हे कारकिर्दीच्या पहिल्या काही वर्षांतच दाखवून दिले होते. मात्र खेळात चढ-उतार येतच असतात आणि सचिनसुद्धा त्यास अपवाद नव्हता. यातही 2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सचिनचे अपयश धक्कादायक होते. ऑस्ट्रेलियाने 360 धावांचे आव्हान दिले असताना सचिन पहिल्याच षटकात चार धावांवर बाद झाला. सचिन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये म्हणजे अंतिम, उपांत्य किंवा बाद फेरीतच "फ्लॉप' ठरतो, अशा टीकेने त्यामुळे जोर धरला. त्याच वर्षी पाच कसोटींतील नऊ डावांत त्याला 17 च्या सरासरीने एकमेव अर्धशतकासह केवळ 153 धावा करता आल्या. मग 2006 आणि 2007 ही दोन वर्षे मात्र सचिनसाठी प्रचंड निराशाजनक ठरली. त्याची सरासरी फक्त 24.27 होती. त्याला केवळ एक अर्धशतक काढता आले आणि 63 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर 2007 ची विश्वकरंडक स्पर्धा. जगज्जेतेपदाची आशा असणाऱ्या "टीम इंडिया'चा "सुपर एट'मधील प्रवेश नक्की मानला जात होता.
मात्र शेवटच्या गटसाखळी सामन्यात लंकेने भारताला गारद केले. सचिनचा शून्यावर त्रिफळा उडाला. वेस्ट इंडिजमधील या स्पर्धेतील एकूणच अपयश भारतीय क्रिकेटसाठी प्रचंड मानहानिकारक होते. यामुळे इतर खेळाडूंशिवाय प्रामुख्याने सचिनवर होणारी टीका आणखी वाढली. या स्पर्धेतील अपयश सचिनच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा "पेच' होते. यातून तो कसा सावरणार, वय त्याला साथ देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
मात्र कारकिर्दीत सतत नव्या आव्हानांचा पूर्वीच्याच जिद्दीने सामना करणाऱ्या सचिनने कच खाल्ली नाही. नव्याने सारे काही सिद्ध करून दाखविण्यासाठी असामान्य कौशल्याला असाधारण जिद्दीची जोड देत सचिनने नेटमध्ये घाम गाळला आणि नव्याने कंबर कसली. 2007 मध्ये सचिनने कसोटीत प्रभावी (776 धावा, दोन शतके, सहा अर्धशतके, 55.42 सरासरी) कामगिरी केली. मग 2008 हे वर्ष सचिनने दणाणून सोडले. चार शतके आणि तीन अर्धशतकांसह त्याने 1063 धावा फटकावल्या. अशा या सचिनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दोन दशके पूर्ण केली. भारताला "वर्ल्ड कप' जिंकून देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठीच सचिनने विलक्षण जिद्दीने दुसरी "इनिंग' सुरू ठेवली आहे. अपयशावर मात करणारे हे त्याचे "कमबॅक' 2011 मध्ये मायदेशातील विश्वकरंडक स्पर्धेत "स्मार्ट' ठरावे हीच सदिच्छा!
0 comments:
Post a Comment